Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 29 July 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २९ जूलै २०२४
सायंकाळी ०६.१०
****
· देशात येत्या काही वर्षांत बेरोजगारीचा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी होणार-केंद्रीय
श्रम आणि रोजगार मंत्र्यांकडून विश्वास व्यक्त
· पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानाचे तीन कोटी रुपये
वर्ग
· मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १४ हजार ७६० कोटी रुपये
वीज दर माफी
आणि
· ५४ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची दोन सुवर्णांसह पाच
पदकांची कमाई
****
देशात बेरोजगारीचा दर तीन पूर्णांक दोन दशांश टक्के झाला असून, येत्या काही वर्षांत बेरोजगारीचा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी होईल, असा विश्वास केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी व्यक्त आहे.
ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या विविध
योजनांच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांत चार कोटी रोजगार निर्मिती होणार असून, देशात रोजगाराची टंचाई नसल्याचं, मांडवीय यांनी नमूद केलं
आहे.
****
दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये पावसाचं पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा
मृत्यू झाल्याप्रकरणी आज संसदेत चर्चा झाली. शाळा महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या
शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचं, खासदार
फौजिया खान यांनी म्हटलं आहे. आज राज्यसभेत या विषयावरच्या अल्पकालीन चर्चेत त्या बोलत
होत्या. कोचिंग क्लासच्या रुपात समांतर शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता नसल्याचं सांगत, फौजिया खान यांनी यासंदर्भात एक नियामक संस्था असण्याची गरजही व्यक्त केली.
भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी प्रारंभ केलेल्या या चर्चेत तृणमूल
काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, डीएमकेचे तिरुची शिवा, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, काँग्रेसचे
रणदीप सुरजेवाला, राजदचे मनोजकुमार झा, यांच्यासह केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, रामदास
आठवले,
आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनीही या चर्चेत सहभाग
घेतला.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चर्चेत बोलतांना, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं
नमूद केलं. कोचिंग क्लाससंदर्भात असलेल्या कायद्याचं राज्य सरकारांनी काटेकोर पालन
करण्याची गरज प्रधान यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेमुळे दिल्लीतल्या या
भागातील १३ प्रशिक्षण केंद्रांना महानगरपालिकेनं टाळे ठोकले असून तळघरातील तीन प्रशिक्षण
केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यासोबतच चौकशीचे आदेशही देण्यात आले असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे.
या अल्पकालिक चर्चेनंतर राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या
चर्चेला प्रारंभ झाला.
लोकसभेत भाजपच्या बांसुरी स्वराज, काँग्रेसचे
शशी थरूर,
समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, यांनी
शून्य काळात दिल्लीतल्या या घटनेकडे सदनाचं लक्ष वेधलं. केंद्रीय गृहमंत्रालयानं या
घटनेसंदर्भात चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली.
दुपारच्या सत्रानंतर लोकसभेतही अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली, या अर्थसंकल्पात जात आधारित जनगणनेबाबत काहीही घोषणा नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते
राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली.
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे, ‘बोलाची कढी बोलाचा भात’, असल्याची टीका केली.
****
केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व राज्यांना आवश्यकतेनुसार निधीची
तरतूद करण्यात आली असून हा समतोल अर्थसंकल्प असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री एस.पी.
सिंह बघेल यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पाची माहिती
देत होते. या अर्थसंकल्पात गरीब, युवक, नारी शक्ती आणि शेतकरी अशा सर्वच घटकांना प्राधान्य देत, देशाच्या विकासासाठी नऊ सूत्रांवर हा अर्थसंकल्प आधारित असल्याचं बघेल यांनी सांगितलं.
****
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना
सानुग्रह अनुदानापोटी तीन कोटी रुपये निधी वर्ग करण्यात आला आहे. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हरिभक्त परायण अक्षय
महाराज भोसले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा प्रथमच मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची
घोषणा केली होती. परतवारी पूर्वीच या घोषणेची पूर्तता झाल्याने राज्यभरातल्या लाखो
वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचं अक्षय महाराज भोसले यांनी सांगितलं.
****
राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
घेतला आहे. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू
करावे,
असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
शेतकऱ्यांसाठी "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना - २०२४"
शासनाने लागू केली आहे. आता साडे सात अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. "एप्रिल २०२४ पासून मार्च २०२९
पर्यंत राज्यात ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे, सध्या
देण्यात येणारे वीज दर सवलतीचे सहा हजार ९८५ कोटी रुपये तसंच वीज दर माफीनुसार सात
हजार ७७५ कोटी रुपये खर्च होणार आहे. एकूण १४ हजार ७६० कोटी रुपयांची वीज दर माफी राज्यातील
शेतकऱ्यांसाठी केली जात आहे.
****
सर्वसामान्य नागरिकांना जलदगतीने न्याय देणे ही आपली सर्वांची
जबाबदारी असल्याचं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार
उपाध्याय यांनी केलं आहे. आज धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन न्यायमूर्ती
उपाध्याय यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
पॅरीस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकर आणि सरबजोत
सिंग ही जोडी दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदकाच्या अंतिम फेरीसाठी
पात्र ठरली आहे. उद्या त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या जोडीशी होणार आहे. याच प्रकारात
अर्जुन चीमा आणि रिदम संगवान या भारतीय जोडीला दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
रमिता जिंदाल ही महिलांच्या दहा मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिली.
पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारताचा अर्जुन बबुता चौथ्या क्रमांकावर राहिल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत भारताचे चिराग शेट्टी आणि सात्विक
साईराज रंकीरेड्डी जोडीला आज पुढे चाल मिळाली. उद्या त्यांचा सामना इंडोनेशियाई जोडीशी
होणार आहे.
****
इराण इथं झालेल्या चोपन्नाव्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड
स्पर्धेत भारतानं पाच पदकांची कमाई केली. यात
दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या रिदम केडिया आणि मध्य प्रदेशच्या
वेद लाहोटी यांनी सुवर्णपदक पटकावले, तर महाराष्ट्राच्या आकर्ष
राज सहाय,
उत्तर प्रदेशच्या भव्य तिवारी आणि राजस्थानच्या जयवीर सिंग यांना
रौप्यपदक मिळाले. या स्पर्धेत पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे.
****
आमदार पंकजा मुंडे यांनी आज बीड जिल्ह्याला भेट दिली. विधान
परिषदेच्या आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच बीड दौरा आहे. नागरिकांनी
त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. मुंडे यांनी, सावरगाव
घाट तसंच नारायण गड इथं भेट देऊन दर्शन घेतलं. बीड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं.
****
लाडक्या बहिणींसाठी योजनांची घोषणा करणारं सरकार लाडक्या बहिणींना
सुरक्षा पुरवण्यात घोर अपयशी ठरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी केली आहे. नवी मुंबईत उरण इथं नुकत्याच घडलेल्या महिला अत्याचार आणि हत्या
घटनेतल्या पीडित कुटुंबियांची दानवे यांनी आज भेट घेऊन, सात्वंन
केलं,
त्यानंतर ते बोलत होते.
यासंदर्भात दानवे यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे
यांची भेट घेतली, या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर
शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी
मागणी दानवे यांनी केली.
****
लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त
झालेल्या अर्जांच्या छाननीची कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदार, गट
विकास अधिकारी,
बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागांची दूरदृश्य प्रणालीच्या
माध्यमातून त्यांनी आज आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी
सर्वांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना घुगे यांनी दिल्या. जिल्ह्यात या योजनेसाठी
तीन लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. अजित पवार यांनी नितीन पाटील यांचं पक्षात
स्वागत केलं.
****
जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जालना इथं जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे
जनजागृती रॅली काढण्यात आली. रुग्णालयातले डॉक्टर, परिचारिका
तसंच इतर कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते.
****
आयुष्यमान कार्ड योजनेचा अधिकाधिक जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन
आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी केलं आहे. आज
छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment