Sunday, 25 June 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.06.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 June 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ जून २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी व्हावा, हा आमच्या सरकारचा अजेंडा-नांदेड इथं शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन.

·      ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र शोभणे यांची निवड.

·      महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सर्व परीक्षांची प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने देण्याचा निर्णय.

आणि

·      नाशिक इथं राज्य उत्पादक शुल्क विभागाची कारवाई; एक कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त.

****

राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी व्हावा, हा आमच्या सरकारचा अजेंडा असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नांदेड इथं शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं उद्‌घाटन झालं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार लोकांच्या चिरंतन स्मरणात राहतं, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –

आमचा अजेंडा एकच आहे, या राज्याचा सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. हेच तर सरकारचं काम असतं. नाहीतर सरकार कशासाठी? सरकार कुणासाठी? सरकारं येतात, सरकारं जातात, सरकारं बदलतात. परंतू जे सरकार लोकांसाठी काम करतं, तेच सरकार कायम लोकांच्या आठवणीमध्ये चिरंतन राहतं हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

अबचलनगर मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला हजेरी लावली.

****

दरम्यान, ठाणे इथं महानगरालिकेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज झालं. राज्यातील जनतेला विकासकामं हवी आहेत, त्यांना आरोप प्रत्यारोपात रस नाही, असं शिंदे म्हणाले. पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख विकासकामं हे सरकारचं प्राधान्य असून, अधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी लावून कामं करण्यासाठी तयार राहावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

****

भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. आज सांगली इथं काँग्रेस पक्षाचा महानिर्धार शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळावा झाला, या मेळाव्यात सिद्धरामय्या बोलत होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली, संविधान नसते तर दीनदलित, शोषित, वंचित वर्ग मुख्य प्रवाहात आला नसता, असं सिद्धरामय्या म्हणाले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली. सरकारने पंढरपूरात जागोजागी लावलेले पोस्टर तातडीने काढून टाकावेत, अशी मागणी पटोले यांनी केली.

दरम्यान, पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांची पाहणी आज मिटकरी यांनी केली, हा प्रश्न आपण विधान परिषदेमध्येही उपस्थित करु, असं मिटकरी यांनी सांगितलं.

****

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार रविंद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. आज पुणे इथं झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. थोर लेखक साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं पुढच्या वर्षी दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन होणार आहे.

****

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रमाणपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरी आणि क्यूआर कोड वापरण्यात येणार आहे. डिजिटल प्रमाणपत्रांमुळे परीक्षा परिषदेची आर्थिक बचतही होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली. परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी, टायपिंग आदी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं परिषदेतर्फे सांगण्यात आलं आहे. पुढील परीक्षेपासून विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी घेऊन त्यावरच प्रमाणपत्र पाठवण्यात येणार असल्याचं बेडसे यांनी सांगितलं.

****

यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी इथं भाजपच्या महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत लाभार्थी संमेलन घेण्यात आलं. मध्य प्रदेशातल्या खासदार कल्पना सैनी आणि आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या हस्ते या संमेलनात शासनाच्या विविध योजनांचा ४७० जणांना लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि आदिवासींना विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्यात आल्याचं खासदार कल्पना सैनी यांनी यावेळी सांगितलं.

****

केंद्रशासित प्रदेशांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबध्द असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज अंदमानात पोर्टब्लेयर इथं बोलत होते. अंदमान निकोबारमध्ये पर्यटन उद्योगाला चालना मिळावी, यासाठी पोर्टब्लेयर येथील विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सुविधा सुरु करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण नागरी विमान वाहतुकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. दरम्यान, अंदमानात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रध्वजाला आठवले यांनी मानवंदना दिली.

****

आपल्या देशात धर्मांची, जातींची वैविध्यता आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथं आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रबुद्ध नागरिक संमेलन घेण्यात आलं, त्यावेळी गडकरी बोलत होते. प्रत्येकाच्या लेखी राष्ट्रहितालाच प्राधान्य असायला हवे, असंही गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला. आणीबाणीमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी देशाने मोठा संघर्ष केला, अनेकांच्या बलिदानामुळे लोकशाहीची पुनर्स्थापना झाली, असं गडकरी यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या ढोरकीन औद्योगिक वसाहतीत, पोलिसांनी आज धाड टाकत गोमांस हस्तगत केलं, तसंच ५० गायी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीसांचं विशेष पथक तसच स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात इगतपुरी सिन्नर मार्गावर गोमांस घेऊन जाणाऱ्या गाडीवर काल अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

नाशिक इथं अवैध मद्यसाठ्याची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक कोटी ९० हजार रुपयांचा मद्यसाठा आणि मुद्देमाल जप्त केला. विंचूर चौफली आणि विल्होळी अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवलं आहे. याप्रकरणी ट्रकचालक, क्लिनरसह मद्यपुरवठादार आणि मद्य खरेदीरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

खान्देशची जीवनदायनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापी नदीचा प्रकटदिन आज नंदुरबार जिल्ह्यात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातल्या संगमेश्वर इथं जन्मोत्सव निमित्त भाविकांनी मोठ्या उत्साहात नदीचं कृतज्ञतापूर्वक पूजन केलं.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...