Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 30 June 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० जून
२०२३ दुपारी १.०० वा.
****
भारताची
शिक्षण व्यवस्था ही भारताच्या समृद्धीची वाहक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता
समारंभात ते आज बोलत होते. दिल्ली विद्यापीठासह देशातल्या अनेक संस्थांमध्ये मुलांपेक्षा
मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण अधिक असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. २०४७ पर्यंत
विकसित भारत निर्माण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान म्हणाले. दिल्ली विद्यापीठाचं औद्योगिक संकुल, संगणक केंद्र यांचा
कोनशिला समारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
दरम्यान,
पंतप्रधान मेट्रोनं प्रवास करुन या सोहळ्याच्या ठिकाणी गेले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी
संवाद साधला.
***
जम्मू
काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेशी संबंधित एका वाहनाचा अपघात होऊन पोलिस
अधिक्षकासह चार जणांचा मृत्यू झाला. जम्मू - श्रीनगर महामार्गावर हे वाहन रस्त्याच्या
काठावर नाल्यात पडून हा अपघात झाला.
दरम्यान,
जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळीच जम्मूच्या भगवती नगर इथून
अमरनाथ यात्रेकरुंची पहिली तुकडी रवाना केली. या तुकडीत तीन हजार ४०० हून अधिक भाविक
आहेत. यात्रेच औपचारिक सुरवात उद्या पहलगाम आणि बालटाल तळापासून होईल.
***
तक्रार निवारण, कायदा आणि न्याय संबंधित संसदीय स्थायी समितीनं समान नागरी संहितेसंदर्भात
आज एक बैठक बोलावली आहे. या विषयाबद्दल तज्ज्ञांची मतं जाणून घेण्यात येतील. भाजपाचे
राज्यसभेचे खासदार सुशील मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये ३१ सदस्य आहेत.
***
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद आणि बीड जिल्हा दौऱ्यावर असून, ते औरंगाबाद विमानतळावरुन
गंगापूरकडे रवाना झाले. विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, राज्य मंत्रिमंडळ
विस्तार जुलै महिन्यातच होणार असल्याचं सांगितलं.
‘हर घर, नल से जल’ अभियानाअंतर्गत,
औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर - खुलताबाद मधल्या
गावांसाठी एक हजार ७५ कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या पाणी
पुरवठा योजनेच्या कामाचा औपचारिक प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज गंगापूर इथं होणार
आहे. एक हजार किलोमीटरच्या अंतराची जलवाहिनी यामध्ये
टाकण्यात येणार असून, थेट जायकवाडी धरणातून गंगापूर -
खुलताबाद तालुक्यातल्या गावांना नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार
आहे. ही योजना ८० टक्के सौर उर्जेवर चालणार असल्याची माहिती आमदार
प्रशांत बंब यांनी दिली.
त्यानंतर
ते बीड इथं दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात
सहभागी होणार आहे.
***
पर्मनंट अकाउंट नंबर - ‘पॅन
आणि ‘आधार क्रमांक संलग्न करण्याची मुदत आज संपत आहे.
ही प्रक्रिया आज पूर्ण न केल्यास पॅन धारकांना अनेक तांत्रिक अडचणींचा
आणि आर्थिक दंडाचा सामना करावा लागू शकतो. हे संलग्निकरण न केल्यास
पॅन क्रमांक उद्या एक जुलैपासून आपोआप अकार्यरत होईल,
प्राप्तिकर विभागाकडून कर परतावा मिळणार असेल तर तो मिळणार नाही,
प्राप्तिकर परताव्यावर व्याज लागू असेल तर ते देण्यात येणार नाही,
काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त करही कापला जाईल, असं प्राप्तिकर विभागानं स्पष्ट केलं आहे.
***
नाशिक जिल्ह्यातील कळवण इथं काल पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात
आला. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र तसंच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या
या मेळाव्याचं उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भारती पवार
यांच्या हस्ते झालं. यावेळी १५० उमेदवारांची निवड करून त्यांना
प्रातिनिधिक स्वरूपात पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.
***
राज्य
शासनाच्या मिशन भगीरथ प्रयास उपक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये गेल्या तीन महिन्यात २५० बंधारे
बांधण्यात आले आहेत. हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात त्यात पाणी साठेल आणि
पावसाळा संपल्यानंतर गावांना त्याचा उपयोग होईल, अशी
माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल
यांनी दिली.
***
भालाफेकपटू नीरज चोप्रा स्वित्झर्लंडमध्ये उद्या होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत
भाग घेणार आहे. नीरजला गेल्या महिन्यात प्रशिक्षणादरम्यान स्नायूंना दुखापत झाली होती.
त्यानंतर तो तंदुरुस्त झाला आहे. यापूर्वी दोहामध्ये मे महिन्यात झालेल्या डायमंड लीगमध्ये
नीरजनं ८८ मीटर लांब भाला फेकून विजय मिळवला होता. डायमंड
लीगच्या गुणतक्त्यात आठ गुण मिळवून नीरज आघाडीवर आहे.
***
नाशिक जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशीही पाऊस सुरू आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या आदिवासी बहुल भागात
सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांना
सुरुवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
//************//
No comments:
Post a Comment