Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जून २०२३
सायंकाळी ६.१०
****
·
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती राज्यभरात सामाजिक
न्याय दिन साजरी.
·
राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये सुसज्ज डिजिटल ग्रंथालय स्थापन
करण्याचा निर्णय.
·
आषाढी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी सोलापूर
जिल्हा प्रशासन सज्ज.
आणि
·
अकोला जिल्ह्यात बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाचा छापा; आठ
लाखाचा मुद्देमाल जप्त.
****
थोर
समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती, सामाजिक न्याय दिन म्हणून आज
राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या
शासकीय निवासस्थानी, शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
मुंबई
इथं मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
आज करण्यात आलं. २५० विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या या वस्तीगृहाला माता रमाई यांचं
नाव देण्याची घोषणा शिंदे यांनी केली.
वाशिम
जिल्ह्यातल्या मंगरुळपीर इथलं मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचं
शासकीय वसतीगृह आणि बार्टी अंतर्गत पुण्याच्या येरवडा संकुल इथल्या केंद्रीय लोकसेवा
आयोगाच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभही शिंदे यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे
केला.
विधान
सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी
विधान भवनात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
कोल्हापूर
इथं पालकमंत्री दीपक केसरकर, आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी,
‘लक्ष्मी विलास पॅलेस’ इथं, शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
केलं. शाहू महाराज समाधी स्मारक स्थळाच्या दुसऱ्या टप्यातल्या कामाचा शुभारंभही पालकमंत्री
दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. या टप्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह नुतनीकरण
तसच त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर कलादालनाची निर्मिती करण्यात
येणार आहे.
औरंगाबाद
इथं छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून विविध राजकीय पक्ष, सामाजिक
संघटना तसंच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
लातूर
इथं महानगरपालिकेच्यावतीने शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज अनावरण करण्यात
आलं. छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित घटकाला आरक्षण देवून त्यांना न्याय देण्याचे
कार्य केलं, तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाज घटकासाठी काम करण्यासाठी पाठबळ
दिलं, असं लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी म्हटलं आहे. शाहू महाराजांच्या पूर्णाकृती
पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. शाहू महाराजांचे विचार आजही सर्वांसाठी मार्गदर्शक
असून, त्या विचारांचा अंगीकार सर्वांनी करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
परभणी
इथं अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी शाहू महाराज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं.
यवतमाळ
इथं यानिमित्त रन फॉर सोशल जस्टिस, ही दौड काढण्यात आली. समाज कल्याणचे सहायक आयुक्त
भाऊराव चव्हाण यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. नंदुरबार इथ समता दौडचं आयोजन करण्यात
आलं, दरम्यान, तालुका क्रिडा संकुलात गावित यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना
व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
वाशिम
इथं शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यांत सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात
आला. या निमीत्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून समता दिंडी काढण्यात आली.
****
राज्यातल्या
उमरी आणि पोहरादेवी इथल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. तीर्थक्षेत्राच्या
कामांसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा
प्रशासनाने कार्यवाही करावी, असं शिंदे म्हणाले. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकास कामांसाठी
दानपत्राद्वारे मिळणारी जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
****
शबरी
आदिवासी घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्काचं घर मिळणं आवश्यक आहे, त्यासाठी
ही योजना मोहीमस्तरावर राबवण्यात यावी, अशा सूचना राज्याचे खनिकर्म मंत्री तथा नाशिक
जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केल्या आहेत. नाशिक इथं शबरी आदिवासी घरकुल
योजनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत, ते बोलत होते. जिल्ह्याला मिळालेल्या एकूण उद्दिष्टापेक्षा
अधिकच्या उद्दिष्टांची मागणी करण्यात यावी, जेणेकरून ग्रामीण भागातील कोणताही आदिवासी
बांधव शबरी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही, असं भुसे म्हणाले. सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी
योजनेच्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन अधिकाधिक घरकुलांचे प्रस्ताव मंजूर करावेत,
असे निर्देश भुसे यांनी दिले आहेत.
****
राज्यातील
शासकीय आश्रमशाळांमध्ये सर्व सुविधा आणि संदर्भ ग्रंथांनी युक्त अशी सुसज्ज डिजिटल
ग्रंथालय स्थापन केली जाणार आहेत. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
यांनी ही माहिती दिली. ते नंदूरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यात शासकीय मुलींच्या
वसतीगृह तसंच आश्रमशाळांच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन तसंच उद्घाटन प्रसंगी बोलत
होते. आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्व उच्च दर्जाचे साहित्य
उपलब्ध करुन देणार असल्याचं गावीत यांनी सांगितलं. यावर्षी राज्यात ५६ नवीन शाळांच्या
बांधकामास मंजूरी देण्यात आली असून, त्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक ३० शाळांचा
समावेश असल्याची माहिती गावित यांनी यावेळी दिली.
****
पंढरपूर
इथं आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा, येत्या २९ तारखेला साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी
लाखो भाविक पंढरपुरमध्ये दाखल होत आहेत. आषाढी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सोलापूर
जिल्हा प्रशासनाने ६५ एकर परिसरामध्ये मुक्कामाची सोय उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी
सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांची राहण्याची सोय होणार आहे. दिंडी सोबत आलेले वारकरी
दरवर्षी या परिसरात तंबू तसंच राहूट्या उभारून यात्रा कालावधीमध्ये मुक्कामी राहतात.
या ठिकाणी प्रशासनाने शुद्ध पेयजल, २४ तास वीजपुरवठा, मुबलक प्रमाणात स्वच्छतागृहे
आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
दरम्यान,
उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी चंद्रभागेत पोहोचलं आहे. त्यामुळे यात्राकाळात
येणाऱ्या वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नानाची सोय झाली आहे.
****
अंमली
पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्पपरिणाम समाजासमोर यावेत, अंमली पदार्थ्याच्या सेवनामध्ये
अडकलेली पिढी नशेच्या विळख्यातून बाहेर यावी, असं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक
सौरभ अग्रवाल यांनी म्हटलं आहे. आजच्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त घेण्यात
आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अंमली पदार्थांच्या सेवन, विक्री आणि वाहतकीवर निर्बंध
यावेत, असं अग्रवाल म्हणाले.
****
अंमली
पदार्थांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी धुळे पोलीस दलातर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली.
या फेरीत पोलिस अधिकारी, खेळाडू आणि शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या फेरीच्या
समारोपाप्रसंगी सर्व स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अंमली पदार्थ विरोधी
शपथ घेतली.
****
अकोला
जिल्ह्यातील तेल्हारा औद्योगिक वसाहतीत बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाच्या भरारी
पथकानं धाड टाकून आठ लाख पाच हजार ९५० रुपयांचा खताचा साठा जप्त केला आहे. पंचायत समिती
आणि कृषी विभागानं ही संयुक्त कारवाई केली असून या संदर्भात तेल्हारा पोलीस ठाण्यात
तक्रार दाखल करण्यात आली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारखान्याचे
संचालक राहुल नामदेव सरोदे यांच्याविरुद्ध शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
धुळे
जिल्ह्यातल्या पिंपळनेर पोलीसांनी दुचाकी चोरांच्या टोळीला अटक केली आहे. साक्री तालुक्यातल्या
शेंदवड इथून शामील पांडु बागुल याला आणि त्याच्या इतर साथीदारांना पोलीसांनी आज ताब्यात
घेतलं. त्यांच्याकडून सहा लाख २५ हजार रूपये किंमतीच्या २० दुचाकी ताब्यात घेतल्या
आहेत. ही चोरांची टोळी पकडल्याबद्दल पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पिंपळनेर पोलीसांच्या
पथकाला दहा हजारांचं बक्षिस दिलं आहे.
****
उस्मानाबाद
इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्राचं, विद्यापीठात रूपांतर
करण्याची मागणी, सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत
पाटील यांच्याकडे केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयीसुविधा वाढवण्यासह,
जिल्ह्याचा शैक्षणिक निर्देशांक उंचावण्यासाठी, स्वतंत्र विद्यापीठ होणं आवश्यक असल्याचं,
यासंदर्भातल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment