Friday, 30 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 30.06.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या पहिल्या तुकडीला नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी झेंडा दाखवला. जम्मूतल्या भगवतीनगर बेस कँपवरून या तुकडीची मार्गक्रमणा सुरू झाली आहे. कडक सुरक्षाव्यवस्थेत आणि सुरक्षा दलांच्या ताफ्यासह निघालेली ही तुकडी आज संध्याकाळी बालटाल आणि ननवान तळांवर पोहोचेल. उद्यापासून तिचा प्रवास अमरनाथच्या दिशेनं सुरु होईल.

****

दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सांगता होणार आहे. विद्यापीठाचं औद्योगिक संकुल, संगणक केंद्र यांचा कोनशिला समारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

****

केंद्र सरकारचा गेल्या नऊ वर्षांचा कालावधी गरीब कल्याणासह देशासाठी अभिमानाचा आणि सुरक्षित भारताचा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बिहारमधल्या लखीसरायमध्ये आयोजित जनसभेला ते काल संबोधित करत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालच्या सरकारनं देशानं विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याचं शहा म्हणाले.

****

केंद्रीय खनिज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतातल्या महत्वपूर्ण खनिजांची यादी  प्रसिद्ध केली. संरक्षण, कृषी, उर्जा, औषधनिर्मिती आणि टेलिकॉम अशा क्षेत्रांसाठी महत्वाच्या खनिजांची ही यादी, खाणकाम क्षेत्रातलं धोरणात्मक नियोजन आणि गुंतवणूक याबाबतीतील निर्णय घेताना मार्गदर्श ठरेल.

****

आधार कार्ड आधारित चेहरा प्रमाणीकरण व्यवहारांची संख्या यावर्षीच्या मे महिन्यात एक कोटी ६ लाखावर पोचली आहे. अशा तऱ्हेचे व्यवहार सलग दुसऱ्या महिन्यात १ कोरीच्या वर पोचले आहेत असं इलेक्‍ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान  मंत्रालयांन सांगितलं आहे. हि सुविधा ऑक्टोबर २०२१ पासून सुरु झाली होती.

****

केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी अंशदान देण्याचा तसंच ऊसाची एफआरपी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. या निर्णयाचं राज्यातल्या शेतकऱ्यांनीही स्वागत केलं आहे.

//***********//

 

No comments: