Tuesday, 27 June 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.06.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 June 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जून २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      मुंबई ते मडगाव सह पाच नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन.

·      तूर डाळीच्या राखीव साठ्यामधून नियोजनबद्ध पद्धतीनं पुरवठा करण्याचा केंद्राचा निर्णय.

·      औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज राज्य शासनाकडून मंजूर.

आणि

·      हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाला आज तीन बालविवाह रोखण्यात यश.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाच नवीन वंदे भारत रेल्वेगाड्यांचं उद्घाटन केलं. मध्य प्रदेशमध्ये भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकातून त्यांनी या गाड्यांना झेंडा दाखवला. यामध्ये मुंबई ते मडगाव या गाडीचा समावेश आहे. ही गोव्यातली पहिली वंदे भारत गाडी असून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मडगावला जाणाऱ्या या गाडीमुळे या प्रवासाला लागणारा वेळ एका तासानं कमी होणार आहे.

मोदी सरकारच्या ‘गरीब कल्याण’ कार्यक्रमातून गरीबांचं उंचावलेलं जीवनमान आणि सर्वसमावेशक विकासामुळे जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी भारताची अर्थव्यवस्था, याची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी सामान्य माणसांपर्यंत घरोघरी जाऊन पोहचवली पाहिजे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ इथून आज १० लाख बूथवरच्या कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केलं, त्यानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. मोदी सरकारच्या नियोजनबद्ध विकासकामांमुळे पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल जगातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगानं होत आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

****

तूरडाळीच्या राष्ट्रीय राखीव साठ्यामधून बाजारात निश्चित आणि नियोजनबद्ध पद्धतीनं तुरीचा पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत तूरडाळ उपलब्ध होत रहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आयात डाळीचा साठा बाजारात येईपर्यंत हा पुरवठा सरकार करणार आहे. यासाठी राष्ट्रीय साठ्यातल्या तुरीचा ऑनलाईन पद्धतीनं लिलाव करून पात्र डाळ उत्पादकांना तुरीचा पुरवठा करावा, असे निर्देश ग्राहक कार्य, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला दिले आहेत. याआधी, या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी तूर आणि उडदाच्या साठ्याची सीमा ठरवून दिली आहे, आणि त्यावर देखरेख ठेवली जात आहे.

****

प्राप्तिकर विभागाकडे कालपर्यंत एक कोटीहून जास्त करपरतावा अर्ज दाखल झाले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा टप्पा बारा दिवस आधी गाठला गेला आहे. करदात्यांना सुविधा मिळाव्यात आणि प्राप्तिकर परतावा मिळण्याचा वेग वाढावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलं आहे. शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी हे अर्ज लवकरात लवकर दाखल करण्याचं आवाहनही या विभागानं करदात्यांना केलं आहे.

****

यूथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग इंडिया, या अभियानाच्या पाचव्या आवृत्तीत नऊ राज्यांमधल्या बारा अव्वल स्टार्ट-अप्सना विजेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे. युवकांच्या, उद्योगक्षेत्रातल्या नवनवीन कल्पनांना साकार करण्याला प्रोत्साहन देणं आणि त्यांच्यासाठी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या चार स्टार्ट अप्सची निवड झाली आहे. यात, आकाशदीप बन्सल यांचा सरलएक्स, सौम्या डबरीवाल यांचा प्रोजेक्ट बाला, अक्षय कावळे यांचा ॲग्रोशुअर आणि रजत सोहन विश्वकर्मा यांचा मायप्लॅन एट यांचा समावेश आहे. सगळ्या विजेत्यांना पाच हजार डॉलर्सपर्यंत प्रारंभिक निधी देण्यात आला आहे.

****

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या अर्थात एमएसएमई क्षेत्राला चालना देऊन भारताला जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं मत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त आज नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्राचा देशाच्या सकल घरगुती उत्पादनात तीस टक्के तर निर्यातीत सुमारे पन्नास टक्के वाटा असल्याचं राणे यांनी यावेळी सांगितलं. या उद्योगांच्या माध्यमातून होणारं उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर केला पाहिजे, असं मतही राणे यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

सुगम्य भारत अभियानाच्‍या माध्‍यमातून विकास प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे, असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. केंद्रीय अधिकारीता मंत्रालय आणि सामाजिक न्याय विभागाच्‍या वतीनं अहमदनगर इथे दिव्यांग व्यक्तींना गरजेच्या साहित्याचं नि:शुल्क वाटप आठवले यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या एक हजारहून जास्त सरकारी इमारती, पस्तीस आंतरराष्ट्रीय विमानतळं, सातशे नऊ रेल्वे स्थानकं, सहाशे चौदा वेबसाईट्स आणि आठ लाख शाळा यामध्ये, दिव्यांगाना सुलभ रीतीनं वापरता येतील अशा सुविधा निर्माण करून ही ठिकाणं सुगम्य करण्याची सुरुवात झाली असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज राज्य शासनाने मंजूर केला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी आज याबाबतचं पत्र जारी केलं. केंद्रेकर यांना येत्या तीन जुलै रोजी आपला पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून निवृत्त होण्यास परवानगी देत असल्याचं, या पत्रात म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आज भारत राष्ट्र समिती- बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी सरकोली इथे घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात या पक्षांतराची घोषणा करण्यात आली. भालके यांच्यासोबत त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनीही बीआरएसमध्ये प्रवेश केला.

****

स्पर्धेच्या या युगात विद्यार्थ्यांना फक्त पदवी नव्हे तर ज्ञान आणि कौशल्याच्या आधारावर आपली कारकीर्द घडवावी, असं मत राज्यपाल तसंच कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या त्रेसष्टाव्या दीक्षांत सोहळ्यात ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. भारताला महासत्ता बनवण्याचं, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी युवकांची आहे, असं कुलपती म्हणाले.

‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त असलेलं हे विद्यापीठ कष्टकरी, शेतकरी आणि वंचित घटकांतल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करत असल्याचं सांगताना, गेल्या साठ वर्षात विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या पदांवर पोहचल्याबद्दल बैस यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं.

दीक्षांत सोहळ्याच्या सुरुवातीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी आपल्या स्वागतपर भाषणात विद्यापीठाच्या सुरुवातीपासूनच्या वाटचालीचा उल्लेख करत, सध्या या विद्यापीठाशी संलग्न ४७१ महाविद्यालयांमधून सव्वा चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती दिली. पारदर्शक प्रशासन, उच्च शैक्षणिक दर्जा आणि समाजाभिमुख संशोधन, यासाठी आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टीनं विद्यापीठ काही महत्वाची पावलं उचलत असल्याचं येवले यांनी यावेळी सांगितलं. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत येवले यांनी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

****

हिंगोली जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन समितीने आज तीन बालविवाह रोखण्यात यश मिळवलं. वसमत तालुक्यात सुनेगाव इथं दोन बालविवाह तर कळमनुरी तालुक्यातील दाती इथं एक बालविवाह थांबवण्यात आला. महिला आणि बालविकास जिल्हा कार्यालयात कार्यरत असलेल्या कायदा आणि पर्यविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित - कांबळे यांच्या पथकाने हा बालविवाह रोखला आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...