Friday, 30 June 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : ३० जून २०२३ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 June 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास

·      उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज औरंगाबाद इथं गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ

·      औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रीक स्कूटरसह नवे तीन प्रकल्प;सुमारे तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक.

·      समान नागरी कायद्याच्या संभाव्य परिणामांच्या अभ्यासासाठी काँग्रेस पक्षातर्फे समिती गठित

·      केंद्र सरकारनं महिला आरक्षणासंदर्भातला निर्णय घ्यावा-शरद पवार यांची मागणी.

आणि

·      आषाढी एकादशी तसंच बकरी ईद सर्वत्र भक्तिभावानं साजरी.

****

पंढरीची वारी आणि पालखी सोहळ्याच्या माध्यमातून घराघरात स्वच्छतेचा मूलमंत्र पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत काल पंढरपूर इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या स्वच्छता दिंडी आणि ग्रामसभा दिंडीचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. 'शासन आपल्या दारी' योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १८ जणांना अनुकंपा नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले.

आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरात आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला देखील मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. पारंपरिक शेतीबरोबर नवनवीन, अत्याधुनिक शेतीतून उत्पादन घेतल्यास बळीराजा समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी त्याच मेहनतीत दुप्पट उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड करावी. नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य येाजनेचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्डाची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आता पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते काल सोलापुरात वार्तारांशी बोलत होते.

****

शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारसोबत मिळून राज्य सरकार करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. डीडी न्यूज या दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते. महाराष्ट्र तेजीनं आर्थिक विकासाकडे वाटचाल करत आहे, राज्य लवकरच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला, ते म्हणाले,

‘‘इस साल हम लोग हाफ ट्रेलिय्न मार्क को पार कर देंगे. हमने एक इकॉनॉमिक अॅडवायजरी कमिटी तयार की इकॉनॉमी अॅडवायजरी कमिटीके चेअरमन टाटा सन्सके जो चेअरमन है एन. चंद्राजी. उनको हमन उसका चेअरमन किया अलग अलग सेक्टर के लोग उस में लिये इस इकॉनॉमिक रोजी कमिटी ने ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी के लिए बहुत अच्छा रिपोर्ट तयार किया. अभी जिस प्रकार से आगे बढ़ रहे है इसी प्रकार से हम लोग आगे बढ़े और बहुत विशेष प्रयास नहीं भी किया. तब भी हम लोग 2031 या 32 मे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनेंगे.’’

राज्य सरकारचे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि आमच्या दोघांमध्ये लोकप्रियतेच्या संदर्भात कुठलीही स्पर्धा नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आपण सुपर सीएम असल्याच्या दाव्यांचं त्यांनी खंडन केलं. सरकार चालवण्यासाठी आपल्या अनुभवाचा फायदा व्हावा म्हणून ऐनवेळी  उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी होण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिले, असं फडणवीस यांनी सांगितलं. २०१९ च्या निवडणुका एकत्र लढल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केली. त्यापूर्वी आमच्याशी चर्चा केली नाही तसंच आमचे फोनही घेतले नाहीत, असं फडणवीस यांनी सांगितलं. शिवसेना संपवण्यासाठी भाजपा कार्यरत होती असा उद्धव ठाकरे यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. जनतेच्या मनात असलेला पक्ष टिकून राहतो, असं ते म्हणाले.

****

दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस आज औरंगाबाद आणि बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

हर घर, नल से जलअभियानाअंतर्गत, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर - खुलताबाद तालुक्यातल्या गावांसाठी एक हजार ७५ कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा औपचारिक प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज गंगापूर इथं होणार आहे. सुमारे एक हजार किलोमीटर अंतराची जलवाहिनी या योजनेअंतर्गत टाकण्यात येणार असून, जायकवाडी धरणातून गंगापूर - खुलताबाद तालुक्यातल्या गावांना थेट नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार आहे. ही योजना ८० टक्के सौर उर्जेवर चालणार असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली.

या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री बीड इथं दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

****

औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात नवे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. ॲथर ही कंपनी ८५० कोटी रुपयांचा इलेक्ट्रीक स्कूटर उत्पादन प्रकल्प उभारणार असून, यामुळे तीन हजार जणांना प्रत्यक्षात तर तीन हजार ५०० जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असं कराड यांनी सांगितलं.

कॉस्मो फिल्म बिडकीनमध्ये दीडशे एकर जागेवर एक हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प उभारणार  आहे. या माध्यमातून ७५० जणांना प्रत्यक्ष तर एक हजार जणांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पिरॅमल फार्मा १४० एकर जागेवर एक हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प उभारणार असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात ड्रोन क्लस्टर झोन तयार करण्यात येणार असून, त्याला गोदावरी क्लस्टर असं नावं देण्यात आलं आहे. तसंच सैन्याच्या सुरक्षा साधनांच्या निर्मीतीच्या क्लस्टरसाठी देखील केंद्र सरकार प्रयत्नरत असल्याचं कराड यांनी यावेळी सांगितलं.

****

समान नागरी कायद्याच्या संभाव्य परिणामांवर अभ्यास करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे समान नागरी अभ्यास समिती गठित करण्यात आली आहे. माजी खासदात भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत राज्यसभा सदस्य कुमार केतकर, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री वसंत पुरके, अनिस अहमद, आदींचा समावेश आहे.

****

केंद्र सरकारनं महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून, महिला आणि मुलींवरचे हल्ले वाढले आहेत आहे. मुली, महिला मोठ्या संख्येनं बेपत्ता असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. राज्यात जात -धर्माच्या नावावरुन दंगली सुरू आहेत, त्यांची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली. गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी सुरक्षे संदर्भात खबरदारी घ्यावी, अशी टीका त्यांनी केली. येत्या १३ आणि १४ जुलै रोजी बंगळुरू इथं विरोधी पक्षांची पुढची बैठक होईल, असं पवार यांनी यावेळी सांगितलं. 

****

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपद देण्याची मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषदेची एक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षानं योग्य वाटा मागितला असून, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, निवडणुकीत आरक्षणाची रोटेशन पद्धत बंद करण्याची मागणी आठवले यांनी केली. मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र आमच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, असं सांगून आठवले यांनी, जातिनिहाय जनगणनेलाही पाठिंबा दिला.

****

समाजातले वृध्दाश्रम आणि अनाथाश्रम ज्या दिवशी बंद होतील तो सुदृढ समाज निर्मितीमधला सुवर्ण क्षण असेल, असं प्रतिपादन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातल्या कुंभारवळण इथल्या, दिवंगत समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन या संस्थेला काल गडकरी यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. या संस्थेला गडकरी यांनी व्यक्तिगतरित्या ११ लाख रुपयांची देणगी जाहीर केली, तसंच सरकार दरबारी या संस्थेला मदत मिळण्यासाठी आपण लागेल ती मदत करू असं आश्वासन देखील त्यांनी दिलं.

****

शाश्वत विकास ध्येयासाठी सांख्यिकीच्या कामासंदर्भात येत्या काळात अधिक धोरणात्मक नियोजन करण्याची गरज असल्याचं, नियोजन विभागाचे मुख्य सचिव सौरभ विजय यांनी म्हटलं आहे. विख्यात सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांतचंद्र महानलोबीस यांच्या सांख्यिकी क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल २९ जून हा त्यांचा जन्मदिन काल ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिनम्हणून साजरा करण्यात आला, यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सांख्यिकी माहिती तयार करताना विश्लेषणात्मक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास संचालनालयामार्फत सक्षम डेटाबेस तयार होण्यास मदत होईल असं ते म्हणाले. राज्याच्या प्रगतीत सांख्यिकी संचालनालयाची भूमिका महत्त्वाची असल्याचं सौरभ विजय यांनी नमूद केलं.

****

अमरनाथ यात्रेला उद्यापासून सुरूवात होणार असून, जवळपास पंधराशे पेक्षा अधिक यात्रेकरू काल जम्मूमधल्या यात्री निवासात पोचले आहेत. बागवत नगर इथल्या तळावरुन यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला उद्या हिरवा झेंडा दाखवला जाईल. काश्मीरमधल्या गंदरबल जिल्ह्यातल्या पहलगाम आणि बालटाल इथल्या नुनवान या मार्गावरून यात्रेची सुरुवात होईल.

****

उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे दरड कोसळल्यानं बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या मार्गावरची वाहतूक पुर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असू, रस्त्यात अडकलेल्या प्रवाशांसाठी प्रशासनानं भोजनाची व्यवस्था केली आहे. हा महामार्ग सुरु झाल्यानंतरच भाविकांनी प्रवास करण्याचं आवाहन चमोली जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

राज्यात आषाढी एकादशी काल मोठ्या उत्साहात भक्तिभावानं साजरी करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं नाथमंदिरात तथा गावाबाहेरील नाथ समाधी दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले होते.

औरंगाबाद शहरानजिक प्रतिपंढरपूर इथं शहरातल्या विविध भागातून दिंड्या आणि नागरिकांनी पायी जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पायी दिंडीत सहभागी झाले होते.

खासदार इम्तियाज जलिल यांनी एमआयएम पक्षातर्फे पायी येणाऱ्या सर्व दिंड्या आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं.

औरंगाबाद इथं इको ग्रीन फाऊंडेशननं पर्यावरण संवर्धनात काम करणाऱ्या सहयोगी संस्थांच्या सहयोगातून वृक्ष दिंडी काढली होती. हरिनामासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला.

जालना शहरासह जिल्ह्यात काल विविध मंदिरांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. शहराचं अराध्य दैवत, प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराज मंदिरात आषाढी निमित्त गेल्या आठवड्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. काल ढोल ताशांच्या गजरात आंनदी स्वामी महाराजांची भव्य पाखली मिरवणूक काढण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथं संत नामदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

बुलडाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथं भाविकांनी संत श्री गजानन महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी देखील मोठी गर्दी केली होती.

****

ईद - उल - जुहा अर्थात बकरी ईद देखील काल ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणच्या इदगाह मैदान आणि मस्जिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. काल आषाढी एकादशी असल्याने अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी कुर्बानी दिली नाही.

****

 

शेतीमध्ये कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचं लातूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी म्हटलं आहे. कृषी संजीवनी सप्ताहाअंतर्गत चिंचोली बल्लाळनाथ इथं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या काल मार्गदर्शन करहोत्या. शंखी गोगलगाय व्यवस्थापनासाठी गावकऱ्यांनी सामूहिक व्यवस्थापन करणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या. सर्व पात्र शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेंतर्गत ई-केवायसी आणि बँक खाते आधार संलग्न करून घ्यावं, जेणेकरून त्या योजनेचा लाभ मिळेल, सं शिंदे यांनी सांगितलं.    

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, सं'महाडीबीटी' अंतर्गत यांत्रिकीकरण, पीक प्रात्यक्षिक, फळबाग लागवड या बाबींचाही लाभ घ्यावा, सं आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी यावेळी केलं.

****

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांचं ३१ जुलैपर्यंत स्थलांतर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आजपासून महावितरण हे काम करणार आहे. त्यासाठी बिडकीन परिसरातल्या काही गावांत आज आणि येत्या रविवारी वीजपुरवठा बंद राहणार आहे. गरज भासल्यास आणखी तीन ते चार दिवस एका दिवसाआड वीज बंद राहील, या अतिमहत्त्वाच्या आणि तातडीच्या कामासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणने केलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर कुलपती नियुक्त सदस्य म्हणून किशोर शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. शितोळे हे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य असून, देवगिरी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

****

दक्षिण कोरियात सुरू आशियाई कबड्डी विजेतेपद स्पर्धेत आज अंतिम लीग सामन्यात भारताचा सामना हाँगकाँग सोबत होणार आहे. काल या स्पर्धेत भारतानं इराणवर ३३-२८ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. लीग सामन्यानंतर स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

****

 

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या बेलमंडळ इथं काल पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तीन लाख ८१ हजार ५२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या पथकानं बेलमंडळ इथल्या नवी आबादीतल्या एका घरावर छापा मारुन ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विनोद नरवाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुलांची १३ आणि मुलींची १२ अशी एकूण २५ शासकीय वसतिगृहं चालवली जातात. यावर्षी या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होत असून, यासाठी शालेय विद्यार्थी १२ जुलै तर इयत्ता दहावी आणि बारावी नंतरच्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील, असं समाज कल्याण सहायक आयुक्तांनी कळवलं आहे.

****

No comments: