Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 02 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०२ जून
२०२३ दुपारी १.०० वा.
****
रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी केली आहे. किल्ले रायगडावर ३५० व्या
शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते आज बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे
वंशज खासदार उदयनराजे भोसले या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील, असं
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी
उभारण्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची,
तसंच मुंबईतल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची
घोषणाही त्यांनी केली. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला संपन्न
महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करुया, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी,
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे
भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक
दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शिवाजी महाराजांचा
३५०वा राज्याभिषेक दिन नवीन चेतना घेऊन आल्याचं ते म्हणाले.
राष्ट्र कल्याण, लोककल्याण हे शिवरायांच्या शासन व्यवस्थेचं मूळ तत्त्व होतं, ते शौर्य आणि सुसाशन दोन्हीमध्ये पारंगत होते,
अशा शब्दात पंतप्रधानांनी शिवरायांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख
केला. शिवाजी महाराजांनी आपल्याला राष्ट्रनिर्माणाची
दिशा दाखवली, असं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना, शिवाजी
महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत झालं पाहिजे, यासाठी पाठपुरावा
करणार असल्याचं सांगितलं. शिवाजी महाराजांनी जलसंवर्धन आणि वनसंरक्षणाचे
दिलेले धडे आजही राज्य कारभार करताना उपयोगी पडतात, त्यांनी दिलेल्या
शिकवणुकीच्या आधारेच स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करत असल्याचं,
फडणवीस म्हणाले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचं
उद्घाटन झालं. शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक करून पूजन करण्यात आलं,
पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.
सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते
ध्वजवंदन करण्यात आलं. जाणत्या राजाला अभिवादन करण्यासाठी किल्ले
रायगडावर शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.
***
राज्यात इयत्ता दहावीचा निकाल ९३ पूर्णांक ८३ टक्के इतका लागला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी
यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना
मंडळाच्या संकेतस्थळावर तपशीलवार निकाल पाहता येईल. राज्यात सर्वाधिक
निकाल कोकण विभागाचा ९८ पूर्णांक ११ टक्के, तर सर्वात कमी निकाल
नागपूर विभागाचा ९२ पूर्णांक पाच टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागात ९३ पूर्णांक
२३ टक्के, तर लातूर विभागात ९२ पूर्णांक ६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोल्हापूर
विभागात ९६ पूर्णांक ७३ टक्के, पुणे ९५ पूर्णांक ६४ टक्के, मुंबई ९३ पूर्णांक ६६ टक्के,
अमरावती ९३ पूर्णांक २२ टक्के, तर नाशिक विभागात ९२ पूर्णांक २२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनी
बाजी मारली आहे. ९५ पूर्णांक ८७ टक्के मुली पास झाल्या आहेत, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक शून्य पाच टक्के इतकं आहे. राज्यातल्या दहा
हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असल्याचं, मंडळानं सांगितलं आहे.
***
जम्मू
काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत
एक दहशतवादी मारला गेला. दासाल गुजरान परिसराच्या जंगलात सुरक्षा बलाच्या जवानांनी
शोधमोहिम सुरु केल्यानंतर ही चकमक झाली.
***
नुकत्याच संपलेल्या मे महिन्यात युनिफाईड पेमेंट इंटरफेस - यू पी आय द्वारे विक्रमी म्हणजेच नऊ अब्जांहून अधिक
व्यवहार झाले आहेत, ज्यांचं मूल्य १४ लाख कोटी रुपयांहून अधिक
आहे. यू पी आय ही देशात निर्माण करण्यात आलेली प्रणाली जागतिक
स्तरावर स्वीकृत करण्यात आली असून, २०१६ मध्ये तिचा वापर सुरु
झाल्यापासून आर्थिक व्यवहारांसाठी विश्वासार्ह माध्यम म्हणून ओळखली जाते.
***
नाशिक जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू अड्डयांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण
पोलिसांकडून गेल्या काही महिन्यांपासून छापासत्र सुरू आहे. काल ग्रामीण पोलिसांच्या
सुमारे ५५० अधिकारी आणि अंमलदारांनी जिल्ह्यात एकाच वेळी ६६ ठिकाणी छापे टाकून, सुमारे ११ लाख रुपयांची गावठी दारू आणि अन्य साहित्य जप्त केलं, याप्रकरणी ३१ गुन्हे दाखल झाले आहेत.
***
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू किरण जॉर्जचा
उपान्त्यपूर्व फेरीचा सामना फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्ह याच्याशी
सध्या सुरु आहे. तर लक्ष्य सेनचा उपान्त्यपूर्व फेरीचा सामना मलेशियाच्या
लिओंग जुन हाओ याच्याशी होणार आहे.
//************//
No comments:
Post a Comment