Tuesday, 30 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 July 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      दिव्यांगांसाठीची कर्जमर्यादा ५० हजार रुपयांवरुन अडीच लाख रुपये, राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्थापणार कल्याणकारी महामंडळ

·      खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार

·      दिल्ली इथल्या खासगी कोचिंग क्लासमध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाची चौकशी समिती

आणि

·      पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकर-सरबजोत सिंग जोडी आज कांस्यपदकासाठी खेळणार

सविस्तर बातम्या

दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारं पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल मुंबईत दिव्यांग कल्याण महामंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं. दिव्यांग महामंडळाला ५०० कोटी रुपयांचं भागभांडवल असून, दिव्यांग बांधवांसाठी कर्ज देण्याची मर्यादा ५० हजार रुपये आहे, ती वाढवून अडीच लाख रुपये करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दिव्यांगांना रोजगार स्वयंरोजगासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना, कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने राबवण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबत काल झालेल्या अन्य एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

****

सन २०२३ च्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने काल जारी केला. राज्यातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण एक हजार ५४८ कोटी ३४ लाख रुपये इतका, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार ६४६ कोटी ३४ लाख रुपये इतक्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काल अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना नोटीस बजावली आहे. शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही अशाच प्रकारची याचिका सादर केली आहे. दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालय एकाचवेळी निर्णय घेणार आहे. या नोटीशीला उत्तर आल्यानंतर याचिका सुनावणीसाठी घ्यायच्या किंवा नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे.

****

सर्वसामान्य नागरिकांना जलदगतीने न्याय देणं, ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी केलं आहे. काल धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन न्यायमूर्ती उपाध्याय यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

****

दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये पावसाचं पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती स्थापन केली आहे. ३० दिवसांच्या आत समिती याप्रकरणी आपला अहवाल सादर करेल.

दरम्यान, या विषयावर काल संसदेत चर्चा झाली. शाळा महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचं, खासदार फौजिया खान यांनी म्हटलं आहे. कोचिंग क्लासच्या रुपात समांतर शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता नसल्याचं सांगत, फौजिया खान यांनी यासंदर्भात एक नियामक संस्था असण्याची गरजही व्यक्त केली.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या चर्चेत बोलतांना, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं नमूद केलं. कोचिंग क्लाससंदर्भात असलेल्या कायद्याचं राज्य सरकारांनी काटेकोर पालन करण्याची गरज प्रधान यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या घटनेमुळे दिल्लीतल्या १३ प्रशिक्षण केंद्रांना महानगरपालिकेनं टाळं ठोकलं असून, तळघरातले तीन प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यासोबतच चौकशीचे आदेशही देण्यात आले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली असुन. या अल्पकालिक चर्चेनंतर राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला प्रारंभ झाला.

दुपारच्या सत्रानंतर लोकसभेतही अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली, या अर्थसंकल्पात जात आधारित जनगणनेबाबत काहीही घोषणा नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी यावेळी बोलताना, आसाम आणि बिहारमध्ये आलेल्या पुरावर संसदेत चर्चा झाली, मात्र महाराष्ट्रातल्या पुराच्या नुकसानीवर अर्थमंत्री बोलल्या देखील नाही, असं म्हणत अर्थसंकल्पावर टीका केली.

****

राहुल गांधी यांनी संसदेत लोकसभा अध्यक्षांविषयी उपस्थित केलेल्या प्रश्ननावर माहिती आणी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टीका केली आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनीही राहुल गांधी यांनी घटनात्मक पदावर असताना जबाबदारीनं वागली पाहिजे, असं म्हटलं आहे.

****

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकर आणि सरबजोत सिंग ही जोडी दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. आज त्यांचा सामना भारतीय वेळेनूसार दुपारी एक वाजता दक्षिण कोरियाच्या जोडीशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना इंडोनेशियाई जोडीशी होणार आहे. चिराग - सात्विक जोडी ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली जोडी ठरली आहे. भारतीय हॉकी संघानं अर्जेन्टीनासोबतच्या सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. आज भारतीय हॉकी संघाचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे.

****

इराण इथं झालेल्या चोपन्नाव्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतनं पाच पदकांची कमाई केली. यात दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या रिदम केडिया आणि मध्य प्रदेशच्या वेद लाहोटी यांनी सुवर्णपदक पटकावलं, तर महाराष्ट्राच्या आकर्ष राज सहाय, उत्तर प्रदेशच्या भव्य तिवारी आणि राजस्थानच्या जयवीर सिंग यांना रौप्यपदक मिळालं. या स्पर्धेत पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे.

****

आमदार पंकजा मुंडे यांनी काल बीड जिल्ह्याला भेट दिली. विधान परिषदेच्या आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच बीड दौरा आहे. नागरिकांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. मुंडे यांनी, सावरगाव घाट तसंच नारायण गड इथं भेट देऊन दर्शन घेतलं. बीड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं.

****

लाडक्या बहिणींसाठी योजनांची घोषणा करणारं सरकार लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवण्यात घोर अपयशी ठरल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. नवी मुंबईत उरण इथं नुकत्याच घडलेल्या महिला अत्याचार आणि हत्या घटनेतल्या पीडित कुटुंबियांची दानवे यांनी काल भेट घेऊन, सात्वंन केलं, त्यानंतर ते बोलत होते. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. या घटनेतल्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

****

लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या छाननीची कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदार, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी काल आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना घुगे यांनी दिल्या. जिल्ह्यात या योजनेसाठी तीन लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी जालना जिल्ह्यात पोषक वातावरण असून, जिल्हा प्रशासनाचं उद्योजकांना सर्व सहकार्य राहिल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. काल सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग -एमएसएमई संदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणं याबाबत जागरुकता वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योग विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा नव उद्योजकांना प्राधान्याने लाभ दिला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

परभणी इथं स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत २०२२-२३ या वर्षातले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातले जिल्हास्तरीय पुरस्कार काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. मानवत तालुक्यातल्या रामपुरी ग्रामपंचायतीला प्रथम, पालम तालुक्यातल्या तेलजापूर ग्रामपंचायतीला द्वितीय, तर जिंतूर तालुक्यातल्या कुंभारी ग्रामपंचायतीला तृतीत क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. 

****

आयुष्यमान कार्ड योजनेचा अधिकाधिक जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या योजनेविषयी शेटे यांनी दिलेली माहिती उद्या बुधवारी आकाशवाणीवरच्या प्रासंगिक या सदरात ऐकता येईल.

****

No comments: