Wednesday, 28 June 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.06.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 June 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ जून २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना सर्व शिधापत्रिका तसंच अधिवास प्रमाणपत्र धारकांना लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

·      औरंगाबाद इथं मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं भव्य स्मारक उभारण्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता.

·      पुढच्या हंगामासाठी ऊसाचा एफआरपी वाढवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.

·      बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा, तर आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर नगरी सज्ज.

आणि

·      राज्यभरात आज सर्वत्र पाऊस, पेरणीच्या कामांना वेग.

****

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यातल्या सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. या निर्णयामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून, या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून पाच लाख रूपये इतकं करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.

सध्याच्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य या एकात्मिक योजनेत काही बदल करून योजनेचं विस्तारीकरण करून सुधारणा करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे केंद्र आणि राज्याची एकत्रित योजना राबवणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये असलेली उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण अडीच लाखांवरुन आता साडे चार लाख रूपये एवढी करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

****

औरंगाबाद इथं मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं भव्य स्मारक उभारण्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या खर्चाला देखील राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. हे स्मारक शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर लेबर कॉलनी परिसरात उभारण्यात येणार आहे. याशिवाय मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांत अयोजित करायच्या कार्यक्रमांसाठी प्रत्येक जिल्ह्याला ५० लाख रुपये निधी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

 

जालना ते जळगाव दरम्यानच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी तीन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यात नऊ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालयं निर्माण करण्याचा, गंगापूर उपसा सिंचन योजना राबवण्याचा, नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडसह सात ठिकाणी न्यायालयं स्थापन करण्याचा, तसंच वैजापूर तालुक्यातल्या मौजे वांजरगाव इथं कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत वर्सोवा- वांद्रे या सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचं नाव देण्याचा तर शिवडी न्हावा शेवा सेतूला माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.

 

राज्यात ७०० ठिकाणी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.

राज्यातल्या कोट्यवधी असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी असंघटीत कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याचा, आणि त्याअंतर्गत व्यवसाय उद्योग क्षेत्रनिहाय ३९ आभासी मंडळं स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

राज्यात औरंगाबादसह पुणे, नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या, उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यात सुमारे एक लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यामध्ये पुणे आणि औरंगाबाद इथं देशातल्या पहिल्या सुमारे १२ हजार ४८२ कोटीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. नवी मुंबईच्या महापे इथं होणाऱ्या जेम्स अॅण्ड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे.

****

पुढच्या हंगामासाठी ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं घेतला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या हंगामासाठी ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रती क्विंटल दहा रुपये वाढ करण्यात येणार आहे. मंजूर झालेला दर साखर कारखान्यांद्वारे गाळप हंगाम २०२३-२४ साठी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या ऊसाकरता येत्या एक ऑक्टोबरपासून लागू होईल.

****

सल्ला मसलत करून देशातल्या सर्व समुदायांसाठी वैयक्तिक कायद्यांमध्ये सुधारणा करून, लिंगभाव समानता संहिता निर्माण करावी, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी, कायदा आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे. समान नागरी कायद्याच्या मसुद्याविषयी आयोगानं नागरीकांची मतं मागितली असून, गोऱ्हे यांनी यासंदर्भात हे पत्र पाठवलं आहे. देशात विवाह, भागीदारी, दत्तक घेण्याचा अधिकार, घटस्फोट, मुलाचा ताबा, पोटगी यासंदर्भात वेगवेगळ्या धर्माचे तसंच मिझोरम, मणिपूर, गोवा यांसारख्या राज्यांचे वेगवेगळे कायदे आहेत. लिंग आणि धर्माची पर्वा न करता सर्वांसाठी वैयक्तिक बाबी नियंत्रित करणाऱ्या कायद्यांचा एक समान संच तयार करणं, हे समान नागरी कायद्यातून अपेक्षित असल्याचं, गोऱ्हे यांनी नमूद केलं.

****


उद्या साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-झुआ अर्थात बकरी ईद निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देतो, ईद साजरी करताना समाजातल्या उपेक्षित, वंचित घटकाच्या कल्याणाचा सर्वसमावेशक विचार केला आहे. यानिमित्तानं आपण सर्वजण समाजात ऐक्य आणि बंधुत्वासाठी तसंच मानवजातीच्या सेवेसाठी कार्य करू या, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

आषाढी एकादशीचा सोहळा देखील उद्या साजरा होत आहे. यानिमित्त होणाऱ्या यात्रेसाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली असून, जवळपास सगळ्याच पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. आषाढी एकादशीनिमित्त मुख्य शासकीय महापूजा उद्या पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

****

दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर अन्न आणि औषध प्रशासनानं आज पंढरपूर इथं भेसळयुक्त पेढा जप्त केला. विक्रीसाठी एका वाहनातून आणलेल्या पेढ्याची तपासणी केली असता, त्या पेढ्यात स्टार्च असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

****

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी आज शहरातल्या इंडो जर्मन टूल रुम या कंपनीच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्राला आणि उत्पादन निर्मिती केंद्राला भेट दिली. गोरगरीब विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण मिळावं याकरिता इंडो जर्मन टूल रुम मध्ये सारथी, महाज्योती तसंच इतर योजनांची सुविधा असल्यानं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भारतीय वायुसेनेतल्या सुखोई एसयु 30 या लढाऊ विमान पंखांचे संरचनात्मक भाग बनवण्यासह, एरोस्पेस, एरोनॉटिक्स, डिफेन्सच्या विविध प्रकल्पांमध्ये इंडो जर्मन टूल रूम चं अत्याधुनिक तंत्रज्ञानासह योगदान, ही औरंगाबाद शहरासाठी अभिमानास्पद बाब असल्याचंही ते म्हणाले. यावेळी खसदार जलिल यांनी विविध कौशल्याचं प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

****


राज्यभरात आज सर्वत्र पाऊस सुरु आहे.

मुंबई आणि उपनगर परिसरात आज सकाळपासून पावसानं जोर धरला आहे. कुलाबा वेधशाळेत ५७ मिलीमीटर पाऊस झाल्याची, तर सांताक्रूझ वेधशाळेत आज उपनगरात ३६ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. मुंबईतल्या उपनगरीय गाड्याही आज उशिरानं धावत असून, जागोजागी पाणी साचल्यानं काही ठिकाणची रस्ते वाहतूक इतर मार्गांनी वळवण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पेरणीची कामं चालू होतील म्हणून शेतकरी सुखावला आहे.

पालघर जिल्ह्यातही आज सकाळपासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपात पाऊस बरसत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातही आज दुपारच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

****

दक्षिण कोरियात सुरु असलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतानं जापनवर ६२ - १८ असा विजय मिळवला. या स्पर्धेतला भारताचा हा सलग तिसरा विजय आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...