Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 June 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ जून
२०२३ दुपारी १.०० वा.
****
माजी पंतप्रधान
पी व्ही नरसिंहराव यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली
वाहिली आहे. राव यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आणि देशाच्या विकासाबद्दलची त्यांची
प्रतिबद्धता लक्षणीय होती, असं पंतप्रधानांनी
म्हटलं आहे.
****
फास्टटॅगच्या
वापरामुळे सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांच्या इंधनाची बचत झाल्याचं केंद्रीय रस्ते
वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथे पत्रकार
परिषदेत बोलत होते. पथकर भरताना वाहनं बराच वेळ रांगेत उभी राहण्यामुळे जे इंधन वाया
जात होतं ते फास्ट टॅगमुळे वाचतं आणि त्यामुळे इतकी बचत होते, अशी माहिती गडकरी यांनी
दिली.जानेवारी २०२१ मध्ये फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आल्यानंतर पथकर संकलनात दहापट
वाढ झाल्याचं सांगतानाच, २०३० पर्यंत पथकर संकलन एक लाख तीस हजार कोटी रुपयांपर्यंत
वाढावं, असं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
देशात मागच्या
नऊ वर्षात राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे एकोणसाठ टक्के वाढली आहे.त्यामुळे
महामार्गांच्या जाळ्यांच्या बाबतीत आता भारत जगात दुस-या स्थानावर आला आहे, अशी माहितीही
गडकरी यांनी दिली.
****
गेल्या तीन
वर्षांत जेम अर्थात सरकारी ई-बाजारपेठेतल्या खरेदीत दसपटीनं वाढ झाल्याची माहिती केंद्रीय
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग
मंत्रालयाच्या वतीनं दिल्ली इथे ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार २०२३’या कार्यक्रमाचं
आयोजन परवा सोमवारी करण्यात आलं,त्यावेळी ते बोलत होते.शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय
कामगिरी केल्याबद्दल यावेळी महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण पाच पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं. यामध्ये, शासकीय ई बाजारपेठ अर्थात जेम वरून चार हजार एकशे तीस कोटी रुपयांची
खरेदी केल्याबद्दल, स्टार्टअप - उद्योजकांच्या तसंच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या
उद्योजकांच्या खरेदीबद्दल, सूक्ष्म आणि लघु उपक्रमांमार्फतच्या खरेदीबद्दल तसंच महिला
उद्योजकांमार्फतच्या खरेदीबद्दलच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद
इथे मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं भव्य स्मारक उभारण्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या खर्चाला
आज शासनानं मान्यता दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.जालना ते जळगाव दरम्यानच्या नवीन ब्रॉडगेज
रेल्वेमार्गासाठी तीन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं आज
मान्यता दिली.राज्यात नऊ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालयं निर्माण करण्याला, तसंच गंगापूर
उपसा सिंचन योजनेलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
****
मडगाव-मुंबई
वंदे भारत एक्स्प्रेसमुळे कोकणातल्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी मडगाव ते
मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर काल संध्याकाळी
वंदेभारत एक्स्प्रेसचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे आगमन झालं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसचे
लोको पायलट आणि प्रवाशांशी संवाद साधत त्यांचे मिठाई आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं.
यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर,
पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात
रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारनं तेरा हजार कोटी रुपयांचा
निधी मंजूर केल्याची,तसंच राज्यातल्या एकशे
तेवीस रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिली.
****
मुंबईच्या
भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटीनं विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या दीडशेत
स्थान मिळवलं आहे.या कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आनंद व्यक्त
केला आहे.भारताची विद्यापीठं आज जागतिक दर्जाची झाली असून, यावर्षी पंचेचाळीस भारतीय
विद्यापीठांनी क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकिंग च्या यादीत स्थान मिळवल्याचं त्यांनी
म्हटलं आहे.या यादीत आय आय टी मुंबई एकशे एकोणपन्नासाव्या तर आय आय टी दिल्ली एकशे
सत्त्याण्णवाव्या स्थानावर आहे.
****
No comments:
Post a Comment