Sunday, 28 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.07.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 July 2024

Time 01.00 to 01.05PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या एकशे बाराव्या भागातून आज देशवासीयांशी संवाद साधला.

त्‍यात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या खेळाडूंना जागतिक पातळीवर तिरंगा फडकावण्याची संधी देतात. या स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंना प्रोत्‍साहन देत त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं सर्वोत्‍तम कामगिरी नोंदवत चार सुवर्ण, एक रौप्यपदक पटकावत पहिल्या सर्वोत्तम पाच संघात स्थान मिळवल्याचं त्यांनी नमूद केलं. या स्‍पर्धेत यशस्‍वी झालेले पुण्यातील आदित्य वेंकट गणेश आणि सिद्धार्थ चोप्रा, मुंबईचा ऋषिल माथुर, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, गुवाहाटीचा आनंदो भादुरी आणि नोएडाचा कणव तलवार यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी दुरध्वनीवरुन संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले. पंतप्रधानांनी देशातील इतर युवकांना त्यांच्यापासून गणित विषयातून आंनद घेण्याची प्रेरणा मिळेल असं सांगितलं.

आसाममधील आहोम राजघराण्यातील लोकांची स्मृतिस्थळे असलेल्या मोईदम्सचा युनोस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. याविषयी पंतप्रधान मोदी यांनी ९ मार्च रोजी आहोम राजा लसिथ बोरफुकन यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्याचा बहुमान मिळाल्याची आठवण सांगतानाच देशवासीयांनी भविष्यात प्रवासाच्या योजनांमध्ये या स्थळांचा आवर्जुन समावेश करावा, असं आवाहन केलं.

पब्लिक आर्ट ऑफ इंडिया म्हणजेच परी प्रकल्‍प हा उदयोन्मुख कलाकारांना एका व्यासपीठावर आणण्याचं प्रमुख माध्यम बनलं आहे. देशातील रस्त्यांच्या कडेला, भितींवर आणि भुयारी मार्गांवर खूप सुंदर चित्रे दिसतात. त्या कलाकृती परी संस्थेच्या संबंधित कलाकारांनी बनविलेल्या आहेत. त्यातून आपली कला आणि संस्कृती लोकप्रिय होण्यास मदत होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. हरियाणातील उन्नती बचत गटाबद्दल सांगतानांच त्या माध्यमातून महिलांच्या जीवनात समृद्धीचे रंग भरण्यात येत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

****

पॅरीस ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी भारताचा विविध खेळ प्रकारात यश मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. बॅडमिंटमध्ये महिला एकेरीत पी. व्ही. सिंधुचा गट साखळीतला सामना थोड्या वेळापूर्वीच सुरु झाला आहे. तर, पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयचाही सामना होत आहे.

नेमबाज मनू भाकर महिला दहा मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत दुपारी साडेतीन वाजता पदकासाठी खेळणार आहे. तर, दहा मिटर एयर राइफल्स खेळात महिलांमध्ये रमिता जिंदल आणि एलावेनिल वलारिवान तर, पुरुषांमध्ये संदीप सिंह आणि अर्जुन बाबूता सहभागी होत आहे. मुष्टीयुध्दात महिला पन्नास किलो वजनी गटात निखत जरीन पहिला सामना पावणेचार वाजता खेळेल.

रोइंगमध्ये पुरुष एकल स्कल्स रेपेचेज प्रकारात बलराज पंवारचा सामना थोड्याच वेळात दुपारी सव्वा वाजता आहे. टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत शरथ कमलचा सामना दुपारी तीन वाजता, त्यानंतर हरमीत देसाई तसंच महिला एकेरीत श्रीजा अकुला त्यापुढे मनिका बत्रा यांचेही सामने असणार आहेत. धनुर्विद्या प्रकारात दीपिका कुमारी, अंकिता भकत और भजन कौर यांचा संघ संध्याकाळी पावणेसहाला उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळतील.

टेनिसच्या पुरुष एकेरीत सुमित नागल तर, पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि श्रीराम बालाजी ही जोडी पहिल्या फेरीचा सामना खेळतील. जलतरणमध्ये भारताची सर्वात कमी वयाची खेळाडू धिनिधि देसिंघु महिला दोनशे मीटर फ्रीस्टाइल आणि पुरुष शंभर मीटर बॅकस्ट्रोकमध्ये श्रीहरी हा खेळाडू खेळणार आहे.

****

राज्य विधिमंडळातील विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत ११ सदस्यांचा शपथविधी समारंभ आज सकाळी पार पडला. या सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ उपसभापती डॉक्टर निलम गोऱ्हे यांनी दिली. शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे प्रत्‍येकी दोन आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एक आमदाराचा समावेश आहे.

****

आज, विदर्भासह मध्य महाराष्ट्राचा घाट प्रदेश तसंच कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच गोवा, कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस होणार असल्यांचंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरीप हंगाम-२०२४ पिक स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केलं आहे.

पिक उत्पादन वाढवण्यासाठी होणाऱ्या विविध प्रयोगांसाठी शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, मिळणाऱ्या प्रोत्साहनातून अधिक उमेदीनं नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी होईल. याचं मार्गदर्शन परिसरातील अन्य शेतकऱ्यांना होऊन त्यांचाही लाभ होईल या उद्देशानं राज्य कृषि विभागातर्फे ही पिक स्पर्धा घेण्यात येते.

या स्पर्धेतील विजेत्यांना तालुका, जिल्हा, राज्य अशा स्तरावरील विविध गटात रोख रकमेचं बक्षीस मिळणार आहे.

****

संत गजानन महाराजांची श्री क्षेत्र पंढरपूरहून शेगावकडे परतीचा प्रवास करणारी पालखी आज बीड इथं दाखल झाली. रिमझीम पावसात शहरवासीयांनी पालखीचं दर्शन घेतलं. शहरात कंकालेश्वर मंदिरात मुक्कामी असलेली ही पालखी उद्या इंथून प्रस्थान ठेवणार असून, शेगावला ११ ऑगस्टला पोहोचणार आहे.

****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका- राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

No comments: