Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 June 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ जून
२०२३ दुपारी १.०० वा.
****
पंढरीची
वारी आणि पालखी सोहळ्याच्या माध्यमातून घराघरात स्वच्छतेचा मूलमंत्र पोहोचेल आणि स्वच्छता
अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या हस्ते पंढरपूर इथं पाणी पुरवठा, स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाच्यावतीनं
आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता
दिंडी आणि ग्रामसभा दिंडीचा समारोप झाला, त्यावेळी शिंदे बोलत होते. शासन वारकऱ्यांच्या
पाठीशी असल्याचं सांगत स्वच्छता दिंडीत सहभागी वारकरी बंधू-भगिनींचं मुख्यमंत्र्यांनी
अभिनंदन केलं. गरीब कुटुंबातील विद्यार्थींनींना ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या
हस्ते यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात सायकल वितरण करण्यात आलं. पंढरपूर पंचायत समितीतर्फे
३०० विद्यार्थीनींना सायकल देण्यात येणार असून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात ‘सायकल
बँक’च्या माध्यमातून तीन हजार
विद्यार्थीनींना सायकल देण्यात आल्या आहेत.
***
सोलापूर
जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव सोलापूरचे’या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत
या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. या पुस्तकामध्ये सोलापूर जिल्ह्यातली धार्मिक स्थळं,
किल्ले, प्राचीन वारसा स्थळं, तसंच निसर्ग संपदा आणि जैवविविधता यांची माहिती देण्यात
आली आहे.
***
औरंगाबाद
नजिकच्या प्रतिपंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी
परिसरातल्या विविध भागातून दिंड्या काढण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणच्या मार्गावर टाळ
मृदंगाचा गजर सुरू आहे. परिसर भक्तिमय झाला आहे. जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या
आहेत. भक्तांसाठी फराळाची सोय करण्यात आली आहे. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिला
विविध पालखी आणि दिंडीमध्ये सहभाग नोंदवत आहेत. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मध्यरात्री
प्रती पंढरपूर इथं सपत्निक पुजा केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी
आज सकाळी पायी दिंडीत सहभाग घेत प्रती पंढरपूर इथं दर्शन घेतलं. शहरात बालदिंड्याही
काढण्यात येत आहेत. भक्तीगीत गायन, वादनाचे कार्यक्रम होत आहेत. प्रतिपंढरपूरला जाणाऱ्या
दिंड्या आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिस वाहतूक शाखेनं वाहतुकीत बदल केला आहे.
औरंगाबाद ते अहमदनगर मार्गावर ए.एस क्लब चौक ते कामगार चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या
वाहनांसाठी बंद ठेवून वाहतूक अन्य मार्गानं वळवली आहे. ईद, आषाढी एकादशी यावेळी एकाच
दिवशी आल्यानं प्रतिपंढरपूरमध्ये मुस्लिम बांधवांनी कुर्बानी देणार नसल्याचं घोषित
करुन सामाजिक ऐक्य दाखवलं आहे.
***
आषाढी
एकादशीनिमित्त हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथं संत नामदेव महाराजांच्या समाधीचं
दर्शन घेण्यासाठी भाविक खूप मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. सावरगाव जिरे इथल्या गणेश
आणि कल्पना तडस तसंच माधव आणि गंगाबाई वानखेडे या दांपत्याना आज सकाळी साडे सहा वाजता
झालेल्या महापूजेचा मान मिळाला. महापूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं.
***
ईद-उज-जुहा,
बकरी ईद ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सकाळी विविध ठिकाणच्या इदगाह
मैदान आणि मस्जिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. औरंगाबाद शहरातल्या मुख्य छावणी
इदगाह मैदानावर सकाळी साडे आठ वाजता हजारो शहरवासीयांनी नमाज पठण केलं. खासदार इम्तियाज
जलील यांनी रोजाबाग इथल्या इदगाहमध्ये नमाज पठण केलं. उस्मानपुरा इथं तसंच सातारा परिसर
इथं ईदगाह हजरत शाह सोखतामियाँ इथंही नमाज अदा करण्यात आली.
***
महाराष्ट्रातील
विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यातही नाशिक,
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे तसंच सातारा इथं मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात
आला असल्यानं सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
***
नाशिक
जिल्ह्यातल्या दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांच्याविरुद्ध चाळीस लाख
रूपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी
तालुक्यातल्या एका कारखान्याच्या विरोधात महसूल विभागानं कारवाई न करण्यासाठी त्यांनी
ही लाच मागितली होती.
//************//
No comments:
Post a Comment