Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जून २०२३
सायंकाळी ६.१०
****
·
राज्यात आषाढी एकादशी आणि ईद-उल- जुहा अर्थात बकरी ईदचा सण मोठ्या
उत्साहानं साजरा.
·
औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात नवे तीन प्रकल्प उभारण्यात येणार-
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड.
·
राज्यात कायदा आणि सुविधेचा प्रश्न गंभीर - शरद पवार यांची टीका.
आणि
·
गंगापूर - खुलताबाद मधल्या गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या
कामाचा उद्या प्रारंभ.
****
राज्यात
आषाढी एकादशी आणि ईद-उल- जुहा अर्थात बकरी ईदचा सण आज मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात
येत आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज विविध मंदिरांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
करण्यात येत आहे. शहराचं अराध्य दैवत, प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री.आनंदी स्वामी
महाराज मंदिरात आषाढी निमित्त गेल्या आठवड्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
आज पहाटं ढोल ताशांच्या गजरात आंनदी स्वामी महाराजांची भव्य पाखली मिरवणूक काढण्यात
आली. जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी दर्शनासाठी गर्दी
केली असून, पालखी नगरप्रदिक्षणा करून रात्री मंदिरात येणार आहे.
****
आषाढी
एकादशीनिमित्त हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथं संत नामदेव महाराजांच्या समाधीचं
दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.
****
आषाढी
एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा शुभ
दिवस आपल्या वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची
प्रेरणा देवो अशी प्रार्थना त्यांनी या संदर्भातल्या आपल्या संदेशात केली आहे. भगवान
विठ्ठलाच्या आशिर्वादानं सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी
आपल्याला नेहमी एकत्र काम करता येवू दे, असं पंतप्रधान मोदी यांनी पुढं म्हटलं आहे.
****
ईद-उज-जुहा
अर्थात बकरी ईद ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सकाळी विविध ठिकाणच्या
इदगाह मैदान आणि मस्जिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली.
****
औरंगाबाद
औद्योगिक क्षेत्रात नवे तीन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ
राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत दिली. इलेक्ट्रीक
स्कूटर उत्पादनात देशातली अग्रगण्य कंपनी असलेली ॲथर ही कंपनी ८५० कोटी रुपयांचा इलेक्ट्रीक
स्कूटर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यामुळं तीन हजार जणांना प्रत्यक्षात तर तीन हजार
५०० जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असं ते म्हणाले. कॉस्मो फिल्म औरंगाबादमधल्या
बिडकीनमध्ये दिडशे एकर जागेवर एक हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प उभारणार आहे.
या माध्यमातून ७५० जणांना प्रत्यक्ष तर एक हजार जणांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार
असल्याचं त्यांनी सांगितलं. पिरॅमल फार्मा १४० एकर जागेवर एक हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा
प्रकल्प उभारणार असून या मध्यमातून एक हजार जणांना प्रत्यक्ष तर दोन हजार जणांना अप्रत्यक्षपणे
रोजगार मिळणार असल्याचं डॉ. कराड म्हणाले. औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात ड्रोन क्लस्टर
झोन तयार करण्यात येणार असून याला गोदावरी क्लस्टर असं नावं देण्यात आलं आहे. तसंच
सैन्याच्या सुरक्षा साधनांच्या निर्मीतीच्या क्लस्टरसाठीही केंद्र सरकार प्रयत्नरत
असल्याचं डॉ. कराड यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्र
सरकारनं महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. विधीमंडळ आणि संसदेत महिलांना आरक्षण दिलं
जावं, असं ते पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिला आणि मुलींवरचे हल्ले वाढले आहेत. मुली, महिला मोठ्या
संख्येनं बेपत्ता आहेत, असं ते म्हणाले. राज्यात जात -धर्माच्या नावावरुन दंगली सुरू
आहेत. त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य
करण्या ऐवजी सुरक्षे संदर्भात खबरदारी घ्यावी, असंही पवार म्हणाले. आपण ‘गुगली’वर देवेंद्र
फडणवीस यांची विकेट घेतल्याचं त्यांनी राज्यातल्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात नमुद
केलं. सरकार स्थापन करण्यासंदर्भात आपली चर्चा झाली. आपण निर्णय बदलला होता असं फडणवीस
म्हणत आहेत तर त्यांनी चोरुन शपथ का घेतली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. समान
नागरी कायद्याच्या मुद्यावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही यावेळी टीका
केली. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर मोदी यांची अस्वस्थता वाढली असल्याचं ते म्हणाले.
येत्या १३ आणि १४ जुलै रोजी बंगळुरू इथं विरोधी पक्षांची पुढची बैठक होईल, असं पवार
यांनी सांगितलं.
****
दक्षिण
मध्य रेल्वे चालवत असलेल्या काही विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये
काझीपेट - दादर - काझीपेट, तिरुपती - साई नगर शिर्डी - तिरूपती, नांदेड - लोकमान्य
टिळक टर्मिनस मुंबई - नांदेड आणि नांदेड - इरोड - नांदेड या गाड्यांचा समावेश आहे.
****
तामिळनाडू
मधल्या तांबरम इथून झारखंड मधल्या धनबादला जाण्याकरिता उद्या रात्री दहा वाजता विशेष
रेल्वेची एक फेरी चालवण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार
ही गाडी सिकंदराबाद, नांदेड, हिंगोली, अकोला, जबलपूरमार्गे धावेल. उद्या तांबरम इथून
सुटणारी ही गाडी तीन जुलैला धनबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी चार जुलैला
धनबाद इथून सुटेल आणि सहा जुलैला तांबरमला पोहचेल, असं रेल्वेनं कळवलं आहे.
****
केंद्र
सरकारच्या जल जीवन अभियानाअंतर्गत ‘हर घर, नल से जल’ अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या
गंगापूर - खुलताबाद मधल्या गावांसाठी एक हजार ७५ कोटी रुपये निधीतून पाणी पुरवठा योजना
तयार करण्यात येत आहे. या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा औपचारिक प्रारंभ उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सकाळी दहा वाजता गंगापूर इथं होत आहे. एक हजार
किलोमीटरच्या अंतराची जलवाहिनी यामध्ये टाकण्यात येणार असून थेट जायकवाडी धरणातून गंगापूर
- खुलताबाद तालुक्यातल्या गावांना नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार आहे. ही योजना
८० टक्के सौर उर्जेवर चालणार असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली आहे.
****
राज्य
परिवहन महामंडळाच्या पनवेल-पेण बसला आज मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात शिराढोण
पुलावर भीषण अपघात झाला. निसरड्या रस्त्यामुळं ही बस दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजुला
गेली. या वेळी समोरून येणाऱ्या एका खासगी कंपनीच्या बसवर एसटी बस जाऊन आदळली. यामध्ये
एसटी चालक गंभीर जखमी झाला आहे. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रवाशांना
नजिकच्या उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
****
नंदुरबार
जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात डोंगरगाव - शहादा मार्गावर आज गाडी उलटून झालेल्या अपघातात
दोघांचा मृत्यू झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही गाडी उलटून रस्त्याच्या विरुद्ध
दिशेला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला.
****
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर कुलपती नियुक्त सदस्य म्हणून किशोर
शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल, कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती
केली आहे. शितोळे हे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य असून देवगिरी बँकेचे अध्यक्ष म्हणून
कार्यरत आहेत. अधिसभेवर कुलपती नियुक्त दहा सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. या नियुक्तीद्वारे
त्याची पूर्तता झाल्याचं विद्यापीठातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
भारतीय
कबड्डी संघानं दक्षिण कोरियात सुरू आशियाई विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश
केला आहे. स्पर्धेत आज सलग चौथा विजय नोंदवताना भारतानं रंगलेल्या सामन्यात इराणवर
३३-२८ अशी मात केली. या आधीच्या सामन्यांत भारतानं दक्षिण कोरिया, चिनी तैपेई आणि जपानचा
पराभव केला आहे. बुसान इथं आयोजित या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले असून उद्या
अंतिम सामना होणार आहे. भारतानं या स्पर्धेच्या इतिहासात सातपैकी सहा वेळा विजेतेपद
पटकावलं आहे.
****
हिंगोलीच्या
कळमनुरी तालुक्यातल्या बेलमंडळ इथं आज पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ३ लाख ८१ हजार ५२०
रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या पथकानं
सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान बेलमंडळ इथल्या नवी आबादीतल्या एका घरावर छापा मारुन ही
कारवाई केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी
विनोद नरवाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
भीम
आर्मी आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये
झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात अनुसूचित जाती-जमाती संघटनांनी
एकत्र येत आंदोलन केलं. शहरातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत
आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment