Monday, 26 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 26.06.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 26 June 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २६ जून  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      सर्वसामान्य माणूस सुखी व्हावा, हा आमच्या सरकारचा अजेंडा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन

·      सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

·      ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र शोभणे यांची निवड

·      भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार-कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सांगली इथल्या मेळाव्यात टीका

·      जालना शहरात रस्ता अपघातात तीन बालकं ठार;औरंगाबाद इथं दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

आणि

·      नैऋत्य मोसमी पाऊस राज्यभरात सक्रीय

सविस्तर बातम्या

राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी व्हावा, हा आमच्या सरकारचा अजेंडा असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल नांदेड इथं शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार लोकांच्या चिरंतन स्मरणात राहतं, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले 

 

Byte..

आमच्या अजेंडा एकच आहे, या राज्याचा सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. हेच तर सरकारचं काम असतं. नाहीतर सरकार कशासाठी? सरकार कुणासाठी? सरकारं येतात, सरकारं जातात, सरकारं बदलतात. परंतू हे सरकार लोकांसाठी काम करतं. तेच सरकार कायम लोकांच्या आठवणीमध्ये चिरंतन राहतं. हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

 

अबचलनगर मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेअंतर्गत, ४३६ कोटी ४८ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचं काल भूमिपूजन करण्यात आलं. शहरातल्या मलनि:स्सारण वाहिन्यांच्या बळकटीकरणाच्या कामांसह, रस्ते विकास कामांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ४३० किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलनि:स्सारण वाहिनीची जोडणी तसंच महानगरपालिका हद्दीतल्या १८२ रस्त्यांची कामं याअंतर्गत होणार आहेत.

****

दरम्यान, ठाणे इथं महानगरालिकेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते काल झालं. राज्यातल्या जनतेला विकासकामं हवी आहेत, त्यांना आरोप प्रत्यारोपात रस नाही, असं ते म्हणाले. पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख विकासकामं हे सरकारचं प्राधान्य असून, अधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी लावून कामं करण्यासाठी तयार राहावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

****

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली. सर्व प्रमाणपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरी आणि क्यूआर कोड वापरण्यात येणार आहे. डिजिटल प्रमाणपत्रांमुळे परीक्षा परिषदेची आर्थिक बचतही होणार असल्याचं ते म्हणाले. परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी, टायपिंग आदी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रं तयार करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत, असे प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील परीक्षेपासून विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी घेऊन त्यावरच प्रमाणपत्र पाठवण्यात येणार असल्याचं बेडसे यांनी सांगितलं.

****

विदर्भातील आघाडीचे ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे तसंच मनसेचे रमेश राजूरकर यांनी काल चंद्रपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी इथं भाजपाच्या महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत काल लाभार्थी संमेलन घेण्यात आलं. मध्य प्रदेशातल्या खासदार कल्पना सैनी आणि आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या हस्ते या संमेलनात, शासनाच्या विविध योजनांचा ४७० जणांना लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि आदिवासींना विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्यात आल्याचं, खासदार कल्पना सैनी यांनी यावेळी सांगितलं.

****

आणीबाणीमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी देशाने मोठा संघर्ष केला, अनेकांच्या बलिदानामुळे लोकशाहीची पुनर्स्थापना झाली, असं प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथं काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रबुद्ध नागरिक संमेलन घेण्यात आलं, देशात आणिबाणी लागू केल्याच्या घटनेला काल ४८ वर्ष झाली, त्याअनुषंगानं गडकरी या संमेलनात बोलत होते. आपल्या देशात धर्मांची, जातींची विविधता आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही, असं प्रत्येकाच्या लेखी राष्ट्रहितालाच प्राधान्य असायला हवं, असंही गडकरी म्हणाले.

दरम्यान, प्रबुद्ध भारत कार्यक्रमांतर्गत काल औरंगाबाद इथं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचं भाषण झालं, औरंगाबादचं नाव बदलण्यासाठी ७५ वर्ष लागली, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आणिबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर त्यांनी कडाडून टीका केली.

****

केंद्रशासित प्रदेशांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल अंदमानात पोर्टब्लेअर इथं बोलत होते. अंदमान निकोबारमध्ये पर्यटन उद्योगाला चालना मिळावी, यासाठी पोर्टब्लेअर इथल्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सुविधा सुरु करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण नागरी विमान वाहतुकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेणार असल्याचं, आठवले यांनी सांगितलं. अंदमानात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रध्वजाला आठवले यांनी मानवंदना दिली.

****

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार रविंद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. काल पुणे इथं झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे, ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर, समीक्षक डॉ ऋषीकेश कांबळे यांच्या नावावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. संमेलनाच्या तारखाही यावेळी निश्चित करण्यात आल्या. थोर लेखक साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं पुढच्या वर्षी दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन होणार आहे.

****

भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीका, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. काल सांगली इथं काँग्रेस पक्षाचा महानिर्धार शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहु महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली, संविधान नसतं तर दीनदलित, शोषित, वंचित वर्ग मुख्य प्रवाहात आला नसता, असं सिद्धरामय्या म्हणाले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली. सरकारने पंढरपूरात जागोजागी लावलेले पोस्टर तातडीने काढून टाकावेत, अशी मागणी पटोले यांनी केली.

दरम्यान, पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळु उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांची त्यांनी काल पाहणी केली, हा प्रश्न आपण विधान परिषदेमध्येही उपस्थित करु, असं मिटकरी यांनी सांगितलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे भारत राष्ट्र समिती -बी एस आर पक्षात प्रवेश करणार आहेत. पंढरपूर इथं कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर भालके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या २७ जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला येणार आहेत. या दिवशी पंढरपूर तालुक्यात सरकोली इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बीएसआर पक्षात प्रवेश करणार असल्याचं भालके यांनी सांगितलं. त्यांच्या या निर्णयाचं पंढरपूर तसंच मंगळवेढा इथल्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे.

****

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण काल अकलूज जवळ खुडूस फाटा इथं साजरं झालं. मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात हजारो वारकरी आणि भाविकांनी हा सुखद रिंगण सोहळा अनुभवला.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं जबरी चोरी करून दोन जणांना ठार मारणाऱ्या आरोपीला काल पोलिसांनी अटक केली. शेवगांव इथल्या मारवाडीगल्लीत २३ जूनला आरोपीनं दोन जणांना ठार करून चार लाख ९५ हजार रुपयांची चोरी केली होती. संशयीत आरोपी हा पैठण तालुक्यातल्या म्हारोळा बिडकीन, इथला सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध सात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

****

जालना शहरातल्या अंबड चौफुली बायपास मार्गावरच्या उड्डाण पुलावर ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तीन बालकांचा मृत्यू झाला. काल संध्याकाळच्या सुमारास सय्यद शोएब सय्यद खैर हे आपल्या दोन मुलांसह नातेवाइकांच्या दोन मुलांना दुचाकीवरून घेऊन जात असताना, भरधाव आयशरनं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात सात वर्षीय नुरेन फातेमा सादेक शेख, आणि पाच वर्षीय आयेजा फातेमा सादेक शेख, आणि अदाबिया फातेमा सय्यद शोएब यांचा मृत्यू झाला, तर सय्यद शोएब सय्यद खैर यांच्यासह अन्य एक मुलगा गंभीर जखमी झाला. हे सर्वजण जुना जालन्यातल्या ट्टुपुरा भागातले रहिवासी असल्याचं पोलीसांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या डवाळा इथं पोहण्यासाठी खड्ड्यातल्या पाण्यात उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. १५ वर्षीय आयुष पडवळ आणि १८ वर्षीय शाहिद इरफान सय्यद हे दोघे बकऱ्या चारण्यासाठी गेले असता, ही दुर्घटना घडली.

****

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथं ट्रकने मॅजिक प्रवासी रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षातल्या आठ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. काल दुपारच्या सुमारास दापोली - हर्णे मार्गावर आसूद इथं हा अपघात झाला.

*****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या ढोरकीन औद्योगिक वसाहतीत, पोलिसांनी काल धाड टाकत गोमांस हस्तगत केलं, तसंच ५० गायी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीसांचं विशेष पथक तसंच स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात इगतपुरी सिन्नर मार्गावर गोमांस घेऊन जाणाऱ्या गाडीवर काल अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****


नाशिक इथं अवैध मद्यसाठ्याची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करत, राज्य उत्पादक शुल्क विभागानं, एक कोटी ९० हजार रुपयांचा मद्यसाठा आणि मुद्देमाल जप्त केला. विंचूर चौफली आणि विल्होळी अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केल्याचं, राज्य उत्पादक शुल्क विभागानं कळवलं आहे. याप्रकरणी ट्रकचालक, क्लिनरसह मद्यपुरवठादार आणि मद्य खरेदीरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

नैऋत्य मोसमी पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे शाखेचे विभागप्रमुख डॉ. के. होसाळीकर यांनी ही माहिती दिली. दरवर्षी सरासरी एक जून दरम्यान मोसमी पाऊस केरळात, तर १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा मात्र आठ जूनला मान्सून केरळात आणि त्यानंतर ११ जून रोजी तो  तळकोकणात दाखल झाला होता. मात्र बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कित्येक दिवस तो तिथेच रखडला होता. काल नेहमीपेक्षा सुमारे दहा दिवस उशीराने मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. पुढच्या चार दिवसांत कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या

 

Byte…

गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. मान्सून सक्रिय असल्यामुळे एवढा पाऊस झाला. आणि आजची विशेष बातमी ही आहे की पंचवीस जूनला मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे.

****

खान्देशची जीवनदायनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापी नदीचा प्रकटदिन काल नंदुरबार जिल्ह्यात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातल्या संगमेश्वर इथं जन्मोत्सव निमित्त भाविकांनी मोठ्या उत्साहात नदीचं कृतज्ञतापूर्वक पूजन केलं तसच अडीचशे मीटर लांबीच्या साडीसह सोळा शृंगार अर्पण करण्यात आले. शेती आणि समाज जीवन समृद्ध करणाऱ्या नदीचं ऋण फेडण्यासाठी महिला भाविकांकडून तापी जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.

****

हैदराबाद विभागात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रेल्वे सुविधांच्या कामामुळे सुमारे आठवडाभर `लाईन ब्लॉक` घेण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड विभागातल्या काही रेल्वे रद्द, तर काही, अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. निझामाबाद - नांदेड रेल्वे आजपासून दोन जुलै पर्यंत, आणि नांदेड - निझामाबाद रेल्वे आजपासून ते एक जुलै पर्यंत रद्द करण्यात आली आहे. धर्माबाद - मनमाड मराठवाडा रेल्वे एकोणतीस तारखेपर्यंत, धर्माबाद ते मुदखेड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. जालना इथून सकाळी ११ वाजून ५० मिनिटानी सुटणारी जालना - तिरुपती विशेष रेल्वे सुमारे सहा तास उशिरा म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जालना इथून सुटणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

No comments: