आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ जून २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
आपल्या कृतीतून
सामाजिक समतेचा संदेश देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज सामाजिक न्याय
दिन म्हणून साजरी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून
शाहू महाराजांना अभिवादन केलं आहे.
सामाजिक न्याय
दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड
महापालिकेच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रबोधन पर्वाचं आयोजन करण्यात आलं
आहे. तर यवतमाळमध्ये सामाजिक न्याय दौड काढण्यात आली.
लातूर शहर महापालिकेतर्फे
नांदेड मार्गावर शाहू महाराज चौकात उभारण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती
पुतळ्याचं लोकार्पण आज होत आहे. महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी ही माहिती
दिली.
****
अमेरिका आणि
इजिप्तचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले. मोदी यांच्या
स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर अनेक नेत्यांबरोबरच समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सीसी यांच्याशी
कैरो इथं द्विपक्षीय चर्चा केली.
****
स्मार्ट शहर
योजनेला काल आठ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार
मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या योजनेचं कौतुक केलं. एक लाख ८० हजार कोटी रुपयांची
ही योजना शहरी भागांसाठी अतिशय महत्वपूर्ण असल्याचं पुरी यांनी आपल्या ट्विट संदेशात
म्हटलं आहे.
****
ट्युनिसमध्ये
झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या सुतिर्था मुखर्जी आणि ऐहिका मुखर्जी
या जोडीनं महिलांची दुहेरी स्पर्धा जिंकली आहे. त्यांनी जपानी जोडीचा तीन - एक असा
पराभव केला.
****
जर्मनीत दिव्यांगांसाठीच्या
विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धेची काल सांगता झाली. या स्पर्धेत भारतानं १९१ पदकांची
कमाई केली.
****
No comments:
Post a Comment