Tuesday, 30 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.07.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

३० जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

 मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाड जिल्ह्यात मेपाडी जवळच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनात १९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घनटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींच्या उपचारासाठी ५० हजार रुपांची मदत जाहीर केली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत विकसित भारताच्या दिशेने प्रवास या विषयावरच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्प पश्चात परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत. विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करताना त्यातील सरकारची आर्थिक विकासाची दृष्टी आणि उद्योगांची भूमिका याबद्दलची रुपरेषा सादर करण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

उडान योजनेअंतर्गत सध्या १३ हेलिकॉप्टर तळांसह ८५ विमानतळांना जोडणारे ५७९ मार्ग कार्यरत असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. देशभरात १२ हरित विमानतळ गेल्या १० वर्षांमध्ये कार्यरत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

भंडारा जिल्ह्यातल्या शहापूर इथं कत्तलीसाठी तब्बल १३३ गोवंशांना बांधून ठेवणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरुन संबंधित आरोपीच्या घरावर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. यावेळी ११ जनावरांना वाहनात कोंबून ठेवण्यात आल्याचं निदर्शनास आलं. या जनावरांना मुक्त करून गोशाळेत पाठवण्यात आलं.

****

जालना जिल्ह्यातल्या मंठा इथं भरधाव टेंपोने तीन जणांना चिरडल्याची घटना काल घडली. मृतांमध्ये एका सहा वर्षीय मुलीचा समावेश आहे.

****

मुंबईची जिया राय, इंग्लिश खाडी सर्वात कमी वेळात पार करणारी जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू ठरली आहे. १६ वर्षांच्या जियानं ३४ किलोमीटरचं हे अंतर १७ तास, २५ मिनिटांमध्ये पार केलं.

****

कोल्हापुरात पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, जनजीवन पुन्हा पूर्ववत होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतली. मात्र विविध धरणांतून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने, जिल्ह्यातल्या १३ मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे.

****

No comments: