Saturday, 3 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 03.06.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 June 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जून २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      ओडिशात तीन रेल्वे गाड्यांच्या अपघातात २०७ प्रवाशांचा मृत्यू तर शेकडो प्रवासी जखमी

·      राज्यात दहावीचे ९३ पूर्णांक ८३ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण; औरंगाबाद विभागाचा ९३ पूर्णांक २३ टक्के, तर लातूर विभागाचा ९२ पूर्णांक ६७ टक्के निकाल

·      ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात प्रतापगड प्राधिकरण स्थापनेची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणं आवश्यक-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

·      बनावट चलनी नोटा बाळगणाऱ्या तिघांना यवतमाळ पोलिसांकडून अटक

·      औरंगाबाद इथं बेकायदा गर्भलिंगनिदान करणारा डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

आणि

·      थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनची पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक

****

ओडिशात तीन रेल्वे गाड्यांच्या अपघातात दोनशे सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून, शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. बालासोर जिल्ह्यातल्या बहनागा रेल्वे स्थानकावर काल सायंकाळी हा अपघात झाला. स्थानकावर उभ्या असलेल्या एका मालगाडीवर शालिमार हावडा कोरोमंडल एक्सप्रेस धडकून रुळावरून घसरली, काही मिनिटांनी आलेली बंगळुरू हावडा अतिजलद रेल्वेही याच ठिकाणी धडकून रुळावरून घसरली. दोन्ही रेल्वे गाड्यांच्या जवळपास १७ डब्याचं मोठं नुकसान झालं. यामध्ये २०७ प्रवासी मृत्युमुखी पडले, तर नऊशेहून अधिक प्रवासी जखमी झाले. अपघातस्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, तसंच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना रेल्वेकडून प्रत्येकी दहा लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

****

राज्यात इयत्ता दहावीचा निकाल ९३ पूर्णांक ८३ टक्के इतका लागला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर तपशीलवार निकाल पाहता येईल. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९८ पूर्णांक ११ टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२ पूर्णांक पाच टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागात ९३ पूर्णांक २३ टक्के, तर लातूर विभागात ९२ पूर्णांक ६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागात ९६ पूर्णांक ७३ टक्के, पुणे ९५ पूर्णांक ६४ टक्के, मुंबई ९३ पूर्णांक ६६ टक्के, अमरावती ९३ पूर्णांक २२ टक्के, तर नाशिक विभागात ९२ पूर्णांक २२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. ९५ पूर्णांक ८७ टक्के मुली पास झाल्या आहेत, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक शून्य पाच टक्के इतकं आहे. राज्यातल्या दहा हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असल्याचं, मंडळानं सांगितलं.

मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९३ पूर्णांक ५८ शतांश टक्के लागला असून, जालना ९५ पूर्णांक ४४ शतांश टक्के, बीड ९६ पूर्णांक २४, परभणी ९० पूर्णांक ४५, हिंगोली ८८ पूर्णांक ७१, नांदेड ९० पूर्णांक ३९, उस्मानाबाद ९३ पूर्णांक ५०, तर लातूर जिल्ह्याचा निकाल ९४ पूर्णांक ८८ शतांश टक्के  लागला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहावीच्या परीक्षेतल्या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्याने तयारी करावी, आणि त्यासाठी फेर परीक्षेच्या पर्यायाचा अवलंब करावा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही दहावीच्या परीक्षेतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

दरम्यान, दहावीच्या निकालानंतर कमी गुण मिळालेले काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळातर्फे, ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु करण्यात आली आहे. यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेले असून, पुढचे आठ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विद्यार्थ्यांना नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करण्यात येईल, याची विद्यार्थी तसंच पालकांनी नोंद घ्यावी, सं राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. किल्ले रायगडावर ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते काल बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. ते म्हणाले....

“शिवछत्रपतींसाठी गडकोट किल्ले हे जीव की प्राण होते. आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या गडकोट किल्ल्याचं जतन आणि संवर्धनाला प्राधान्य देतोय. एक दूर्ग प्राधीकरण देखील आपलं सरकार करतय आणि उदयनराजेंची जी मागणी आहे की प्रतापगड प्राधीकरण करावं हे मी आज याठिकाणी जाहीर करतो. आणि प्रतापगड प्राधीकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले यांनी काम पहावं असंही याठिकाणी सांगू इच्छितो.’’

रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची, तसंच मुंबईतल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला संपन्न महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करुया, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी, शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना, शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत झालं पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं. शिवाजी महाराजांनी जलसंवर्धन आणि वनसंरक्षणाचे दिलेले धडे आजही राज्य कारभार करताना उपयोगी पडतात, त्यांनी दिलेल्या शिकवणुकीच्या आधारेच स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करत असल्याचं, फडणवीस म्हणाले.

****

आपलं वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी शिवरायांचा इतिहास मोलाचा असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्या आखाडा बाळापूर इथं, शिवराज्याभिषेक मंगल कलश दर्शन यात्रेत ते काल बोलत होते. मध्यप्रदेश सरकारचे उद्योगमंत्री राजवर्धन सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कलशाचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

****

आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं असल्याचं मत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर, ते काल मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. स्थानिक पातळीवर निवडणुकीत समन्वय राहणं महत्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जागा वाटपावरून महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही, असंही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं. र्चेअंती मविआचा जो उमेदवार ठरेल त्याला निवडू आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकुल वातावरण असून, काँग्रेस पक्ष राज्यातल्या सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा या दोन दिवसाच्या बैठकीत घेत असल्याचं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. ते काल प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीतले तीनही पक्ष एकत्र निवडणुका लढवणार असून, लवकरच राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचे दौरे करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

****

प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत, परभणी, नांदेड, लातूर, बीड, मुंबई, रत्नागिरी, आणि सांगली या जिल्ह्यांसाठी, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. २४ ते ४५ वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती, प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकेन्सिंज, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांना, एअर न्यूज पॅनल ट्वेंटी ट्वेंटी टू अॅट जीमेल डॉट कॉम, या ईमेल आयडीवर आपले अर्ज पाठवता येतील.

****

आषाढी वारी निमित्त पंढरपूर इथं वास्तव्यासाठी आलेल्या नवीन व्यक्ती तसंच त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती, घरमालक, शी, चर्च, धर्मशाळा इत्यादींचे विश्वस्त यांनी लगेच संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी दिले आहे. भविष्यात होणाऱ्या दहशतवादी कारवायांना यामुळे आळा बसून, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यास मदत होणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, जी - 20 चे प्रतिनिधी मंडळाला आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे., या प्रतिनिधींना आपल्या संस्कृतीतल्या या वैशिष्ट्यपूर्ण अशा वारीचं दर्शन घडवनण्याचे, त्यासाठी उत्तम नियोजन करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातल्या बैठकीत दिले आहेत.

****

बनावट चलनी नोटा बाळगणाऱ्या तिघांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून ५०० रुपये दर्शनी मूल्याच्या ९६४ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मारवाडी फाटा इथं नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली असता, एका व्यक्तीकडून या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. विशाल पवार असं त्याचं नाव असून, त्याच्या कडून मिळालेल्या माहितीवरून बीड थून विनोद राठोड आणि बालू कांबळे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वाळूज इथं बेकायदा गर्भलिंगनिदान करताना एका डॉक्टरला पकडण्यात आलं. डॉ. सुनिल राजपुत असं या डॉक्टरचं नाव आहे. शहरातला एक बीएचएमएस डॉक्टर गर्भलिंगनिदान करण्याची घरपोच सेवा देत असल्याची माहिती वाळूज पोलिसांना मिळाली होती, त्यावरुन राजपुतसह नर्स पूजा भालेराव हिला ताब्यात घेण्यात आलं.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ निधीतून ४४ कंत्राटी प्राध्यापकांची भरती करण्यात येणार असून, तासिका तत्त्वावरील २४५ पदांनाही मान्यता देण्यात आली आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची काल बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षांत सोहळ्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. आगामी पाच वर्षासाठीच्या बृहत आराखड्यालाही यावेळी मंजुरी देण्यात आली.

****

थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन नं पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य पूर्व सामन्यात लक्ष्यनं मलेशियाच्या जून हाओ लिऑंगचा २१- १९, २१- ११ असा सरळ गेममधे पराभव केला. पुरूष एकेरीतल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताचा किरण जॉर्ज, फ्रांसच्या टोमा पोपोव्हकडून १६-२१, १७-२१ असा पराभूत झाला.

****

खरीप २०२२ मधल्या पीक नुकसानीपोटी उस्मानाबाद जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीनं आजवर ३४० कोटी रुपये वितरित केले आहेत. नुकसानीच्या पूर्व सूचना दिलेल्या, मात्र पंचनामे न केलेल्या २१ हजार ४०० शेतकऱ्यांना जवळपास १२ कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. पुढील आठवड्यात या निधीचं वितरण होणार आहे.

****

औरंगाबाद इथले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे यांचं काल राहत्या घरी निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पारखे यांना पक्षाने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत, औरंगाबाद पश्र्चिम विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी म्हणूनही पारखे यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार ब्यूरो यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तृणधान्याचा आहारात उपयोग आणि मिशन लाईफ या विषयांवर पोस्टर आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

****

नांदेड जिल्‍हयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ही माहिती दिली. यानिमित्त आयोजित वृक्ष लागवड मोहिमेत, गावातल्या प्रत्‍येक व्‍यक्‍तीने, हर घर नर्सरी उपक्रमातून तयार करण्यात आलेल्या रोपांची, उपलब्‍ध मोकळ्या जागेत, लावगड करावी, असं आवाहन करण्‍यात येत आहे. याशिवाय शासकीय कार्यालय परिसरात मियावाकी पध्‍दतीनं लावण्‍यात येणाऱ्या वृक्ष लागवडीचं तालुकास्‍तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी नियोजन करावं, तसंच या मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्‍वयंसेवी संस्‍था, महिला बचत गट, युवक-युवती, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही मोहिम यशस्‍वी करण्‍याचं आवाहन, घुगे यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल चार धाबाचालक आणि आठ मद्यपींवर कारवाई केली. याठिकाणी विना परवाना अवैधरित्या ग्राहकांना दारु पिण्यास परवानगी दिल्याचं आढळून आलं. या कारवाईत न्यायालयाने आरोपींना एक लाख चार हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यानवीन स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसंच चार उपजिल्हा रुग्णालयांना मंजूरी मिळाली असून, यासाठीचा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे. यात परांडा इथंल्या १०० खाटांच्या नव्या स्त्री रुग्णालयाचा, तसंच भूम तालुक्यातल्या वालवड इथल्या नवीन ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे.

****

No comments: