Wednesday, 21 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 21.06.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारताच्या आवाहनावर १८० हून अधिक देशात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होण्याची घटना अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नववा जागतिक योग दिन आज सर्वत्र साजरा करण्यात येत असून, यानिमित्त जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान बोलत होते. योगामुळे एक निरोगी आणि शक्तिशाली समाज निर्माण होतो, असं सांगून त्यांनी देशवासियांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत योग दिनाचा मुख्य कार्यक्रम झाला. केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते. योग हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

मुंबईत विधानभवनात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विविध मान्यवर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी रहा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

औरंगाबाद इथं भारतीय योग संस्थान, केंद्रीय संचार ब्यूरो आणि योग संवर्धन संस्थेच्या वतीनं योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते.

****

कॅफे शॉप्स अर्थात हॉटेल्समध्ये गैरकृत्यं होऊ नयेत, यासाठी लातूर जिल्ह्यात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. ही नियमावली कालपासून लागू झाली असून, आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी येत्या नऊ जुलैपर्यंत मुदत दिल्याचं जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटलं आहे.

****

भारतीय बॅडमिंटन जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी जागतिक क्रमवारीत तिसरं स्थान पटकावून इतिहास रचला आहे. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुरूष दुहेरीत इतक्या उच्च स्थानापर्यंत पोहोचणारी ही पहिलीच भारतीय जोडी आहे.

****

No comments: