Saturday, 27 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक 27.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०

****

·      २०४७ पर्यंत भारताला विकसित करणं हे प्रत्येक भारतीयाचं उद्दीष्ट-राज्य सरकारांची भूमिका महत्त्वाची-नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      कोल्हापूर तसंच सांगली जिल्ह्यात पूरस्थिती-मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय यंत्रणेला समन्वयातून नियंत्रणाची सूचना

·      लातूर जिल्ह्यातील आठ आयुष्मान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त

·      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्तविभागाच्या विरोधाचं वृत्त निराधार-अजित पवार यांची स्पष्टोक्ती

आणि

·      भारत आणि श्रीलंका संघादरम्यान टी २० क्रिकेट मालिकेत आज पहिला सामना

****

२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करणं हे प्रत्येक भारतीयाचं उद्दीष्ट असून, नागरिकांशी थेट संपर्क असल्यानं, राज्य सरकारं यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत नीती आयोगाच्या ९ व्या बैठकीत ते आज बोलत होते. या वर्षीच्या बैठकीचं घोषवाक्य ‘विकसित भारत २०४७’ असून त्याच्या ध्येय धोरणांच्या मसुद्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, विशेष निमंत्रित आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष तसेच सदस्य उपस्थित आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पाची रूपरेषा नमो ॲपवर सामायिक केली आहे. या रुपरेषेत रोजगार निर्मिती आणि कौशल्या संबंधित विविध सरकारी घोषणा, योजना आणि नवीन उपक्रमांची सोप्या पद्धतीनं माहिती देण्यात आली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा दुसरा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांरून, न्यूज ऑन एआयआर हे संकेतस्थळ आणि मोबाइल ॲपवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केला जाईल. आकाशवाणी, दूरदर्शन, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनल्सवरूनही कार्यक्रमाचं थेट प्रसारण आपण ऐकू शकाल.

****

कोल्हापूर तसंच सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे. त्यामुळे राजाराम बंधाऱ्याची पंचगंगा नदीची पाणी पातळी ४७ फुटांवर पोहोचली आहे. अतिवृष्टीमुळं जिल्ह्यातील ११ राज्य मार्ग आणि ३७ प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. कोल्हापूर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. नदीकाठच्या अनेक गावातल्या सुमारे सहा हजार नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे.

****

सांगली जिल्ह्यातही चार हजारावर नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली असून ती दुपारी ४० फूट उंचावरून तर मिरज कृष्णा घाट इथं ५२ फूट उंचावरून वाहत आहे. कर्नाळ रस्ता तसंच कृष्णा घाट इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तसंच भारतीय सेनेच्या पथकाकडून पुराची पाहणी करण्यात आली. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचं पालन करावं, तसंच अफवांवर विश्वास न ठेवता, सतर्क राहावं, असं आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केलं आहे.

****

दरम्यान, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील महापूराचा धोका टाळण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा इथं पाणी पातळी नियंत्रित करण्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या निकषांप्रमाणे कार्यवाही करावी असं आवाहन कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेत, आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

****

नवी मुंबईच्या बेलापूरमधल्या सेक्टर १९ मधल्या शाहबाज गावातली एक तीन मजली इमारत आज पहाटे कोसळून तिघांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि दुर्घटनाग्रस्त लोकांना तातडीनं आवश्यक मदत देण्याची सूचना केली. या घटनेतल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

****

पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये मालगाडीचे चार डबे आज रुळावरून खाली घसरले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नसून रल्वेसेवा सुरळीत सुरू आहे.

****

आरक्षणाबाबत सरकारने सर्वांशी सुसंवादाची भूमिका ठेवावी, ही आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. संसदेच्या अधिवेशनानंतर विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या जागावाटपाची चर्चा केली जाईल, असं पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दुर्रानी हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते.

आज सकाळी, ज्येष्ठ विचारवंत लेखक शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ४ पुस्तकांचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

राज्यात प्रथमच लातूर जिल्ह्यातील आठ आयुष्मान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झालं आहे. या आठही आरोग्यवर्धिनी केंद्राना सलग तीन वर्षे बारा सेवांसाठी प्रत्येकी १८ हजार रुपये याप्रमाणे दोन लाख १६ हजार रुपये रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. नवजात आणि अर्भक आरोग्य सेवा, बालपण आणि किशोरवयीन आरोग्य सेवा, कुटूंब कल्याण, संसर्गजन्य रोग व्यवस्थापन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्याच्या आजारांचे व्यवस्थापन आदी सेवांचा यामध्ये समावेश आहे.

****

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या निराधार तसंच राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. वित्त आणि नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्यमंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केल्याचे अजित पवार यांनी ट्वीटरवरच्या संदेशात म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण ३५ हजार कोटी रुपये निधीची संपूर्ण तरतूद या वर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार? हा प्रश्नच उद्भवत नाही, त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणं कृपया थांबवावं, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.

****

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या नेमबाजी १० मिटर मिश्र एअर रायफल प्रकारा साठीच्या पदकांच्या शर्यतीतून भारतीय संघ बाहेर पडला आहे. आज झालेल्या पात्रता फेरीच्या स्पर्धेत भारताचे संदीप सिंग आणि एलविन वलारिवान पात्रता फेरीत १२ व्या स्थानावर तर अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल यांची जोडी ६ व्या क्रमांक पर्यंत पोहोचू शकली.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. संध्याकाळी सात वाजता श्रीलंकेच्या पल्लेकेले इथं सामन्याला सुरूवात होईल. भारतीय संघ सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका खेळणार आहे.

****

महावितरणकडे जमा असलेल्या वीजबिलांच्या सुरक्षा ठेवीवर छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १३ लाख १९ हजार २८२ लघुदाब वीजग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षासाठी तब्बल १५ कोटी सात लाख रुपये व्याज देण्यात आलं आहे. ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे.

****

बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदारसंघनुसार आढावा घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या बैठकीत २०२४-२५ या वर्षासाठी ७४९ कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी शासनाकडून आतापर्यंत २३१ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.

****

जुनी पेन्शन योजना सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना विनाअट लागू करावी यासाठी राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयापुढे भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आलं.

नांदेडमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनुदानाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून सुरु असलेलं धरणे आंदोलन आज भर पावसातही सुरु होतं.

****

छत्रपती संभाजीनगर येथील पाटीदार भवनात ‘तरंग, या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मेळाव्याला आजपासून प्रारंभ झाला. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅक अर्थात नाबार्ड च्या पुण्याच्या प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक प्रदीप पराते यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्‌घाटन झालं. अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय पध्दतीने उत्पादन केलेल्या वस्तुची खरेदी करून त्यांना बळ द्यावे असे आवाहन पराते यांनी केलं.

****

No comments: