Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जून २०२३
सायंकाळी ६.१०
****
·
शिक्षण ही फक्त शिकवण्याची नाही तर शिकण्याचीही प्रक्रिया-दिल्ली
विद्यापीठाच्या शताब्दी सांगता सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.
·
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचा उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन.
·
कृषीदिनानिमित्त उद्या राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन.
आणि
·
आशियायी कबड्डी स्पर्धेत इराणवर मात करत भारत अजिंक्य.
****
शिक्षण
ही फक्त शिकवण्याची नाही तर शिकण्याचीही प्रक्रिया आहे, इतकी वर्षं विद्यार्थ्यांना
काय शिकवायचं, यावर शैक्षणिक धोरण केंद्रित असायचं, पण आता विद्यार्थी काय शिकू इच्छित
आहेत, याकडे आम्ही लक्ष वळवलं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं
आहे. ते आज दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाच्या सांगता कार्यक्रमात बोलत होते.
केंद्र सरकारनं लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार
विषयांची निवड करू शकतील, असं त्यांनी सांगितलं. भारतीय विद्यापीठांना त्यांच्या भविष्यवादी
धोरणं आणि निर्णयांमुळे जागतिक मान्यता मिळत आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. २०१४
मध्ये भारताची फक्त बारा विद्यापीठं जागतिक मानांकन यादीत होती, आज त्यांची संख्या
वाढून पंचेचाळीसवर पोहचली आहे, असं ते म्हणाले. देशभरात अनेक नवीन महाविद्यालयं आणि
विद्यापीठं स्थापन होत असून, मागच्या काही वर्षांमध्ये देशातल्या आय आय टी, आय आय एम
आणि एन आय टी सारख्या संस्थांची संख्या वाढत असल्याचं सांगत, या संस्था नव्या भारताच्या
निर्मितीत आपलं योगदान देत आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. दिल्ली विद्यापीठाच्या तीन
विभागांच्या नव्या इमारतींची कोनशीला पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी बसवण्यात आली.
दरम्यान,
पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी दिल्ली मेट्रोनं प्रवास केला. या प्रवासादरम्यान
त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
****
आपलं
सरकार गतिमान सरकार असून, एका वर्षात आपल्या सरकारने पस्तीस योजनांना शासकीय मान्यता
दिल्या, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ‘हर घर, नल से
जल’ अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथे एक हजार कोटी रुपये खर्चाच्या
गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचं भूमीपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारच्या
नऊ वर्षांच्या कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या योजना आणि यशाची माहिती दिली. कोविड महामारीमध्ये
मोदी सरकारनं त्वरेनं स्वदेशी लस निर्माण करून तिच्या तीन मात्रा तत्परतेनं नागरिकांना
नि:शुल्क दिल्यामुळेच आपल्या देशातून कोविड हद्दपार झाला, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.
मोदी सरकारनं महाराष्ट्राला पंचवीस लाख घरं दिली त्यामुळे सव्वा लाख लोकांना हक्काची
घरं मिळाली, याशिवाय राज्यातल्या एक्काहत्तर लाख लोकांना आरोग्य सेवा मोदी सरकार पुरवत
आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान,
राज्य मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्यातच होणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं आहे,
औरंगाबाद विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
****
केंद्र
शासनानं रायगड जिल्ह्यातल्या रातवड इथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा
निधी दिला असून, यातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाला
मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
मानले आहेत. तीनशे तेवीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या खर्चाला
राज्य शासनानंही मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून सुमारे पंचवीस हजार लोकांना रोजगार
उपलब्ध होणार आहे.
****
एक
ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी रासायनिक उद्योगांची भूमिका महत्वाची
असल्यानं शाश्वत विकासासाठी रासायनिक उद्योजकांनी हरित उद्योग उभारणीचे प्रयत्न करावेत,
शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
मुंबईत ‘शाश्वत भारतासाठी क्रांती’ या विषयावर आयोजित रासायनिक परिषदेत ते आज बोलत
होते. नवीन उद्योगांमुळे आपली हानी होणार नाही, अशी भावना स्थानिकांच्या मनात निर्माण
होण्याची गरज असल्याने उद्योजकांनी प्रदूषण विरहीत उद्योग उभारण्याचे प्रयत्न करावेत,
असा आग्रह सामंत यांनी यावेळी केला.
****
१००
मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असं आवाहन राज्याचे कृषिमंत्री
अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ते आज जालना इथे बोलत होते. राज्यात बोगस बियाणं विक्री
होत असल्याच्या तक्रारी वाढत असून त्यासाठी कृषी विभाग कारवाई करत आहे, असं त्यांनी
सांगितलं. राज्यात उद्यापासून पोलीस, महसूल, कृषी आणि ग्रामविकास हे चारही विभाग मिळून
याबाबत कारवाई करणार असून, ज्या ठिकाणी बोगस बियाणं किंवा महागड्या दरात बियाणांची
विक्री होईल त्याठिकाणी या चारही विभागाचे कर्मचारी बसून शासकीय दरात बियाणांची विक्री
करतील, अशी माहिती सत्तार यांनी यावेळी दिली.
****
माजी
मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल एक जुलै
हा त्यांचा वाढदिवस राज्यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त नांदेड
जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे कृषि दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार
असलेल्या या कार्यक्रमात शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आणि राज्यस्तरीय
पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी कृषी शास्त्रज्ञांची
मार्गदर्शनपर व्याख्यानं होणार असून, कीटकनाशक फवारणी करताना वापरायच्या सुरक्षा किट्सचं
वाटपही करण्यात येणार आहे.
****
औरंगाबादच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही कृषीदिनानिमित्त उद्या एक कार्यक्रम
आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात कृषीतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांचं
यावेळी व्याख्यान होणार आहे. दोन्ही अध्यासन केंद्रांच्या वतीनं कृषितंत्रज्ञान सप्ताहानिमित्त
घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.
****
आशियायी
कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतानं अजिंक्यपद पटकावलं. अंतिम फेरीत इराणच्या संघाचा
पराभव करत भारतानं हा किताब जिंकला. आतापर्यंत नऊ वेळा झालेल्या या स्पर्धेत भारतानं
आठ वेळा अजिंक्यपद मिळवलं आहे.
****
भालाफेकपटू
नीरज चोप्रा स्वित्झर्लंडमध्ये उद्या होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत भाग घेणार आहे.
यापूर्वी दोहामध्ये मे महिन्यात झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजनं 88 मीटर लांब भाला
फेकून विजय मिळवला होता. डायमंड लीगच्या गुणतक्त्यात आठ गुण मिळवून नीरज आघाडीवर आहे.
****
पत्रकारितेच्या
विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत यायचं असेल तर त्यांनी आपल्या जीवनात सकारात्मकता
अंगी बाणवावी, असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केलं आहे. महात्मा
गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयानं आयोजित केलेल्या,
‘प्रशासकीय सेवेत जाण्याचा ‘पत्रकारिता’ एक राजमार्ग’, या विषयावरच्या कार्यशाळेत त्या
आज बोलत होत्या. प्रशासनात काम करत असताना जागोजागी पत्रकारितेच्या अभ्यासाचा फायदा
होतो, असं त्या म्हणाल्या. लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी यावेळी बोलताना, पत्रकारितेच्या
अभ्यासाचा फायदा नागरी सेवांच्या परीक्षेसाठी होतो, असं सांगत, राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं
आपण लष्करी सेवेमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं.
****
आकाशवाणी
औरंगाबाद केंद्रातले सहायक अभियंता प्रकाश जायस्वाल आज ३८ वर्ष आणि नऊ महिन्यांच्या
सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांना कार्यालयात एका छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला.
****
संत
वाङगमय आणि बहुभाषा अभ्यासक मनीषा बाठे यांनी लिहिलेलं समर्थ रामदासांचं चरित्र साहित्य
अकादमीकडून ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या मालिकेत प्रकाशित करण्यात आलं आहे. या
मालिकेतली पुस्तकं मूळ भाषेसह अन्य वीस भाषांमध्ये अनुवादित होऊन प्रकाशित केली जात
असल्यानं आता समर्थ रामदासांचं हे चरित्रही वीस भाषांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
****
No comments:
Post a Comment