Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 June
2023
Time : 7.10 AM
to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ जून २०२३ सकाळी ७.१० मि.
****
· शेतकरी, आणि कामगारांसह राज्यातली प्रत्येक व्यक्ती समृद्ध
व्हावी - आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापुजेनंतर मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाकडे प्रार्थना.
· महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना सर्व शिधापत्रिका
तसंच अधिवास प्रमाणपत्र धारकांना लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
· औरंगाबाद इथं मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं भव्य स्मारक उभारण्यासाठी
शंभर कोटी रुपयांच्या, तर जालना ते जळगाव दरम्यानच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी
तीन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता.
· शेतकऱ्यांसाठी तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन
योजना केंद्र सरकारकडून जाहीर.
· बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा.
· औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची
मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना.
आणि
· आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा जपानवर ६२ -
१८ असा विजय.
****
शेतकरी, आणि कामगारांसह राज्यातली प्रत्येक व्यक्ती समृद्ध
व्हावी, अशी प्रार्थना विठुरायाकडे केली असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं
आहे. पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापुजा आज पहाटे मुख्यमंत्री आणि त्यांच्या
सुविद्य पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते झाली, त्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना ते म्हणाले
-
यावर्षी समाधान, आनंदी तसंच
सगळ्यांच्या आयुष्यामध्ये पांडुरंगाच्या कृपेने चांगले दिवस येऊ द्या. या शेतकऱ्यांच्या,
बळीराजाच्या आयुष्यातील संकट दूर होऊ द्या. चांगला पाऊस पडू द्या. आणि राज्य सुजलाम्
सुफलाम् होऊ द्या अशी प्रार्थना मी पांडुरंगाच्या चरणी केली.
पंढरपूर विकास आराखडा हा सर्व सहमतीनेच राबवला जाईल, असं
सांगून मुख्यमंत्र्यांनी, पंढरपुरमध्ये राबवण्यात येणार्या विविध सोयी सुविधांची माहिती
दिली. पंढरपुमध्ये येणार्या वारकर्यांची गैरसोय होणार नाही, याची शासन काळजी घेईल,
असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आषाढी वारीच्या उत्तम नियोजनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी
जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं.
मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पुजेदरम्यान मानाचे वारकरी होण्याचा
मान, अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातल्या वाकडी इथल्या भाऊसाहेब काळे आणि मंगल
काळे या दाम्पत्याला मिळाला.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश
महाजन, सुरेश खाडे, दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, आदी उपस्थित होते.
महाआरतीनंतर मंदिरातल्या पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि मानाचे
वारकरी यांना विठ्ठलाची तुळशीची माळ दिली, तसंच मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
मानाच्या वारकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभराचा पास देण्यात आला.
त्यानंतर शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीराला
मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन आढावा घेतला.
दरम्यान, काल पंढरपूर इथं स्वच्छता दिंडी आणि पर्यावरणाची
वारी पंढरीच्या दारी या उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप झाला.
****
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातल्या सर्व
शिधापत्रिका, आणि अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय,
राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल
ही बैठक झाली. या निर्णयामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार
असून, या योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून,
पाच लाख रूपये इतकं करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.
दरम्यान, विद्यमान महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना
आणि आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांचं एकत्रिकरण करण्याचा
निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यात नागरिकांना आरोग्य संरक्षण पाच लाख
रुपये इतकं करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद इथं मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं भव्य स्मारक उभारण्यासाठी
शंभर कोटी रुपयांच्या खर्चाला देखील राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. हे स्मारक शहरातल्या
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर लेबर कॉलनी परिसरात उभारण्यात येणार आहे.
याशिवाय मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी मराठवाड्यातल्या
आठही जिल्ह्यात अयोजित करायच्या कार्यक्रमांसाठी प्रत्येक जिल्ह्याला ५० लाख रुपये
निधी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
जालना ते जळगाव दरम्यानच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी
तीन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. हा
रेल्वे मार्ग जालना-राजूर-सिल्लोड-अजिंठा-जळगाव असा असून, मराठवाड्यातल्या जागतिक दर्जाचं
पर्यटन केंद्र असलेल्या अजिंठा लेणी, तसंच पवित्र तिर्थक्षेत्र असलेलं राजूर गणपती
यांना जोडणारा आहे.
राज्यात जालन्यासह नऊ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालयं
निर्माण करण्यात येणार असून, त्यांना संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्यास
काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
गंगापूर उपसा सिंचन योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं
घेतला आहे. गंगापूर तालुक्यातल्या ४० गावातल्या दहा हजार हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन
पद्धत राबवण्यात येणार असून, यासाठी ६९३ कोटी १८ लाख रुपये इतक्या खर्चास देखील मान्यता
देण्यात आली.
राज्यात नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडसह सात ठिकाणी न्यायालयं
स्थापन करण्यास, तसंच वैजापूर तालुक्यातल्या मौजे वांजरगाव इथं कोल्हापुरी पद्धतीचा
बंधारा उभारण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुंबईत वर्सोवा- वांद्रे या सागरी सेतूला
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचं नाव देण्याचा, तर शिवडी न्हावा शेवा सेतूला माजी पंतप्रधान
दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.
राज्यात ७०० ठिकाणी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला
दवाखाना सुरु करण्यास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. संजय गांधी निराधार अनुदान
योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा ५०० रुपयांची वाढ करण्याचा,
तसंच असंघटीत कामगार कल्याण महामंडळ स्थापन करुन त्याअंतर्गत व्यवसाय उद्योग क्षेत्रनिहाय
३९ आभासी मंडळं स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे.
****
राज्यात औरंगाबादसह पुणे, नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी
मुंबई या भागात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. काल
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या, उद्योग विभागाच्या
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यात सुमारे एक लाख
२० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यामध्ये पुणे आणि
औरंगाबाद इथं देशातल्या पहिल्या, सुमारे १२ हजार ४८२ कोटीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि
बॅटरी निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे.
****
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुमारे तीन लाख ७० हजार कोटी
रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना काल जाहीर केली. या अंतर्गत युरियाची ४५ किलोची गोणी
शेतकऱ्यांना २४२ रुपयालाच मिळेल. युरिया सबसिडीसाठी सरकारनं २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी,
तीन लाख ६८ हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. येत्या दोन वर्षात नॅनो युरियाच्या ४४
कोटी बाटल्यांची निर्मिती करणाऱ्या आठ प्रकल्पांमधून उत्पादन सुरू होईल, असं केंद्रीय
रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं.
****
चालू हंगामासाठी ऊसाला प्रतिक्विंटल ३१५ रुपये रास्त आणि
किफायतशीर दर - एफआरपी देण्याचा निर्णय, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं
घेतला आहे. याचा लाभ देशभरातल्या सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक, साखर कारखान्यात काम
करणारे सुमारे पाच लाख कामगार आणि इतर संबंधित व्यावसायिकांना मिळणार आहे.
****
सल्ला मसलत करून देशातल्या सर्व समुदायांसाठी वैयक्तिक
कायद्यांमध्ये सुधारणा करून, लिंगभाव समानता संहिता निर्माण करावी, अशी सूचना, विधान
परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी, कायदा आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे.
समान नागरी कायद्याच्या मसुद्याविषयी आयोगानं नागरीकांची मतं मागितली असून, गोऱ्हे
यांनी यासंदर्भात हे पत्र पाठवलं आहे. देशात विवाह, भागीदारी, दत्तक घेण्याचा अधिकार,
घटस्फोट, मुलाचा ताबा, पोटगी यासंदर्भात वेगवेगळ्या धर्माचे तसंच मिझोरम, मणिपूर, गोवा
यांसारख्या राज्यांचे वेगवेगळे कायदे आहेत. लिंग आणि धर्माची पर्वा न करता सर्वांसाठी
वैयक्तिक बाबी नियंत्रित करणाऱ्या कायद्यांचा एक समान संच तयार करणं, हे समान नागरी
कायद्यातून अपेक्षित असल्याचं, गोऱ्हे यांनी नमूद केलं.
****
ईद-उल-झुआ अर्थात बकरी ईद आज साजरी होत आहे. राज्यपाल रमेश
बैस यांनी राज्यातल्या जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण प्रेम, त्याग आणि
बलिदान या भावनांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देतो. यानिमित्तानं आपण सर्वजण समाजात
ऐक्य आणि बंधुत्वासाठी तसंच मानवजातीच्या सेवेसाठी कार्य करू या, असं राज्यपालांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज्यातल्या
जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईद निमित्त औरंगाबाद शहरातल्या छावणी इदगाह मैदानावर सकाळी
साडे आठ वाजता विशेष नमाज अदा करण्यात येणार आहे.
****
दरम्यान, आज आषाढी एकादशी देखील साजरी होत असल्यानं, औरंगाबाद
जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या हमरापूर इथल्या मुस्लिम समाज बांधवांनी, कुर्बानी
न देण्याचा निर्णय घेतला आहे.
****
औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची
सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. या नामांतराला विरोध करणाऱ्या
याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत, अंतिम अधिकृत सूचना जारी होईपर्यंत नवीन नावं न वापरण्याचे
निर्देश देण्यात आले असूनही काही शासकीय विभाग नवीन नावाचा वापर करत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या
वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं, त्यानंतर न्यायालयानं हे निर्देश दिले.
****
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गासंबंधी केंद्रीय
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल उस्मानाबाद इथं आढावा घेतला. या रेल्वे
मार्गासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनास शेतकऱ्यांनी सहकार्य करावं, त्यांना योग्य
मोबदला नक्कीच दिला जाईल, असं सांगून दानवे यांनी प्रशासनाला भूसंपादनाची प्रक्रिया
लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारानुसारच, ‘आत्मनिर्भर
भारत’ ही संकल्पना भारतीय जनता पक्षानं देशात रुजवली, तसंच खादीला प्रोत्साहन देऊन
मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचं कामही केल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. वर्धा इथं काल महा-जनसंपर्क अभियानात ते बोलत होते.
काँग्रेसनं केवळ महात्मा गांधीजींच्या नावाचा वापर करुन राजकारण केलं, मात्र भाजपनं
खऱ्या अर्थाने गांधींजीच्या विचाराचा भारत घडवला, असं ठाकूर म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या
रीड उस्मानाबाद उपक्रमाचं उद्घाटन, काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल
गुप्ता यांच्या हस्ते, लोहारा तालुक्यातल्या सास्तूर इथं झालं. राष्ट्रीय शैक्षणिक
धोरणाची योग्य अंमलबजावणी आणि मुलांच्या शिक्षणात समुदाय, पालक आणि ग्रामस्थांचा सहभाग
वाढवण्यासाठी गाव आणि शाळा यांच्या सहभागानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ग्राम शिक्षण
केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकं उपलब्ध करुन दिली जात असून, आठवड्यातले
दोन दिवस ठरवून दोन तास सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकांचं वाचन करावं असं आवाहन गुप्ता
यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी काल शहरातल्या इंडो
जर्मन टूल रुम या कंपनीच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्राला आणि उत्पादन निर्मिती केंद्राला
भेट दिली. गोरगरीब विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण मिळावं याकरिता इंडो
जर्मन टूल रुम मध्ये सारथी, महाज्योती तसंच इतर योजनांची सुविधा असल्यानं जास्तीत जास्त
विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
दक्षिण कोरियात सुरु असलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद
स्पर्धेत आज भारतानं जपानवर ६२ - १८ असा विजय मिळवला. या स्पर्धेतला भारताचा हा सलग
तिसरा विजय आहे.
****
श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचा, कोणताही
भेदभाव न करता गरजवंत लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, असं आवाहन विधान परिषदेचे विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रशासकिय अधिकाऱ्यांना केलं आहे. औरंगाबाद इथं काल दानवे
यांनी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातल्या
शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
उस्मानाबाद जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी रवींद्र
कदम यांचा, तर सचिवपदी राजेश धनके यांचा विजय झाला. जिल्हा न्यायालयात काल ही निवडणूक
पार पडली.
****
आषाढी एकादशीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातून
काल दोन दरवाजांमधून गोदावरी नदी पात्रात पाचशे चोवीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
सोडण्यात आलं. त्यामुळे कोणीही नदीपात्रात न उतरण्याचं आवाहन नियंत्रण कक्षानं केलं
आहे.
****
No comments:
Post a Comment