आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२९
जूलै २०२४ सकाळी
११.०० वाजता
****
संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सदनात अर्थसंकल्पावरील चर्चा पुढे सुरु होईल. दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि देशासाठी अमृत पिढी घडवणारा
असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा देशाच्या १४० कोटी जनतेला मिळणार असल्याचा
पुनरुच्चार त्यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केला.
****
आंतरराष्ट्रीय
व्याघ्र दिवस आज पाळण्यात येत आहे. वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचं संरक्षण करण्यासाठी
आणि व्याघ्र संवर्धनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक प्रणालीला चालना देणं, हा या दिनामागचा उद्देश आहे.
****
स्त्रियांना
आपलं कर्तृत्व दाखवायला संधी द्यायला हवी, समतेचे विचार मांडताना समान संधी समान न्याय देणं गरजेचं असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत वाशी इथं काल देशातल्या पहिल्या सामाजिक ऐक्य परिषदेत
ते बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर सामाजिक ऐक्य असलं पाहिजे, असंही पवार यावेळी म्हणाले.
****
पुण्यात
आणखी आठ जणांना झिकाची बाधा झाली आहे. त्यामुळे पुण्यातल्या झिका विषाणू बाधित रूग्णांची
संख्या आता ४५ झाली आहे. या रुग्णांच्या इतर गुंतागुंतीच्या तपासण्याही आरोग्य विभाग
करत असून, याबाबत महापालिकेच्या आरोग्य
विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पत्र लिहिलं आहे.
****
छत्तीसगडमध्ये
झालेल्या कनिष्ठ गटाच्या हॉकी इंडिया विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष
या दोन्ही संघांना उपविजेतेपद मिळालं आहे. पुरुष गटात मध्य प्रदेशकडून महाराष्ट्र संघाचा
चार - सहा असा, तर महिला गटातही मध्य प्रदेशकडून
चार - दोन असा पराभव झाला.
****
नांदेड
शहरात स्नेहनगर इथं मुख्य रस्त्यावरील एक झाड कोसळून काल एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू
झाला. यश गुप्ता असं मृत मुलाचं नाव असून, तो आई - वडीलांसोबत दुचाकीवरुन जात असताना ही घटना घडली.
****
बुलडाणा
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने जिल्ह्यातले प्रकल्प
तुडुंब भरले आहेत. नद्यांना पूर आल्याने मेहकर तालुक्यात मासेमारी करणारा व्यक्ती बेपत्ता
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment