Tuesday, 27 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 27.06.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 27 June 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ जून  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      राज्यात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

·      थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती, सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी

·      राज्यातल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये सुसज्ज डिजिटल ग्रंथालयं स्थापन केली जाणार-आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

·      पंढरपूर इथं आषाढी यात्रेनिमित्त गिरीश महाजन आणि तानाजी सावंत यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती

·      देशातल्या प्रत्येक लाभार्थ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात केंद्र सरकार यशस्वी - केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचं प्रतिपादन

आणि

·      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६३ वा दीक्षांत समारंभ

सविस्तर बातम्या

महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत विधान भवनात, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि गोरक्षा समिती पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. नांदेड जिल्ह्यात किनवट इथं गोवंश हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणारे शेखर रापेल्ली, या गोरक्षक कार्यकर्त्याची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर, या बैठकीत चर्चा झाली. सीमा भागात भरारी पथकांची स्थापना करुन अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी, गोरक्षकांना धमकावण्याच्या, हल्ल्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, यासंदर्भातल्या तक्रारींची तत्काळ चौकशी करुन, प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात यावेत, गोरक्षक कार्यकर्त्यांविरुद्ध खोटे गुन्हे नोंदवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, पशूमांस तपासणी यंत्राचा वापर करण्यात यावा, अशा सूचनाही नार्वेकर यांनी केल्या आहेत.

****

थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती, सामाजिक न्याय दिन म्हणून काल राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी, शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

मुंबई इथं मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं. २५० विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या या वसतीगृहाला माता रमाई यांचं नाव देण्याची घोषणा शिंदे यांनी केली.

वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर इथलं मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचं शासकीय वसतीगृह आणि बार्टी अंतर्गत, पुण्याच्या येरवडा संकुल इथल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभही, मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृष्यप्रणालीद्वारे केला.

विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. 

कोल्हापूर इथं पालकमंत्री दीपक केसरकर, आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, 'लक्ष्मी विलास पॅलेस' इथं, शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. शाहू महाराज समाधी स्मारक स्थळाच्या दुसऱ्या टप्यातल्या कामाचा शुभारंभही केसरकर यांच्या हस्ते झाला. या टप्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह नूतनीकरण तसंच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर कलादालनाची निर्मिती करण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद इथं छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसंच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

लातूर इथं महानगरपालिकेच्या वतीनं शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते काल झालं. छत्रपती शाहू महाराजांनी समाजातल्या वंचित घटकाला आरक्षण देवून त्यांना न्याय देण्याचं कार्य केलं, तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाज घटकासाठी काम करण्यासाठी पाठबळ दिलं, असं ते यावेळी म्हणाले. शाहू महाराजांचे विचार आजही सर्वांसाठी मार्गदर्शक असून, त्या विचारांचा अंगीकार सर्वांनी करावा, असं आवाहन शृंगारे यांनी केलं.

परभणी इथं अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी शाहू महाराज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच परभणी इथल्या सामाजिक न्याय विभागाकडून काल समता दिंडीचं आयोजन करण्यात आल होतं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार नवीन पिढीने अंमलात आणावेत, आणि तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहावं, असं अवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी यावेळी केलं.

उस्मानाबाद इथं देखील समता दिंडी काढण्यात आली. वीस महाविद्यालयाचे जवळपास दोन हजार विद्यार्थी तसंच राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि स्काऊट गाईडचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. जिल्ह्यात इयत्ता दहावी आणि बारावी इयत्तेत प्रथम आलेल्या विद्यार्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

बीड इथं निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, यांनी शाहू महाराज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

राज्यातल्या उमरी आणि पोहरादेवी इथल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. तीर्थक्षेत्राच्या कामांसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, असं शिंदे म्हणाले. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकास कामांसाठी दानपत्राद्वारे मिळणारी जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी सूचना फडणवीस यांनी यावेळी केली.

****

शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्काचं घर मिळणं आवश्यक आहे, त्यासाठी ही योजना मोहीमस्तरावर राबवण्यात यावी, अशी सूचना, राज्याचे खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहेत. नाशिक इथं शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत, ते काल बोलत होते. सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी योजनेच्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन, अधिकाधिक घरकुलांचे प्रस्ताव मंजूर करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

राज्यातल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये सर्व सुविधा आणि संदर्भ ग्रंथांनी युक्त अशी सुसज्ज डिजिटल ग्रंथालय स्थापन केली जाणार आहेत. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी ही माहिती दिली. ते नंदूरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यात, शासकीय मुलींच्या वसतीगृह आणि आश्रमशाळांच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन, तसंच उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, सर्व उच्च दर्जाचं साहित्य उपलब्ध करुन देणार असल्याचं गावीत यांनी सांगितलं. यावर्षी राज्यात ५६ नवीन शाळांच्या बांधकामास मंजूरी देण्यात आली असून, त्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक ३० शाळाचा समावेश असल्याची माहिती गावित दिली.

****

महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारला जाब विचारावा, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं काल झालेल्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. मुंबई आणि राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याकडे, पटोले यांनी लक्ष वेधलं. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेट्टा डिसुझा, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे आणि राज्यभरातल्या महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

****

तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे काल आपल्या मंत्रिमंडळासह सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले. सोलापूर शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी भारत राष्ट्र समिती पक्षाचे झेंडे आणि गुलाबी पताका लावून राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं स्वागत करण्यात आलं.

****

पंढरपूर इथं आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा, परवा २९ तारखेला साजरा होणार आहे. यानिमित्त वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करणं, तसंच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीनं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांवर, समन्वयक मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे दोन मंत्री समन्वयक मंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान, या सोहळ्यासाठी वारकरी मोठ्या संख्येनं पंढरपुरमध्ये दाखल होत आहेत. आषाढी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनानं ६५ एकर परिसरामध्ये मुक्कामाची सोय उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांची राहण्याची सोय होणार आहे. दिंडी सोबत आलेले वारकरी दरवर्षी या परिसरात तंबू तसंच राहूट्या उभारून यात्रा कालावधीमध्ये मुक्कामी राहतात. या ठिकाणी प्रशासनाने शुद्ध पेयजल, २४ तास वीजपुरवठा, मुबलक प्रमाणात स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

दरम्यान, उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेलं पाणी चंद्रभागेत पोहोचलं आहे. त्यामुळे यात्राकाळात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नानाची सोय झाली आहे.

****

आषाढी वारीसाठी दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागातल्या नांदेड, जालना, औरंगाबाद आणि आदिलाबाद इथून विशेष गाड्या चालवणार आहे. विदर्भातून पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांची मागणी लक्षात घेवून, अकोला ते पंढरपूर आणि पंढरपूर ते अकोला अशी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी २७ तारखेला अकोल्याहून सुटणार आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात, वारकरी संप्रदायाचं अभ्यास केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय ज्ञान, परंपरा, संस्कृती जोपासणाऱ्या पंढरपूरच्या वारीची कीर्ती जगभरात असून, यावर अधिक अभ्यास आणि संशोधन करण्याच्या उद्देशानं, हा निर्णय घेण्यात आला आहे. काल प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहास राष्ट्रमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात आलं आहे.

****

देशातल्या प्रत्येक लाभार्थ्याला अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरलं आहे, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध योजनांची काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरुम इथं माहिती देण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. महा-जनसंपर्क अभियान या कार्यक्रमांतर्गत मुरूम इथं उमरगा-लोहारा तालुक्यातल्या लाभार्थ्यांचा भव्य मेळावा घेण्यात आला. मिश्रा यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सरकारने नऊ वर्षाच्या काळात राबवलेल्या स्वच्छ भारत अभियान, घर तिथे शौचालय, उज्वला गॅस योजना, पी एम किसान योजना आदी योजनाबद्दल लाभार्थांना यवोळी माहिती देण्यात आली.

****

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ६० हजार स्नातकांना पदवीचं वितरण करण्यात येणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पॉल हर्बट सेंटर फॉर डी एन बारकोडिंग ॲन्ड बायोडायव्हर्सिटी आणि व्होकेशनल स्टडिज या दोन इमारतींचं उद्घाटन होणार आहे.

****

अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा औद्योगिक वसाहतीत बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकून, आठ लाख पाच हजार ९५० रुपयांचा खताचा साठा जप्त केला आहे. पंचायत समिती आणि कृषी विभागानं ही संयुक्त कारवाई केली असून, या संदर्भात तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून, कारखान्याचे संचालक राहुल सरोदे यांच्याविरुद्ध, शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर पोलीसांनी दुचाकी चोरांच्या टोळीला अटक केली. साक्री तालुक्यातल्या शेंदवड इथून शामील पांडु बागुल याला, आणि त्याच्या इतर साथीदारांना, पोलीसांनी काल ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सहा लाख २५ हजार रूपये किंमतीच्या, २० दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. ही चोरांची टोळी पकडल्याबद्दल पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पिंपळनेर पोलीसांच्या पथकाला दहा हजारांचं बक्षिस दिलं.

****

उस्मानाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्राचं, विद्यापीठात रूपांतर करण्याची मागणी, सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयीसुविधा वाढवण्यासह, जिल्ह्याचा शैक्षणिक निर्देशांक उंचावण्यासाठी, स्वतंत्र विद्यापीठ होणं आवश्यक असल्याचं, यासंदर्भातल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यासाठी, विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला मोठं उद्दीष्ट दिलं असून, जिल्ह्यात देशी वृक्ष लागवड करण्यावर भर देण्यास सांगण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. वृक्षारोपणाच्या उद्दीष्ट पूर्ततेसाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांनी नियोजन करून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश गोयल यांनी दिले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या येणेगुर इथला ग्रामसेवक शरदचंद्र बलसुरे याच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराच्या शेतात बिअर दुकान सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतचं ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात, त्यानं पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल सकाळी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात कपाशी पीक लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून, आतापर्यंत सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्रावरील लागवड पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

औरंगाबाद शहर परिसरातही काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

****


अंमलीपदार्थ विरोधी दिन काल पाळण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

सिंधुदुर्ग इथं पोलिस आयुक्त सौरभ अग्रवाल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्पपरिणाम समाजासमोर यावेत, अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये अडकलेली पिढी नशेच्या विळख्यातून बाहेर यावी, असं ते यावेळी म्हणाले.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...