Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जून २०२३
सायंकाळी ६.१०
****
·
कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार
आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी.
·
विविध क्षेत्रांच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास
घडवण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त-कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांचं
प्रतिपादन.
·
मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांची कोरोना काळातल्या
व्यवहारांचीही चौकशी करावी -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आव्हान.
आणि
·
सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी
मतदारसंघनिहाय जनजागृती करण्याचं निवडणूक विभागाच्या सूचना.
****
न्यायालयीन
कोठडीत कैद्यांचे होणारे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं,
केंद्र सरकार, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना, मार्गदर्शक सूचना जारी केल्या
आहेत. न्यायालयीन कोठडीत कैद्यांकडून आत्महानी होते, ती कमी करण्यासाठी प्रयत्न करावे,
अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बहुसंख्य कैद्यांचे नैसर्गिक मृत्यू आत्महत्यांमुळे
होतात, असं निरीक्षण आयोगानं नोंदवलं आहे. या पार्श्वभूमीवर, या मार्गदर्शक सूचना जारी
करण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
कारागृहातल्या कैद्यांना त्यांच्या नातलगांशी संवाद साधण्यासाठी कॉईन बॉक्सऐवजी, स्मार्टकार्ड
फोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात
या सेवेचा प्रारंभ, अपर तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाला. येरवडा
कारागृहातल्या या सुविधेचा आढावा घेऊन, राज्यातल्या इतर कारागृहात या सुविधेची अंमलबजावणी
करण्यात येणार असल्याची माहिती, गुप्ता यांनी यावेळी दिली.
****
येत्या
काळात विविध क्षेत्रांच्या गरजा ओळखून त्यानुरूप विद्यार्थ्यांची कौशल्यं विकासित करण्यासाठी
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल, असं प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल रमेश
बैस यांनी केलं आहे. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ
आज राज्यपालांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणामुळं
राष्ट्रीय आकांक्षेनुसार देशाला विकासाच्या शिखरावर नेणारी संशोधक आणि व्यावसायिकांची
पिढी घडेल असं सांगत, विद्यार्थ्यांनी फक्त ‘नोकरी शोधणारे’ न होता ‘नोकऱ्या निर्माण
करणारे’ व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या दीक्षांत समारंभात २४९ संशोधकांना
आचार्य पदवी, गुणवंतांना ११९ सुवर्णपदकं, २३ रौप्यपदकं आणि २५ रोख पारितोषिकं, तसंच
४६ हजार १४४ विद्यार्थ्यांना पदवी आणि २३६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देश विकासाच्या वाटेवर असून जगात भारताची प्रतिमा
उंचावली असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वने, श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी
म्हटलं आहे. केंद्र सरकारने नऊ वर्षात केलेल्या कार्यासंदर्भात ते आज चंद्रपूर इथं
पत्रकारांशी बोलत होते. देशात २०१४ पूर्वी ९१ हजार किलोमीटर महामार्ग झाले होते. मात्र,
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून
गेल्या नऊ वर्षात ५४ हजार किलोमीटर महामार्ग तयार झाल्याचं यादव यांनी सांगितलं. या
काळात देशात १११ नवे जलमार्ग तयार झाले. २०१४ पूर्वी देशात फक्त ५ मेट्रो धावत होत्या,
२०१४ नंतर १५ शहरात मेट्रो सुरू केल्या, तसंच गेल्या नऊ वर्षात नवीन ७०० रुग्णालयं
सुरू केल्याची माहिती यादव यांनी दिली.
****
कोरोना
काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या
व्यवहारांचीही चौकशी करावी असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला
दिलं आहे. मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला
संबोधित करताना त्यांनी हे आव्हान दिलं. कोरोना काळात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू
होता. त्यानुसार सर्व काही उपाययोजना केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पाटण्यातल्या
बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याबद्दल भाजपने केलेल्या
टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. समान नागरी कायदा लागू करताना तसंच तपासणी करतानाही
समान निकष लावा. केवळ विरोधकांच्या नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या आरोपांचीही
केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
****
केंद्र
सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं अमृत अभियानांतर्गत नवी
मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांना केंद्रीय अमृत अभियान पथकानं
आज भेट दिली. या अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेनं कोपरखैरणे आणि ऐरोली इथल्या
सी टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलजलप्रक्रिया केंद्र उभारली आहेत. या पाण्याच्या
वापराविषयीची माहिती पथकानं यावेळी घेतली.
****
वैद्यकीय
शिक्षण विभागानं राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि संलग्न रुग्णालयांना
उपलब्ध सुविधा आणि मासिक कामगिरीच्या आधारावर पहिल्यांदाच मानांकन दिलं आहे. त्यानुसार
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आणि संलग्न सर्वोपचार रुग्णालयाला गोल्ड श्रेणीत
स्थान मिळालं आहे. या यादीत अकोला जीएमसी अर्थात सामान्य वैद्यकीय परिषदेला सहावं स्थान
मिळालं आहे.
****
परकीय
व्यापार महासंचालनालय अर्थात डीजीएफटीनं भारतातील नागरी वापरासाठी उपयुक्त ड्रोन निर्यात
धोरण शिथिल केलं आहे. भारताच्या परकीय व्यापार धोरण २०२३ मध्ये उच्च तंत्रज्ञान उत्पादनांच्या
निर्यात सुलभीकरणाच्या अनुषंगानं हा निर्णय घेतल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं
दिली आहे. या धोरणात बदल केल्यामुळं भारताला जागतिक पटलावर ड्रोन उत्पादक म्हणून चालना
मिळेल तसंच स्टार्ट-अप आणि नवीन ड्रोन उत्पादक व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल असं
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
म्हाडाच्या
मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या चार हजार ८२
सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. इच्छुक अर्जदारांना
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणि अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी आता १० जुलैपर्यंत मुदतवाढ
दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार १० जुलै संध्याकाळी सहा वाजेपर्यंत
ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील, तर रात्री १२ वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करता
येणार आहे.
****
येणाऱ्या
सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी नागरिकांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटविषयी
वस्तूनिष्ठ माहिती व्हावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती
करावी असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. ‘विशेष
संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- २०२४, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी’
या विषयावर यशदा इथं सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक
अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली, या कार्यशाळेत देशपांडे मार्गदर्शन करत होते.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या तंत्रज्ञानाविषयी वस्तुनिष्ठ माहिती होण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये
शिबीरं आणि प्रश्नमंजूषा आयोजित करावी. प्रचार प्रसिद्धीसाठी निवडणूक प्रक्रियेविषयी
माहिती देणारे छोटे-छोटे भाग करुन चित्रफिती तयार कराव्यात आणि समाजमाध्यमांचा वापर
करावा अशा सूचना देशपांडे यांनी यावेळी दिल्या.
****
येत्या
२६ जून रोजी येणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या
वतीनं जनजागृती सप्ताह पाळण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी नाशिक पोलीस
आयुक्तालय आणि नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. पंचवटी
परिसरातून निघालेल्या या सायकल फेरीचा पोलिस कवायत मैदानावर समारोप झाला. यावेळी उपस्थितांनी
आपलं शहर, राज्य आणि देश अंमली पदार्थ मुक्त करण्याची शपथ घेतली.
****
धुळे
पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं बनावट आणि बेकायदेशीर दारूसाठा कंटेनरसह
३१ लाख ४९ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment