Wednesday, 28 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 28.06.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारतात समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.ते काल भोपाळमध्ये ‘मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात बोलत होते. वेगवेगळ्या समुदायांसाठी वेगवेगळे कायदे ठेवण्याच्या दुहेरी प्रणालीद्वारे देशाचं कामकाज चालू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष मतांचं राजकारण करत आहेत, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

फास्टटॅगच्या वापरामुळे सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांच्या इंधनाची बचत झाल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पथकर भरताना वाहनं बराच वेळ रांगेत उभी राहण्यामुळे जे इंधन वाया जात होतं ते फास्ट टॅगमुळे वाचतं आणि त्यामुळे इतकी बचत होते, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

****

येत्या अठ्ठेचाळीस तासात मुंबईसह कोकण आणि गुजरातच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.याशिवाय मध्य भारतातल्या बहुतांश राज्यांमध्ये, केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं काल नवी दिल्ली इथं संशोधन  चिंतन शिबीराचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात सरंक्षण तंत्रज्ञानातील स्वदेशी नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या ७५ क्षेत्रांची यादी जाहीर करण्यात आली. या प्रसंगी वर्तमान आणि भविष्यातील प्रायोगिक विकासाला सूचीबद्ध करण्यासाठी "डी आर डी ओ तंत्रज्ञान दूरदृष्टी 2023" हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.

****


खान्देशातल्या जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव इथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...