Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 30 July 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ३० जूलै २०२४
सायंकाळी ०६.१०
****
· मुख्यमंत्री लाडकी बहीण तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ५२ लाखांवर लाभार्थी
महिलांना वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
· इनामी तसंच देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये येणार-मराठवाड्यात ५५ हजार हेक्टर
जमिनी खुल्या होणार
· उरण इथल्या यशश्री शिंदे हत्याप्रकरणी, आरोपी
दाऊद शेख याला कर्नाटकातून अटक
आणि
· पॅरिस ऑलिपिंकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनु भाकर आणि सरबजोत सिंग जोडीला
कांस्यपदक
****
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय
राज्य शासनानं घेतला असून याअंतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी
महिलेच्या कुटुंबाला तसंच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील
सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना घरगुती वापराच्या वार्षिक ३ गॅस सिलिंडरचं पुनर्भरण
मोफत करून दिले जाणार आहे. यासंदर्भातला शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. या योजनेचा
लाभ मिळण्यासाठी सदर गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे. एका कुटुंबात फक्त
एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल, तसंच फक्त १४ किलो २०० ग्रॅम
वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना हा लाभ लागू असेल असं शासन निर्णयात
नमूद करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनामी आणि देवस्थानच्या
जमिनी वर्ग एक मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या जमिनी मूळ
मालकाला मिळणार असल्याने गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे.
यासंदर्भात यथायोग्य प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर निर्णयार्थ ठेवण्यात यावा, असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले. सदर निर्णयामुळे मराठवाड्यातील छत्रपती
संभाजीनगर,
जालना, परभणी, नांदेड,
हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जवळपास ५५ हजार हेक्टर जमिनी खुल्या होणार
आहेत.
****
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी
त्यांना गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी दिले आहेत. आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. वेगवेगळ्या कारणांमुळे
संस्थात्मक पीककर्ज प्रणालीच्या बाहेर राहिलेल्या नऊ हजार ६९८ आदिवासी शेतकऱ्यांना
दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा, असं
निर्देशही पवार यांनी दिले.
****
राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज
पार पडली,
या बैठकीत राज्यात ८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांना
मंजुरी देण्यात आली. यामुळे मराठवाड्यासह कोकण तसंच विदर्भात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक
होणार असून,
सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.
****
म्हाडाच्या पात्र विजेत्या अर्जदारांचं ७० हजार ५०० रुपये ना-हरकत
प्रमाणपत्र शुल्क माफ करण्यात आलं आहे. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण
मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज मुंबईत गाळेधारकांना देकारपत्र प्रदान करण्यात आले, त्या कार्यक्रमात मंत्री सावे यांनी ही घोषणा केली.
****
केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात तोडगा काढत
असेल तर आमच्या पक्षाचा पाठिंबा असेल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत
ते बोलत होते. त्यापूर्वी आज मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या आंदोलकांनी उद्धव ठाकरे
यांची भेट घेऊन निवेदन दिलं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत ठाकरे यांनी
भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.
****
मराठा समाजातील गरीबांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या
२८८ जागा लढवाव्यात, असं आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं
आहे. ते आज लातूर इथं वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेसाठी आले असता, पत्रकारांशी बोलत होते. ही यात्रा औसा, निलंगामार्गे
काल रात्री लातूर इथं पोहोचली. लातूरहून आज ही यात्रा बीड जिल्ह्याकडे रवाना झाली.
****
मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज मुंबईत राजभवनात निरोप देण्यात
आला. नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.
राधाकृष्णन यांना उद्या सायंकाळी राजभवनात पदाची शपथ दिली जाणार आहे.
****
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही क्षेत्रासाठी पूर्वीच्या
तुलनेत कमी निधीची तरतूद केलेली नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी नमूद केलं आहे. त्या आज लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला
उत्तर देत होत्या. अर्थसंकल्पावर टीका करण्यापूर्वी अर्थसंकल्प वाचून घेण्याचं आवाहन
सीतारामन यांनी केलं.
****
केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ६३
जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं असून, १२८ हून अधिक जखमींना
विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घनटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, पंतप्रधान सहाय्यता निधीतून
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींच्या उपचारासाठी ५० हजार रुपये
मदत जाहीर केली आहे.
****
रायगड जिल्ह्यातल्या उरण इथल्या यशश्री शिंदे हत्याप्रकरणी, मुख्य आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील अल्लर गावातून अटक करण्यात आली आहे. पोलीस
आयुक्त दीपक साकोरे यांनी आज नवी मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली. प्राथमिक चौकशीत
दाऊदने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली आहे, मात्र
चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्यानं हत्या का केली याबद्दल कोणताही निष्कर्ष काढता येणार
नाही असं साकोरे यांनी म्हटलं आहे. २७ जुलैला उरण इथं यशश्रीची हत्या करून दाऊद शेख
फरार झाला होता.
****
भारतीय नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिपिंकमधे
१० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र दुहेरी गटातं कांस्य पदक पटकावलं आहे. दक्षिण कोरियाच्या
संघाचा १६ -१० असा पराभव करत, मनू आणि सरबजोत जोडीनं कांस्यपदकाला
गवसणी घातली. मनू भाकरचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे दुसरं पदक आहे. अशी कामगिरी करणारी
ती पहिलीच भारतीय स्पर्धक ठरली आहे. याच स्पर्धेच्या वैयक्तिक प्रकारातही तिने कांस्यपदक
पटकावलेलं आहे. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच मुष्टियोद्धा सुशीलकुमार यांनीही ऑलिम्पिमध्ये
प्रत्येकी दोन पदकं मिळवली आहेत, पण ती वेगवेगळ्या दोन ऑलिम्पिक
स्पर्धांसाठी मिळवली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान
नरेंद्र मोदी,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी
या यशाबद्दल दोन्ही नेमबाजांचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनच्या
दुहेरी प्रकारात सात्विक आणि चिराग तसंच तनिषा आणि अश्विनी जोडीचे सामने होणार असून, मुष्टियुद्ध प्रकारात अमित पंगाल, जॅस्मिन आणि प्रीती पवार
यांचे सामने होणार आहेत.
****
श्रीलंकेत सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघात तीन टी ट्वेंटी
क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय संघानं पहिले
दोन सामने जिंकून मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
५६ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये भारतीय
विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्यपदक पटकावलं
आहे. महाराष्ट्रात जळगावच्या देवेश पंकज भैया यानं सुवर्ण, मुंबईचा
अवनिश बन्सल आणि हैदराबादचा हर्षिन पोसीना यानं रौप्य पदक तर मुंबईच्या कश्यप खंडेलवाल
यानं कांस्यपदक पटकावलं आहे.
****
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कारांची
आज घोषणा करण्यात आली. यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव
पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रेमानंद गज्वी यांना, राज्यस्तरीय
उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉ.समीर चव्हाण यांना, राज्यस्तरीय
विशेष साहित्य पुरस्कार- प्रफुल्ल शिलेदार यांना, अहमदनगर
जिल्हा साहित्य पुरस्कार डॉ.श्रीनिवास हेमाडे यांना, राज्यस्तरीय
नाट्यसेवा पुरस्कार प्राजक्त देशमुख यांना आणि राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार तमाशा
कलावंत हसन शेख पाटेवाडीकर यांना जाहीर झाला आहे. येत्या नारळी पौर्णिमेला अहमदनगर
इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. पुरस्काराचं हे चौतीसावं वर्ष आहे.
****
राज्यात महसूल दिनानिमित्त एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह
साजरा होणार आहे. यात राज्य सरकारच्या विविध योजनांबाबत माहिती देऊन नागरिकांच्या समस्या
सोडवण्यात येणार आहेत.
बीड इथं जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते या उपक्रमाला
सुरुवात होणार आहे. परभणी जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांनी या महसूल सप्ताहामध्ये
सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात या सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी
कार्यालयामार्फत तालुकास्तरावर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं रुग्णालयातला जैविक कचरा उघड्यावर टाकल्या
प्रकरणी,
महानगरपालिकेकडून सदर रुग्णालयाला २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात
आला आहे. मनपा उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रविंद्र जोगदंड यांच्या
मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment