Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 June
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ जून २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक बातम्या
· देशातला कायदा प्रत्येक नागरिकासाठी एकसमान असावा-पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
· आगामी सर्व निवडणुका महायुतीच्या नऊ मित्रपक्षांसोबत समन्वयाने
लढणार-भाजपची घोषणा
· राखीव साठ्यामधून नियोजनबद्ध पद्धतीनं तूर डाळीचा पुरवठा
करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
· राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांचा भारत राष्ट्र
समिती पक्षामध्ये प्रवेश
· सर्व समाज घटकातल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा-पदवी प्रदान सोहळ्यात
राज्यपालांचे गौरवोद्गार
· हिंगोली जिल्ह्यात तीन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश
आणि
· आशियाई कबड्डी विजेतेपद स्पर्धेत भारताचा दक्षिण कोरियावर
विजय, तर सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारत आणि कुवेत यांच्यातला सामना एक - एक असा बरोबरीत
सविस्तर बातम्या
देशातला कायदा प्रत्येक नागरिकासाठी एकसमान असला पाहिजे,
असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल भोपाळ इथून दूरदृश्य
यंत्रणेच्या माध्यमातून देशभरातल्या भाजप कार्यकर्त्यांशी बोलत होते. देशाच्या संविधानातही
नागरिकांच्या समान हक्कांबद्दल सांगितलं असल्याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं. विरोधी पक्षांकडून
मतांसाठी राजकारण केलं जात असून, समान नागरी कायद्याच्या मुद्यांवर नागरिकांची दिशाभूल
करत असल्याचा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला.
****
महाराष्ट्रात आगामी सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष महायुतीमधल्या
नऊ मित्रपक्षांसोबत समन्वयाने लढणार असल्याची घोषणा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे यांनी केली आहे. काल मुंबईत भाजपा, शिवसेना यांच्यासह समविचारी नऊ पक्षांच्या
बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कोणत्या निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवेल
याचा निर्णय सर्व नऊ घटक पक्षांच्या समन्वयाने महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस आणि
एकनाथ शिंदे घेतील, असं बानवकुळे यांनी सांगितलं.
****
लोकसभेच्या जागावाटपाबाबत येत्या सहा तारखेला काँग्रेसची
बैठक होणार असून, अधिवेशनाआधी मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याची माहिती, काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काल मुंबईत काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीनंतर
ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातली राजकीय परिस्थिती, कायदा आणि सुव्यवस्था तसंच
शेतकऱ्यांच्या समस्या, या विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या
मदतीसंदर्भात राज्य सरकार आणि राज्यपालांकडे पाठपुरावा करणार असल्याचंही पटोले यांनी
यावेळी सांगितलं. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई आणि राज्यात महिला असुरक्षित असल्याचा
आरोप करत, गरज वाटल्यास काँग्रेस पक्ष कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर
उतरेल असा इशाराही त्यांनी दिला.
****
राज्यसभेच्या १० जागांसाठी आगामी १३ आणि २४ जुलै रोजी मतदान
होणार आहे. निवडणूक आयोगाने काल हा निवडणूक
कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार गोव्यातील एक, गुजरातमधील तीन आणि पश्चिम बंगालमधील
सहा जागांसाठी ही निवडणूक होईल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह राज्यसभेच्या
दहा सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्यानं, ही निवडणूक होणार आहे.
****
तूरडाळीच्या राष्ट्रीय राखीव साठ्यामधून बाजारात निश्चित
आणि नियोजनबद्ध पद्धतीनं तुरीचा पुरवठा करण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे.
नागरिकांना परवडणा-या किमतीत तूरडाळ उपलब्ध होत रहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला
आहे. आयात डाळीचा साठा बाजारात येईपर्यंत हा पुरवठा सरकार करणार आहे. यासाठी राष्ट्रीय
साठ्यातल्या तुरीचा ऑनलाईन पद्धतीनं लिलाव करून, पात्र डाळ उत्पादकांना तुरीचा पुरवठा
करावा, असे निर्देश, ग्राहक कार्य, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं, राष्ट्रीय
कृषी सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला दिले आहेत. याआधी, या
महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी तूर आणि उडदाच्या साठ्याची
सीमा ठरवून दिली आहे, आणि त्यावर देखरेख ठेवली जात आहे.
****
प्राप्तिकर विभागाकडे कालपर्यंत एक कोटीहून जास्त कर विवरणपत्र
दाखल झाले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा टप्पा बारा दिवस आधी गाठला गेला आहे.
करदात्यांना सुविधा मिळाव्यात आणि प्राप्तिकर परतावा मिळण्याचा वेग वाढावा, यासाठी
प्रयत्नशील असल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलं आहे. शेवटच्या क्षणी होणारी धावपळ
टाळण्यासाठी हे अर्ज लवकरात लवकर दाखल करण्याचं आवाहनही, या विभागानं करदात्यांना केलं
आहे.
****
यूथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग इंडिया, या अभियानाच्या
पाचव्या आवृत्तीत, नऊ राज्यांमधल्या बारा अव्वल स्टार्ट-अप्सना विजेते म्हणून घोषित
करण्यात आलं आहे. युवकांच्या, उद्योगक्षेत्रातल्या नवनवीन कल्पनांना साकार करण्याला
प्रोत्साहन देणं, आणि त्यांच्यासाठी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करणं, हा या
अभियानाचा उद्देश आहे. विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या चार स्टार्ट अप्सची निवड झाली
आहे. यात, आकाशदीप बन्सल यांचा सरल एक्स, सौम्या डबरीवाल यांचा प्रोजेक्ट बाला, अक्षय
कावळे यांचा ॲग्रोशुअर आणि रजत सोहन विश्वकर्मा यांचा मायप्लॅन एट, यांचा समावेश आहे.
सगळ्या विजेत्यांना पाच हजार डॉलर्सपर्यंत प्रारंभिक निधी देण्यात आला आहे.
****
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग - एम एस एम ई क्षेत्राला
चालना देऊन भारताला जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं
मत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय
एम एस एम ई दिनानिमित्त काल नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. सूक्ष्म,
लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्राचा देशाच्या सकल घरगुती उत्पादनात तीस टक्के, तर निर्यातीत
सुमारे पन्नास टक्के वाटा असल्याचं राणे यांनी सांगितलं. या उद्योगांच्या माध्यमातून
होणारं उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर केला पाहिजे, असं मतही त्यांनी
व्यक्त केलं.
****
सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून विकास प्रक्रिया
सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय
राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. केंद्रीय अधिकारीता मंत्रालय आणि सामाजिक
न्याय विभागाच्या वतीनं काल अहमदनगर इथं, दिव्यांग व्यक्तींना गरजेच्या साहित्याचं
नि:शुल्क वाटप आठवले यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या एक
हजारहून जास्त सरकारी इमारती, पस्तीस आंतरराष्ट्रीय विमानतळं, सातशे नऊ रेल्वे स्थानकं,
सहाशे चौदा वेबसाईट्स आणि आठ लाख शाळा यामध्ये, दिव्यांगाना सुलभ रीतीनं वापरता येतील
अशा सुविधा निर्माण करून ही ठिकाणं सुगम्य करण्याची सुरुवात झाली असल्याचं, आठवले यांनी
यावेळी सांगितलं.
****
पुण्यात काल एका विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला झाल्याच्या
घटनेबाबत सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य महिला आयोगानं पोलिसांना
दिले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणा-या या मुलीवर तिच्या
मित्रानं कोयत्यानं हल्ला केला, मात्र स्थानिकांनी मदत केल्यामुळे मुलीचा जीव वाचला,
तसंच आरोपीला अटक करता आली. कायद्याच्या चौकटीत या आरोपीवर कडक कारवाई केली जावी, यासाठी
महिला आयोग पाठपुरावा करेल, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी
म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे
दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी, काल भारत राष्ट्र समिती-
बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख
के. चंद्रशेखर राव सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी सरकोली इथं घेतलेल्या
शेतकरी मेळाव्यात या पक्षांतराची घोषणा करण्यात आली. भालके यांच्यासोबत त्यांच्या अनेक
कार्यकर्त्यांनीही बीआरएसमध्ये प्रवेश केला.
****
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात काल वाखरी
नजीक बाजीराव विहिरीजवळ गोल रिंगणाचा सोहळा रंगला. यामध्ये सर्वप्रथम विणेकरी आणि टाळकरी
धावले, त्यानंतर अश्व रिंगणात धावले. त्यानंतर पालखी सोहळा वाखरीत येऊन विसावला. आज
सगळ्याच पालख्या पंढरपुरात दाखल होतील.
****
सर्व समाज घटकातल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा असल्याचं, राज्यपाल तथा
कुलपती रमेश बैस यांनी म्हटलं आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
६३ व्या दीक्षांत समारंभात ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. तरुणांना
स्पर्धेच्या युगात केवळ पदवीच्या आधारे नव्हे तर ज्ञान, कौशल्याच्या बळावर स्वतःचं
करिअर घडवावं लागेल, भारताला महासत्ता बनवण्याचं डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचं स्वप्न
पूर्ण करण्याची जबाबदारी तरुणांवर आहे, असंही
राज्यपाल म्हणाले.
या दीक्षांत समारंभाला भारतीय विद्यापीठ संघटनेच्या सरचिटणीस
डॉ. पंकज मित्तल, कुलगुरु डॉ प्रमोद येवले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी
विविध विद्याशाखांमधल्या ५९ हजार ९६६ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका आणि पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते बी. व्हॉकेशनल स्टडीज इमारत
आणि पॉल हेबर्ट सेंटर फॉर डी एन ए बारकोडींग ॲन्ड बायोडायव्हरसिटी स्टडीज इमारतीचं
दूरस्थ माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं.
****
औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा स्वेच्छानिवृत्ती
अर्ज राज्यशासनानं मंजूर केला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन
गद्रे यांनी काल याबाबतचं पत्र जारी केलं. केंद्रेकर यांना येत्या तीन जुलै रोजी आपला
पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून निवृत्त होण्यास परवानगी देत असल्याचं, या पत्रात
म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन समितीने काल तीन बालविवाह
रोखण्यात यश मिळवलं. वसमत तालुक्यात सुनेगाव इथं दोन बालविवाह तर कळमनुरी तालुक्यातल्या
दाती इथं एक बालविवाह थांबवण्यात आला. महिला आणि बालविकास जिल्हा कार्यालयात कार्यरत
असलेल्या कायदा आणि पर्यविक्षा अधिकारी अनुराधा पंडित - कांबळे यांच्या पथकानं हा बालविवाह
रोखला.
****
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या एकदिवसीय
क्रिकेट विश्ववचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट महा
मंडळानं काल याबाबत घोषणा केली. या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना पाच ऑक्टोबरला इंग्लंड
आणि न्यूझीलंड संघांदरम्यान होणार असून, अहमदाबादलाच नरेंद्र मोदी क्रीडांगणावर १९
नोव्हेंबरला शेवटचा सामना होईल.
या स्पर्धेत एकूण दहा संघ भाग घेतील. त्यापैकी भारत, पाकिस्तान,
इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझिलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश
हे सुपरलीगमधून स्पर्धेला पात्र ठरले आहेत, तर उरलेले दोन स्पर्धक देश नऊ जुलैला झिम्बाव्बे
इथं होणाऱ्या पात्रता सामन्यातून ठरतील. या स्पर्धेत भारताचा संघ आपला पहिला सामना
ऑस्ट्रेलियाबरोबर चेन्नई इथं खेळेल, तर भारत पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबाद
इथं रंगेल.
४६ दिवस चालणाऱ्य़ा या स्पर्धेतले सामने हैदराबाद, अहमदाबाद,
धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बंगळुरु, मुंबई आणि कोलकाता या दहा ठिकाणी खेळवले
जाणार आहेत. सराव सामने २९ सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत हैदराबाद इथं होणार
आहेत.
****
आशियाई कबड्डी विजेतेपद स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या
सामन्यात भारतीय पुरुष कबड्डी संघानं यजमान दक्षिण कोरियावर ७६ -१३ असा दणदणीत विजय
मिळवला. भारतीय संघानं चिनी तैपेई संघाबरोबर झालेल्या लढतीतही तैपेईवर ५३-१९ अशी मात
केली. भारताचा सामना आज जपानसोबत होणार आहे. सहा वर्षांच्या खंडानंतर, काल या स्पर्धेला
सुरुवात झाली. यापूर्वी २०१७ मध्ये ही स्पर्धा इराणमधे गॉर्गन इथं आयोजित केली होती.
त्यावेळी भारतीय संघानं पाकिस्तानला नमवून विजेतेपद मिळवलं होतं.
****
सॅफ फुटबॉल स्पर्धेत काल भारत आणि कुवेत यांच्यातला शेवटचा
साखळी सामना एक - एक असा बरोबरीत सुटला. भारत आणि कुवेत या दोन्ही संघांनी यापूर्वीच
उपान्त्य फेरी गाठली आहे. आज लेबनॉन विरुद्ध मॉलदिव्ह्ज आणि भूतान विरुद्ध बांगलादेश
हे सामने होणार असून, यांच्यातले विजेते संघ येत्या एक जुलै ला होणाऱ्या उपान्त्य फेरीत
भारत आणि कुवेत विरुद्ध खेळतील.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना आणि औद्योगिक कंपन्यांना
अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी शहरात, ग्रामीण भागात आणि औद्योगिक परिसरात, अतिभारीत
सबस्टेशन्स प्रथम प्राधान्यानं अद्ययावत करण्याची आणि नविन सबस्टेशनचं काम सुरू करण्याची
सूचना, खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या औरंगाबाद
परिमंडळाची आढावा बैठकीत ते काल बोलत होते. नागरिकांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवण्याचे
निर्देशही खासदार जलील यांनी यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी येत्या तीस जूनपूर्वी
पीककर्जाचं नूतनीकरण करून घ्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी केलं
आहे. कर्ज नूतनीकरणासाठी सगळ्या बँका गावागावात शिबिरं आयोजित करत आहेत, त्याचा लाभ
घेऊन शेतक-यांनी कर्जाचं नूतनीकरण केल्यास ते कर्जाच्या रकमेत वाढ मिळण्यास पात्र ठरतील,
असं जिल्हाधिका-यांनी म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यात सध्या सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही,
त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये, तर, ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाला आणि जमिनीत
साधारणतः सहा इंच ओल झाल्यानंतरच पेरणी करावी, असं आवाहन बीडच्या जिल्हा अधिक्षक कृषी
अधिका-यांनी केलं आहे. रासायनिक खतांचा वापर करण्यापूर्वी जमिनीत पुरेशा प्रमाणात सेंद्रिय
खतांचा वापर करावा, तसंच बियाण्यास जैविक खतांची बीज प्रक्रिया करावी, असा सल्लाही
कृषी अधिका-यांनी दिला आहे.
****
शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमीन अदलाबदल दस्तांसाठी राज्य
शासनाने ‘सलोखा योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी
लाभ घ्यावा, असं आवाहन, परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे..
****
No comments:
Post a Comment