Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जून २०२३
सायंकाळी ६.१०
****
·
जागतिक योग दिवस उत्साहात साजरा; संयुक्त राष्ट्र मुख्यालयात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत योगाभ्यास.
·
राज्यात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत
योग केंद्र सुरू करणार -वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची
घोषणा.
·
आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी
विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू.
आणि
·
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात प्रशासकीय यंत्रणा सज्ज.
****
जागतिक
योगदिवस आज साजरा होत आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या
न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित योगसत्रात सहभागी होत आहेत. मुख्यालयाच्या
प्रांगणात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून या योगसत्राला प्रारंभ
होत आहे.
देशात
योग दिनाचा मुख्य कार्यक्रम मध्य प्रदेशात जबलपूर इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या
उपस्थितीत पार पडला. केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री
शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी
उपस्थित होते. या कार्यक्रमात योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचा संदेश प्रसारित करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत
राष्ट्रपती भवनात योग दिन साजरा करण्यात आला.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमत्त संयुक्त
राष्ट्र संघामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत, ही गौरवाची बाब असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुंबईत विधान भवनात योगाभ्यासादरम्यान ते बोलत होते. योग दिनानिमित्त
संपूर्ण राज्यात ३५ लाख लोकांना एकाच वेळेस
योगाभ्यास करण्याचं नियोजन केल्याची
माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
योग ही भारताची जगाला भेट असून या वारशाचं जतन करण्याची
तसंच जगात योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याची
सामुहिक जबाबदारी भारतीयांवर आहे, असं
प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय
योग दिनानिमित्त आज मुंबईत राजभवन इथं झालेल्या योगसत्रात ते बोलत होते. भावी पिढ्यांना योग शिकवण्यासाठी
भारतानं जगाला उत्कृष्ट योग प्रशिक्षक द्यावेत असं आवाहनही राज्यपाल बैस यांनी यावेळी केलं. तणावमुक्तीसाठी आणि जीवनशैलीशी निगडित आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग
उपयुक्त सिद्ध होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय, आयुष, आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी चिकित्सापद्धतीचा अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांत योग केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत वरळी इथं झालेल्या
कार्यक्रमात ते बोलत होते. या योगकेंद्रांमुळे रुग्णालयातील डॉक्टर, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना नियमित योगाभ्यास करता येईल, त्यासाठी तज्ज्ञ योग प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचंही
महाजन यांनी सांगितलं.
****
राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार इथं
योगाभ्यास केला.
सोलापूरात
डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते ९ व्या
आंतरराष्ट्रीय योग दिनाचं उद्घाटन करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातही आज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं जिल्हा आरोग्य प्रशिक्षण
पथकाकडून योग दिन साजरा करण्यात आला. गडचिरोलीच्या एटापली तालुक्याच्या अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल भागात योगदिवस साजरा झाला.
अकोल्यातील
वसंत देसाई जल तरणतलावात जय श्री राम समूहाने पाण्यावर योगाभ्यास केला.
****
औरंगाबाद
इथं भारतीय योग संस्थान, केंद्रीय संचार ब्यूरो आणि योग संवर्धन संस्थेच्या वतीनं योग
प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार
मंत्री अतुल सावे या कार्यक्रमात सहभागी झाले.
माजी
मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद इथं बालगृहातल्या बालकांसोबत योगाभ्यास केला. बालोन्नती फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण
विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात
जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह विविध सामाजिक संस्थासह,
शालेय विद्यार्थी, युवक तसंच शहरातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
हिंगोली इथल्या संत नामदेव कवायत मैदानावर योग दिवस साजरा
करण्यात आला. नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातल्या विविध भागात, शाळा, महाविद्यालयांमध्ये
योगाभ्यास करण्यात आला.
उस्मानाबाद इथं भाजप, पतंजली योग समिती
तसंच विविध सामाजिक संस्था संघटना आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन योग साधना
केली.
जालना शहरासह जिल्ह्यातही जागतिक योग दिवस उत्साहात
साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर आणि जेईएस महाविद्यालयात
योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं.
परभणी
जिल्ह्यात जिंतूर इथं आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर
यांनी योगसत्रात सहभाग घेतला. योगाचा वारसा जतन करण्यासाठी योग
दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त
केलं.
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या
दीक्षांत प्रांगणात जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.गौतम कांबळे
यांनी यावेळी बोलताना, सदृढ आरोग्यासाठी योग हा जीवनाचा एक अविभाज्य
घटक बनला पाहिजे, असं मत व्यक्त
केलं.
****
राष्ट्रीय कैडेट कोर- एनसीसीनं आज ९ वा आंतरराष्ट्रीय
योग दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ११
लाखांपेक्षा जास्त कॅडेटनी यात सहभाग घेतला. एनसीसी चे महानिदेशक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी
दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात योग आणि वसुधैव कुटुम्बकम
साठी योगाभ्यासाचं महत्त्व सांगत योग अंगीकारण्याचं आवाहन
केलं.
****
पुण्यात जी - 20च्या शिक्षण
कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी देखील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग
घेतला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च
आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
****
आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा
छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी घेतला आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण
असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांस पाच
लाख रुपये अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता
आल्यास १ लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसंच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च
मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल.
****
आषाढी एकादशी निमित्त येत्या २८ जून रोजी
विविध साधु संताच्या पालख्यांचे पंढरपूर आणि परिसरात आगमन होणार
आहे. २९ जून रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा होणार आहे. तर चार जुलै रोजी महाद्वार काला होऊन आषाढी वारीची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी विविध सेवा सुविधाची व्यवस्था करण्यात
आली आहे.
महिला भाविकांसाठी जवळपास तीन हजार ठिकाणी स्नानगृहं
उभारण्यात आली असून साडे आठ हजार ठिकाणी शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. २१ आपत्ती
व्यवस्थापन केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. पाणी पुरवठ्यासाठी ४९ टँकर्स आणि त्यामध्ये पाणी भरण्याची सुविधा करण्यात
आली आहे. औषधोपचार केंद्र, गॅस वितरण व्यवस्था, तसंच सुरक्षेबाबत नियोजन करण्यात आलं आहे.
****
गेल्या वर्षी अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी २२६ कोटी ९८ लाख, बीड १९५ कोटी ३ लाख, जालना १३४ कोटी २२ लाख, उस्मानाबाद १३७ कोटी ७ लाख,
तर परभणी जिल्ह्यासाठी ७० कोटी ३७ लाख रुपये
निधी वितरित केला जाणार आहे.
****
केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती आणि
नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी आणि शर्ती निश्चित करण्यात आल्या
आहेत. नांदेड जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी
समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन नांदेडचे
सहायक आयुक्त बी.एस.दासरी यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment