Sunday, 28 July 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २८ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 28 July 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करणं हे प्रत्येक भारतीयाचं उद्दीष्ट - नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांचं प्रतिपादन, राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्प राबवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा

·      महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सी.पी. राधाकृष्णन, तर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

आणि

·      पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत मनू भाकर अंतिम फेरीत तर हॉकीत भारताची विजयी सलामी

****

२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करणं हे प्रत्येक भारतीयाचं उद्दीष्ट असून, नागरिकांशी थेट संपर्क असल्यानं, राज्य सरकारं यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत नीती आयोगाच्या ९ व्या बैठकीत ते काल बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दूध, कापूस, सोयाबीन आणि कांदा यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांसह, महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या पायाभूत आणि विकास प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित केला. मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या दुष्काळ निवारणाच्या अनुषंगानं राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्प राबवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासह समुद्रात वाहून जाणाऱ्या नद्यांचं पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासह अनेक मुद्दे या चर्चेत आल्याची माहिती त्यांनी दिली.

“नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीमध्ये देखील आपण जसं मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातलं जे वाया जाणारं पाणी यासंदर्भात देखील मी तिथे मुद्‍दा उपस्थित केला. आणि मोदी साहेबांनी देखील नदीजोड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घ्या अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत.”

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसंच युवकांसाठी स्टायपेंड अर्थात विद्यावेतन योजनेबाबत विरोधकांकडून होणारी टीका निराधार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीही, या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या निराधार तसंच राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे.

****

सांगली इथं पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी सैन्यदलाचं पथक दाखल झालं आहे. यामध्ये अभियंता कृती दल, पायदळ आणि वैद्यकीय पथकातल्या सुमारे १०० जवानांसह बचाव उपकरणं आणि बोटींचा समावेश आहे. जिल्ह्यात चार हजारावर नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदी काल दुपारी ४० फूट उंचावरून तर मिरज कृष्णा घाट इथं ५२ फूट उंचावरून वाहत होती.

****

कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे. त्यामुळे राजाराम बंधाऱ्याची पंचगंगा नदीची पाणी पातळी ४७ फुटांवर पोहोचली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातले ११ राज्य मार्ग आणि ३७ प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेत, आपत्तीग्रस्त नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्याचबरोबर अलमट्टी धरणातल्या पाणी विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करण्यासही सांगितलं आहे.

****

आरक्षणाबाबत सरकारने सर्वांशी सुसंवादाची भूमिका ठेवावी, ही आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. संसदेच्या अधिवेशनानंतर विधानसभेच्या आगामी  निवडणुकांच्या जागावाटपाची चर्चा केली जाईल, असं पवार म्हणाले.

दरम्यान, विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी काल शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

काल सकाळी, ज्येष्ठ विचारवंत लेखक शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी काल विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झारखंडचे विद्यमान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

तेलंगणाचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा, सिक्किम - ओम प्रकाश माथुर, झारखंड - संतोष कुमार गंगवार, छत्तीसगढ - रामेन डेका, तर आसामचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबच्या राज्यपाल पदासह केंद्रशासित प्रदेश चंडीगडच्या प्रशासकपदी गुलाब चंद कटारिया यांची, पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून के. कैलाशनाथन, तर मेघालयचे राज्यपाल म्हणून सी.एच. विजयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा दुसरा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांरून, न्यूज ऑन एआयआर हे संकेतस्थळ आणि मोबाइल ॲपवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाईल. आकाशवाणी, दूरदर्शन, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनल्सवरूनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आपण ऐकू शकाल.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत

****

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल पात्रता स्पर्धेत तिसरं स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. आज दुपारी तीन वाजता अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे. गेल्या वीस वर्षांत नेमबाजीत वैयक्तिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी मनू भाकर ही पहिली नेमबाज ठरली आहे.

दरम्यान, या स्पर्धेत १० मीटर मिश्र एअर रायफल प्रकारात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. काल पात्रता फेरीत भारताचे संदीप सिंग आणि एलविन वलारिवान १२ व्या स्थानावर तर अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल यांची जोडी सहाव्या क्रमांक पर्यंत पोहोचू शकली.

हॉकीमध्ये भारताने न्यूझीलंडचा तीन - दोन असा पराभव करत विजयी सलामी दिली. हरमनप्रीत कौरनं सामना संपण्यास एक मिनिट शिल्लक असताना पेनल्टी शूट आऊट मध्ये गोल करुन देशाला विजय मिळवून दिला.

बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी यांनी पहिल्या सामन्यात फ्रान्सच्या जोडीवर विजय मिळवला. तर पुरुष एकेरीतही लक्ष्य सेननं ग्वाटेमालावच्या खेळाडुचा २१- , २२ - १० असा पराभव केला.

मुष्टीयुद्धमध्ये महिलांच्या ५४ किलो वजनी गटात भारताच्या प्रीती पवारनं व्हिएतमानच्या खेळाडुचा पाच - शून्य असा पराभव केला.

रोईँग मध्ये पुरुष एकेरीत स्कल्स प्रकारात बलराज पनवर चौथ्या स्थानावर राहीला.

****

श्रीलंकेत पल्लेकेले इथं काल झालेल्या पहिल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने निर्धारित षटकात सात बाद २१३ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला श्रीलंकेचा संघ १७० धावांवर सर्वबाद झाला. रियान परागनं तीन, तर अर्शदिप सिंग आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला दुसरा सामना आज होणार आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या आठ आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्रांना, राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झालं आहे. या सर्व केंद्रांना सलग तीन वर्षे विविध बारा सेवांसाठी प्रत्येकी १८ हजार रुपये याप्रमाणे दोन लाख १६ हजार रुपये रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे.

****

लातूर जिल्हा रुग्णालयासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं प्रशासकीय मान्यता दिलेल्या कोळपा इथल्या कृषी महाविद्यालयाच्या जागेबाबत जिल्हाधिका-यांनी तातडीनं प्रस्ताव दाखल करण्याचं पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सूचित केलं आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यातल्या आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणावर भर देण्यासह लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयात नविन वैद्यकीय चाचणी उपकरणं लवकरच उपलब्ध होतील असही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, नांदेड इथंही जिल्हा नियोजन समितीची बैठक महाजन यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली. या बैठकीत २०२४-२५ या वर्षासाठी ७४९ कोटींची तरतूद करण्यात आली.

****

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यात येत असल्याचं, पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. परवा शुक्रवारी परंडा तालुक्यात वाटेफळ इथं ग्रामस्थांच्या वतीनं सावंत यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथं तरंग, या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मेळाव्याला कालपासून प्रारंभ झाला. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅक अर्थात नाबार्ड च्या पुण्याच्या प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक प्रदीप पराते यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन झालं. अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रीय पद्धतीने उत्पादन केलेल्या वस्तुची खरेदी करून त्यांना बळ द्यावं, असं आहवान करण्यात आलं आहे .

****

बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा काल पार पडला.

****

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या नऊ ऑगस्टला क्रांती दिनी पुणे इथं भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी काल लातूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शेतमालावरील निर्यातबंदी रद्द करावी, उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव द्यावा, सर्व कर्ज, वीजबिल आणि पाणीपट्टी करातून शेतकऱ्यांना मुक्त करावं, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जुनी पेन्शन योजना सर्व विभागातल्या कर्मचाऱ्यांना विनाअट लागू करावी यासाठी, राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं, नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आलं. नांदेडमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनुदानाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून सुरु असलेलं धरणे आंदोलन कालही सुरु होतं.

****

No comments: