Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 June 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ जून
२०२३ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी, आज भोपाळ इथल्या राणी कमलापती रेल्वे स्थानकात, पाच वंदे भारत
रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये, मडगाव ते मुंबई; या गोव्यासाठीच्या
पहिल्या वंदे भारत रेल्वेसह, राणी कमलापती स्थानक ते जबलपूर, खजूराहो ते भोपाळमार्गे
इंदोर, धारवाड ते बंगळुरू आणि हतिया ते पाटणा, या गाड्यांचा समावेश आहे. मुंबई-मडगाव
या वंदे भारत एक्सप्रेसमुळे, मुंबई ते मडगाव या प्रवासाला लागणारा वेळ, एका तासानं
कमी होणार असून, दोन्ही ठिकाणच्या पर्यटनाला आणखी चालना मिळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान,
भोपाळ इथं आज मेरा बूथ, सबसे मजबूत मोहिमेअंतर्गत पंतप्रधानांनी, देशभरातल्या ५४३ लोकसभा
जागांवर, आणि मध्य प्रदेशातल्या ६४ हजार बूथवरच्या १० लाख कार्यकर्त्यांशी, दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मध्य प्रदेशचे
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक
कार्यकर्त्यासाठी देशहित सर्वात प्रथम असल्याचं, मोदी यावेळी म्हणाले. केंद्र सरकारला
नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, देशभरात राबवण्यात येणार्या कार्यक्रमांबद्दल, त्यांनी
पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.
****
औरंगाबादच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ आज होत आहे. राज्यपाल
तथा कुलपती रमेश बैस, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, या कार्यक्रमात सहभागी झाले
आहेत. यावेळी ६० हजार स्नातकांना पदवीचं वितरण करण्यात आलं. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले,भारतीय
विद्यापीठ महासंघाच्या सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल, प्र - कुलगुरु शाम शिरसाठ यावेळी
उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध असल्याचं, कुलगुरु येवले यांनी
यावेळी सांगितलं. आजच्या बदलत्या काळात कठोर परिश्रम करण्याची विद्यार्थ्यांनी तयारी
ठेवावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
तेलंगणाचे
मुख्यमंत्री, भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी आज पंढरपूर इथं
श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज
यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूरनजिक
सारकोली इथं राव यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते भगीरथ भालके बीआरएस पक्षात प्रवेश केला.
****
कोल्हापूर
इथल्या राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट च्या वतीनं देण्यात येणारा, ३७ वा राजर्षी शाहू
पुरस्कार, वैद्यकीय क्षेत्रातले समाजसेवक, डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग, यांना शाहू
महाराज छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानचिन्ह,
असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री दीपक केसरकर,
तर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित
होते. दारुबंदी, तंबाखू मुक्ती यांसह वैद्यकीय क्षेत्रासाठी आणि आदिवासी समाजासाठी,
डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांनी केलेलं कार्य मोलाचं आहे, अशा शब्दांत केसरकर यांनी
त्यांच्या कार्याचा गौरव केला.
****
मत्स्यपालन,
पशुपालन आणि दुग्धोत्पादन मंत्री परषोत्तम रूपाला यांनी, काल नंदी नावाच्या नवीन पोर्टलचं
उद्घाटन केलं. या पोर्टल मध्ये, पशुपालकांनी वापरायला हरकत नसलेल्या पशुविषयक नवीन
औषधांचा, आणि लसीकरणाच्या नवीन पद्धतींचा समावेश आहे. हे पोर्टल या नवीन औषधांच्या
आणि लसीकरणाच्या अनुमतीची प्रक्रिया, अधिक कार्यक्षम बनवण्याच्या, आणि त्या माध्यमातून,
देशातल्या पशु स्वास्थ्य क्षेत्रात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं सुरु केलं आहे.
****
यंदाच्या
बकरी ईद अर्थात ईद-उल-झुआ या सणासाठी, राज्य शासनानं शासकीय कार्यालयांना, येत्या गुरुवारी
२९ जून रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागानं अधिसूचना
जारी केली आहे.
****
राज्यात
खरीप हंगामातलं सरासरी पेरणीचं क्षेत्र १५२ पूर्णांक ९७ लाख हेक्टर असून, प्रत्यक्षात
दोन पूर्णांक २६ लाख हेक्टर, म्हणजे एक पूर्णांक ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात पाऊस झाला, तर पेरणीच्या कामाला वेग येईल,
अशी माहिती, कृषी विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण यांनी काल दिली आहे.
****
No comments:
Post a Comment