Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 June 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ जून
२०२३ दुपारी १.०० वा.
****
अमेरिकेचा
तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इजिप्तला रवाना झाले. या
दौऱ्यात ते हिलिओपोलिस इथल्या समाधीस्थळी, पहिल्या महायुद्धात वीरगती प्राप्त
झालेल्या, भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहतील. तसंच ते अल हाकिम मास्क इथलाही
दौरा करतील. याशिवाय या दौऱ्यात ते इजिप्तच्या महत्त्वाच्या व्यक्तींसोबतही चर्चा
करणार आहेत. इजिप्त इथल्या भारतीय नागरिकांतर्फे, पंतप्रधानांचं स्वागत केलं जाणार
आहे.
****
न्यायालयीन
कोठडीत कैद्यांचे होणारे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार
आयोगानं, केंद्र सरकार, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना, मार्गदर्शक सूचना
जारी केल्या आहेत. न्यायालयीन कोठडीत कैद्यांकडून जाणुनबुजून आत्महानी होते, ती
कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बहुसंख्य कैद्यांचे
नैसर्गिक मृत्यू आत्महत्यांमुळे होतात, असं निरीक्षण आयोगानं नोंदवलं आहे. या
पार्श्वभूमीवर, या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
****
दरम्यान,
कारागृहातल्या कैद्यांना त्यांच्या नातलगांशी संवाद साधण्यासाठी कॉईन बॉक्सऐवजी,
स्मार्टकार्ड फोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर पुण्याच्या
येरवडा मध्यवर्ती कारागृहात या सेवेचा प्रारंभ, अपर तुरुंग महानिरीक्षक अमिताभ
गुप्ता यांच्या हस्ते झाला. येरवडा कारागृहातल्या या सुविधेचा आढावा घेऊन,
राज्यातल्या इतर कारागृहात या सुविधेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती,
गुप्ता यांनी यावेळी दिली.
****
राज्यात
वैद्यकीय शिक्षण आणि तृतीयक आरोग्य सेवेच्या विस्ताराच्या अनुषंगानं, वैद्यकीय,
परिचर्या आणि भौतिकोपचार अभ्यासक्रमाच्या नवीन शासकीय महाविद्यालयांची, निर्मिती
करण्यात येणार आहे. या महाविद्यालयांच्या निर्मितीसाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन
एजंसी - जायका यांच्याकडून, अल्प व्याजदरात घेण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य
संदर्भातली कार्यवाही, गतीनं करण्याची सूचना, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी
दिली आहे. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीथ बोलत होते.
****
अमरावती
विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ, आज राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या उपस्थितीत
होत आहे. राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
करण्यात येत आहे.
****
बीडच्या
कृषी विभागानं या हंगामात विविध त्रुटींमुळे जिल्ह्यात रासायनिक खताच्या सहा आणि
बियाणांच्या एक, अशा सात दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. काही ठिकाणी याबाबत
वस्तुस्थितीच्या विपरीत आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली असून, यावर विश्वास
न ठेवण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
शेतकर्यांनी बियाण्यांचं विशिष्ट वाण, कंपनी यांचा आग्रह ठेऊ नये, तसंच
रासायनिक खतांच्या बाबतीत विशिष्ट कंपनीचा किंवा ग्रेड चा आग्रह ठेऊ नये, असं
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी केलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यातल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातल्या विद्यार्थी शासकीय
वसतिगृहात, प्रवेश घेण्यास पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्यांना, भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत अर्ज स्वीकारण्यासाठी, १४ जुलैपर्यंत मुदतवाढ
देण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, यांनी काल
प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
केंद्र
शासनाला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपतर्फे राबवण्यात येत असलेल्या, मोदी ॲट
नाईन महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत, केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र
यादव यांनी, काल चंद्रपूर इथं व्यापार्यांशी संवाद साधला. गेल्या नऊ वर्षात
व्यापार-वाणिज्य क्षेत्रात झालेल्या विविध बदलाची आणि विकासात्मक निर्णयांची,
त्यांनी यावेळी माहिती दिली. राज्य सरकारने जमीन दिल्यास कामगार बहुल असलेल्या
चंद्रपूर जिल्ह्यात, दोनशे खाटांचं रुग्णालय उभारण्याची तयारी असल्याचं, यादव
यांनी यावेळी सांगितलं.
****
हैदराबाद
विभागात विविध ठिकाणी सुरु असलेल्या रेल्वे सुविधांच्या कामामुळे, लाईन ब्लॉक
घेण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड विभागातल्या काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही
अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. निझामाबाद - नांदेड एक्सप्रेस २६ जून ते दोन जुलै
पर्यंत, आणि नांदेड - निझामाबाद एक्सप्रेस उद्यापासून ते एक जुलै पर्यंत रद्द
करण्यात आली आहे. धर्माबाद - मनमाड मराठवाडा एक्सप्रेस २९ तारखेपर्यंत, धर्माबाद
ते मुदखेड दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
****
बंगलोर इथं
होत असलेल्या १४ व्या सॅफ फुटबॉल स्पर्धेत, आज भारताची लढत नेपाळ शी होणार आहे.
संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
मान्सून
मुंबईत दाखल झाला असून, आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे. येत्या दोन
दिवसात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात, वादळी वार्यासह पाऊस पडण्याची
शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment