Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 July 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारत नेट योजनेत साडे नऊ हजार ग्रामपंचायती पूर्णपणे इंटरनेट
सुविधेने जोडल्या गेल्या असून, महाराष्ट्रातला शहरी भाग शंभर टक्के तर नव्वद टक्के ग्रामीण
भाग इंटरनेटने जोडला गेला आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी
आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली.
गडचिरोलीचे काँग्रेसचे खासदार नामदेव किरसन यांनी हा मुद्दा
उपस्थित केला होता. देशभरात चोवीस हजार गावांमध्ये कनेक्टिव्हीटी साठी बावीस हजार कोटी
रुपयांची योजना राबवली जात आहे. गडचिरोलीचाही त्यात समावेश असल्याचं, शिंदे यांनी सांगितलं. देशभरात सहा लाखांवर गावं भारत
नेटच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जोडले गेले आहेत. उर्वरित ग्रामपंचायती यामध्ये
जोडण्यासाठी एक लाख एकोणतीस हजार कोटी रुपयांची सुधारित योजना केद्र सरकार राबवणार
असल्याचं, शिंदे यांनी अन्य एका प्रश्नाच्या
उत्तरात सांगितलं.
देशात त्र्याण्णव कोटी जनतेला इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळाली
असून, इंटरनेटचा वेग एकशे सात मेगाबाईट
प्रतिसेकंद पर्यंत वाढला असल्याचं शिंदे यांनी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.इंटरनेट
सुविधेचा दर तीन पैसे प्रतिमिनीट पर्यंत कमी केला असून, मोबाईल डेटा नऊ रुपये बारा पैसे पर जीबी दराने उपलब्ध असल्याची
माहिती शिंदे यांनी दिली.
सध्या देशातले डिजीटल व्यवहार सोळा हजार शंभर कोटी रुपयांपर्यंत
पोहोचले असून, हे प्रमाण जगभरातल्या एकूण व्यवहारांच्या
पंचेचाळीस टक्के एवढं असल्याचं दूरसंचार मंत्र्यांनी सांगितलं.
****
बुलेट ट्रेन योजना गतीनं सुरू असल्याची माहिती केंद्रीय
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात एका
पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पामध्ये, देशात प्रथमच समुद्राखाली तीस मीटर खोलीवर एकवीस किलोमीटर
बोगदा निर्माण केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर
आधारित असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे.
****
लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार
धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. माने यांच्या निवडीचे पत्र शिवसेना
पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले.
शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची निवड
यापूर्वीच करण्यात आलेली आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग- यूपीएससी -च्या अध्यक्षपदी प्रीती
सुदान यांची नियुक्ती झाली आहे. सुदान या १९८३ च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत.
ही नियुक्ती उद्या म्हणजे एक ऑगस्टपासून अमलात येणार आहे.
****
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले आम आदमी
पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया तसंच भारत राष्ट्र समिती पक्षाच्या नेत्या
के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयानं येत्या
तेरा ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
****
केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेतल्या
मृतांची संख्या एकशे सत्तावन्नवर पोहचली आहे तर एकशे शहाऐंशी जणांवर विविध दवाखान्यांमध्ये
उपचार सुरू आहेत. अद्याप सुमारे शंभर जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेनंतर अनेक मृतदेह
मलप्पुरम जिल्ह्यातल्या चलियार नदीत वाहून गेले होते, ते मृतदेह काढण्याचं कामही सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून
या स्थळी मदतीचे शक्य ते सगळे प्रयत्न सुरू असून केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी
आज मदत शिबिराला भेट देऊन परिसराची पाहणी केली.
****
खरीप २०२४ हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी
होण्याचा आज अखेरचा दिवस आहे.
आज सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात एक कोटी त्रेसष्ट लाख
साठ हजार पेक्षा अधिक पीकविमा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी
आपला विमा तात्काळ भरून घ्यावा असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं
आहे.
दरम्यान, यापूर्वी जाहीर हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानापोटी, राज्यातील सुमारे त्रेपन्न लाख त्र्याऐंशी हजार सोयाबीन
उत्पादकांना दोन हजार सहाशे बारा कोटी तर सुमारे तीस लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना
दीड हजार कोटी रुपये लाभाचे वितरण थेट त्यांच्या संलग्न बँक खात्यांमध्ये करण्यात येत
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पाचव्या दिवशी भारतीय खेळाडू मुष्टियुद्ध, तीरंदाजी, नेमबाजी आणि बॅडमिंटनचे सामने खेळणार आहेत. नेमबाजीत, स्वप्निल कुसळे पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स
पात्रता स्पर्धेत भाग घेणार आहे. बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची लढत इंडोनेशियाच्या
जोनाथन क्रिस्टीशी तर एच एस प्रणॉयची लढत व्हिएतनामच्या डच फाट लीशी होणार आहे.
महिला एकेरीत पीव्ही सिंधूची लढत एस्टोनियाच्या क्रिस्टिन
कुउबाशी होणार आहे.
रोईंगमध्ये बलराज पवार उपांत्य फेरीतला सामना खेळणार आहे.
टेबल टेनसमध्ये मनिका बत्रा सोळाव्या फेरीतला तर श्रीजा
अकुला ३२ व्या फेरीतला सामना खेळणार आहे.
****
No comments:
Post a Comment