Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 April
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०१ एप्रिल २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
·
नव्या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरचे दर जैसे थे कायम ठेवण्याचा राज्यशासनाचा निर्णय
·
बचत योजनांच्या व्याज दरात वाढ; किसान विकासपत्रं, सुकन्या समृद्धी योजना तसंच
राष्ट्रीय बचतप्रमाणपत्र धारकांना लाभ
·
जुन्या पेन्शन योजनेसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात
·
छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन जलयोजनेच्या कामाची संथ गती पाहता, मुंबई उच्च
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून तीव्र नाराजी व्यक्त
·
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला केंद्र शासनाचा जल-प्रहरी पुरस्कार
·
जालना जिल्ह्यातल्या ११६ गावात पिण्याशिवाय अन्य कारणांसाठी पाणी उपशाला प्रतिबंध
आणि
·
सोळाव्या आयपीएल स्पर्धेला सुरुवात; चेन्नई सुपर किंग्जला हरवून गुजरात टायटन्सची
विजयी सलामी
****
नव्या आर्थिक वर्षासाठी रेडी
रेकनरचे दर जैसे थे कायम ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण
विखे- पाटील यांनी काल ही माहिती देताना, या जनहितार्थ निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळेल
असा विश्वास व्यक्त केला. वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर दरवर्षी
एक एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर तसंच जगंम मालमत्तेचे सरासरी
दर निश्चित करण्यात येतात. यावर्षी क्रेडाई, विकासक तसंच इतर सामान्य नागरिकांकडून
जमीन आणि इमारत या मिळकतींचे दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य
शासनास करण्यात आली होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात
कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, असं विखे- पाटील यांनी सांगितलं.
****
छोट्या बचत योजनांच्या व्याज
दरात वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांवर आता सात टक्क्यांऐवजी सात
पूर्णांक सात दशांश टक्के दराने व्याज मिळेल. किसान विकासपत्रांवर साडे सात टक्के दराने
व्याज मिळेल, सुकन्या समृद्धी योजनेचा व्याज दरही आता सात पूर्णांक आठ दशांशावरून आठ
टक्के करण्यात आला आहे. एप्रिल ते जून २०२३ च्या तिमाहीत हा निर्णय लागू होईल. पाच
वर्षाच्या मुदत ठेव योजनेचा व्याजदर अर्धा टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. यासाठी आता
सात टक्के ऐवजी साडे सात टक्के दराने व्याज मिळणार आहे. बचत खात्यावरचा व्याजदर मात्र
जैसे थे असून १, २ आणि ३ वर्षांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरातही वाढ झाली आहे.
****
राज्यातल्या
पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून
वाहतूक भत्ता मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या
वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते
पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी आणि दहावीच्या
विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून पाच
किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास वाहतूक भत्ता मिळणार आहे.
****
राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ ते २० मार्च या कालावधीत संप केलेल्या १७ लाख
कर्मचाऱ्यांच्या वेतनातून, बाराशे कोटी रुपयांची कपात केली जाणार आहे. तसंच संपकाळाचा
कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार असल्याचं, राज्य सरकारनं स्पष्ट केलं
आहे. दरम्यान, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांना या आदेशात बदल करण्यासाठी निवदेन दिलं असून, ते लवकरच मुख्यमंत्र्यांची
भेट घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
२०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी भारताच्या
नवीन परदेशी व्यापार धोरणाची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली
आहे. ते काल नवी दिल्लीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्यापासून लागू होणाऱ्या या नवीन धोरणामध्ये आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अनेक नवीन
संधी आणि सुविधा देणाऱ्या सूचना अंमलात येणार आहेत, तसंच आयात आणि निर्यात
संदर्भात लवचिकता ठेवण्यात आली असून, निर्यातीत मोठ्या आर्थिक वृद्धीचं लक्ष ठेवण्यात
आल्याचं गोयल यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासाठी नवीन
जलयोजनेच्या कामाची संथ गती पाहता, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र
नाराजी व्यक्त केली आहे. काल खंडपीतठात यासंदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती रवींद्र
घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी हा प्रकल्प फसवणुकीकडे तर चालला नाही ना, अशी
विचारणा केली. याबाबत पुढची सुनावणी ११ एप्रिलला होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे
सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी या सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश खंडपीठाने दिले
आहेत. शहरात दहापैकी सात जलकुंभ ३१ मार्चपूर्वी आणि उर्वरित तीन ३० एप्रिलपर्यंत पूर्ण
करण्याची हमी कंत्राटदार कंपनीने यापूर्वीच्या सुनावणीवेळी दिली होती. मात्र, कालच्या
सुनावणीत या कंपनीने तीन जलकुंभ ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करू तर उर्वरीत जलकुंभ ३० सप्टेंबरपर्यंत
पूर्ण होतील, असं सांगितलं. यावर, कंत्राटदार कंपनीला शपथपत्र सादर करण्याचे निर्देश
खंडपीठाने दिल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
पंतप्रधानांच्या शैक्षणिक पदव्यांबाबत
माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत माहिती सादर करण्याची गरज नसल्याचा निकाल गुजरात उच्च
न्यायालयाने दिला आहे. पंतप्रधानांच्या पदवी प्रमाणपत्राचा तपशील मागणारे दिल्लीचे
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला
आहे. पंतप्रधानांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा तपशील सादर करण्याचे निर्देश देणारा
मुख्य माहिती आयोगाचा आदेशही या न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे.
****
मुंबईला समुद्र किनारा लाभला
असूनही जलवाहतुकीसाठी त्याचा पुरेसा उपयोग झाला नसल्याचं, राज्यपाल रमेश बैस यांनी
म्हटलं आहे. ते काल मुंबईत राष्ट्रीय नौवहन सप्ताह आणि हीरक महोत्सवी राष्ट्रीय नौवहन
दिनाचं उद्घाटन करताना बोलत होते. मुंबईच्या समुद्रात मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीच्या
शक्यता तपासण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. सागरी प्रशिक्षण संस्थांची संख्या वाढवणं
आणि सध्या सुरु असलेल्या संस्थांचं बळकटीकरण करणं आवश्यक असल्याचं राज्यपाल म्हणाले.
****
राज्यात काल ४२५ जणांना कोविडचा संसर्ग झाला, तर
३५१ रुग्ण संसर्गमुक्त होवून घरी परतले. काल या संसर्गामुळे एकही मृत्यूची नोंद झाली नाही. छत्रपती
संभाजीनगर इथं काल नवे सात कोविडबाधित आढळले, जिल्ह्यात गेल्या महिनाभरातली रुग्णसंख्या
आता १११वर पोहोचली आहे
****
छत्रपती संभाजीनगर इथली सभा पूर्वनियोजित
कार्यक्रमानुसार घेण्याचा निर्धार महाविकास आघाडीने वर्तवला आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते
अजित पवार यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. उद्या ही सभा होणार
आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या घटनेसंदर्भात नागरिकांनी अफवांवर विश्वास
ठेवू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही काल मुंबईत पत्रकार परिषद घेत, ही सभा होणार असल्याचं
सांगितलं.
दरम्यान, काल सभेच्या नियोजित
ठिकाणी सांस्कृतिक मंडळ मैदानावर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख तथा म्हाडाचे
सभापती विनोद घोसाळकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्य पदाधिकाऱ्यांची आढावा
बैठक घेतली. महाविकास आघाडीची ही सभा ऐतिहासिक होईल, असा विश्वास घोसाळकर यांनी यावेळी
व्यक्त केला.
दरम्यान, या सभेमुळे सामाजिक
वातावरण बिघडण्याचा अहवाल जर संबंधित यंत्रणांनी दिला, तर सभेला परवानगी नाकारली जाऊ
शकते, असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. प्रशासन सर्व स्थितीवर
लक्ष ठेवून असल्याचं, त्यांनी काल पुण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठाला केंद्र शासनाचा, जल-प्रहरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं
आहे. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात झालेल्या या समारंभात जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह
शेखावत यांच्या हस्ते विद्यापीठाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुलगुरू डॉ. उद्धव
भोसले यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षात विद्यापीठात जलसंधारणाची अनेक कामं करण्यात
आली असून, विद्यापीठ परिसरात भूजल पातळीत वाढ झाली आहे. हजारो वृक्षांची लागवड करून
ती जोपासण्यात आली आहेत. या सर्व कार्यांची नोंद घेत विद्यापीठाला हा पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची
खासदारकी रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याची टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे
कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केली आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार
परिषदेत बोलत होते. न्यायालयाचा निर्णय येताच २४ तासांच्या आत खासदारकी रद्द करणं तसंच
४८ तासांच्या आत नोटीस देऊन घर रिकामं करण्यास सांगणं, हे लोकशाहीला धरून नसल्यामुळे
या कृतीचा जाहीर निषेध करत असल्याचं बसवराज पाटील यांनी म्हटलं आहे.
****
लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम
सुरू असून लोकशाही टिकणार का, असा प्रश्न कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब
थोरात यांनी उपस्थित केला आहे. ते काल अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महागाई,
भ्रष्टाचार, शेतकरी आणि राहुल गांधी यांच्या संदर्भातल्या प्रश्नाबाबत कॉंग्रेस पक्ष
आंदोलन करणार असून गाव ते राज्य पातळीपर्यंत हे आंदोलन असेल असं थोरात यांनी सांगितलं.
****
नांदेड
जिल्ह्यात, चला जाणुया नदीला या उपक्रमा अंतर्गत आज नदी संवादयात्रा आणि जलसाठ्यातून गाळ काढण्याच्या
उपक्रमाचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार
आहे. नदी स्वच्छतेसाठी लोकांनी एकत्र यावं तसंच नदी साक्षरतेविषयी अधिक जागर
व्हावा या उद्देशाने शासन हा उपक्रम राबवत आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या ११६ गावात
पाणी उपशाला प्रतिबंध करण्यात आला आहे. यामध्ये मंठा तालुक्यातील ४५ गावं, परतूर २०,
जाफ्राबाद तसंच अंबड तालुक्यातली प्रत्येकी १७, भोकरदन ९, बदनापूर पाच, आणि जालना तालुक्यातल्या
तीन गावांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यावर परिणाम होईल, असा कोणत्याही प्रकारचा
उपसा या गावातल्या जलस्रोतातून करण्यास मनाई असेल. ३० जूनपर्यंत हा आदेश लागू आहे.
****
सोळाव्या इंडियन प्रिमियर लीग
- आयपीएल स्पर्धेला काल सुरुवात झाली. अहमदाबाद इथं झालेल्या पहिल्या सामन्यात गुजरात
टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर पाच गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईच्या
संघानं दिलेलं १७९ धावांचं लक्ष्य गुजरात संघानं चार चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केलं.
आज मोहाली इथं दुपारी साडे तीन वाजता पंजाब किग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात,
तर लखनौ इथं संध्याकाळी साडे सात वाजता लखनौ सुपर जायन्ट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात
सामना होणार आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या
हयात स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान व्हावा ही राज्य शासनाची भूमिका असल्याचं, खासदार
प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. काल नांदेड जिल्ह्यात अर्जापूर इथं, हुतात्मा
गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. या समारंभात जिल्ह्यातल्या
१५ स्वातंत्र्य सैनिकांचा प्रातिनिधिक स्वरुपात शासनाच्या वतीने स्मृतिचिन्ह देवून
सन्मान करण्यात आला. हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून
साजरं होत आहे. स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान प्रत्येक विद्यार्थी, नागरिकांपर्यत गेलं
पाहिजे, यादृष्टीने जिल्ह्यात एक मे रोजी सहा लाख विद्यार्थी राष्ट्रगीत तसंच राज्यगीताचं
गायन करणार असल्याची माहिती चिखलीकर यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं बुधवारी
रात्री झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, न्यायालयानं त्यांना
तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दंगलीच्या चौकशीसाठी पोलिस आयुक्त
डॉ निखील गुप्ता यांनी विशेष तपास पथक- एसआयटी स्थापन केली आहे. किराडपुरा भागातल्या
राममंदिर परिसरात झालेल्या या दंगलीत हल्लेखोरांनी १८ वाहनं पेटवून दिली होती, यामध्ये
पोलिसांच्या १५ तर इतर नागरिकांच्या तीन वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणी सुमारे ५००
अज्ञातांविरोधात विविध १८ कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सगळ्याच आरोपींचा
युद्धपातळीवर शोध सुरु आहे.
****
नांदेड
रेल्वे विभागानं यावर्षी तिकीट तपासणीतून नऊ कोटी ५० लाख रुपये वसूल केले आहेत.
२०२२ ते २०२३ या काळात केलेल्या या तपासणीत अयोग्य तिकीट आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या १ लाख ७३ हजार प्रवाशांकडून हा
दंड वसूल करण्यात आला. ३ मार्च रोजी केलेल्या तिकीट तपासणीत
आजपर्यंतची सर्वाधिक ५ लाख ५८ हजार रुपये वसुली करण्यात आली.
****
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत २०२२-२३
या वर्षात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल धाराशिव जिल्ह्याला
राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात आलं. यावेळी सहाय्यक संचालक डॉ.अन्सारी यांनी
धाराशिव जिल्ह्याच्या कृती आराखड्याचे सादरीकरण करुन सध्या जिल्हा कृष्ठरोग मुक्त करण्याचं प्रमुख उद्दीष्ट
असल्याचं सांगितलं.
****
लातूर
जिल्ह्यात चाकूर तालूक्यात ३०० हेक्टर जमिनीवर कृषी विकास
योजनेंतर्गत सेंद्रीय शेती केली जाणार आहे. नळेगाव फार्मर प्रोड्युसर कंपनी
लिमिटेड या कंपनीमार्फत ही योजना राबवण्यात येत असून, यासाठी
१५ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक गटाला यासाठी तीन वर्षात
एकूण दहा लाखांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. सेंद्रिय शेती संदर्भात शेतकऱ्यांना
मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या अध्यासन, संशोधन केंद्रात २५ संचालकांची नियुक्ती
करण्यात आली आहे. महापुरुषांच्या नावाने चालणा-या अध्यासन केंद्र आणि संचालकांची लवकरच
बैठक घेऊन व्यापक नियोजन करण्यात येईल असं कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितलं.
****
परभणी रेल्वे स्थानक परिसरात
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्तीसाठी जनजागृती फेरी काढण्यात
आली. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात राबवलेल्या या उपक्रमात तंबाखूमुळे
आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, त्यातून येणारे नैराश्य याबाबत जनजागृती करण्यात आली.
****
हिंगोली इथं राज्य ग्रामीण जीवन
उन्नती अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कयाधू विक्री प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
मिळत आहे. या प्रदर्शनात विविध ६२ स्टॉल लावण्यात आले आहेत. या प्रदर्शनात गेल्या दीड
दिवसांत सुमारे एक लाख ६२ हजार रुपयाची उलाढाल
झाली आहे.
****
No comments:
Post a Comment