Sunday, 28 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०

****

·      कोणताही देश आपल्या संस्कृतिचा अभिमान बाळगुनच प्रगती करु शकतो - मन की बात मध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      लातूर इथं आयटीआय परिसरात उभारण्यात आलेल्या महिला वसतीगृहाचं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

·      पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताच्या मनू भाकेरला कांस्य पदक, नेमबाजीतून पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान

आणि

·      नांदेड इथलं विष्णुपुरी धरण ९३ टक्के भरलं, धरणातून १५ हजार २९७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग

****

कोणताही देश आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगुनच प्रगती करु शकतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा आज तिसर्या आवृत्तीचा दुसरा भाग प्रसारित झाला. भारतातही संस्कृतीला अधिक महत्व दिलं असल्याचं सांगून त्यांनी पब्लिक आर्ट ऑफ इंडिया - परि या योजनेचा उल्लेख केला. सार्वजनिक कलेला लोकप्रिय करण्यासाठी कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना असल्याचं त्यांनी सांगितलं.

  

येत्या १५ ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत संकेतस्थळावर तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. हर घर तिरंगा हे अभियान तिरंग्याचा गौरव करणारा उत्सवच झाला असल्याचं ते म्हणाले.

जब कॉलोनी या सोसायटी के एक एक घर पे तिरंगा लहराता है, तो देखते ही देखते दुसरे घरों पर भी तिरंगा दिखने लगता है। यानी हर घर तिरंगा अभियान तिरंगे की शान में एक युनिक फेस्टीवल बन चुका है।

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या भाषणासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही नागरिकांनी माय जी ओ व्ही किंवा नमो ॲप वर सूचना पाठवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.

जगभरात सध्या पॅरीस ऑलिम्पिकचा गाजावाजा आहे. ऑलिम्पिकमुळे आपल्या खेळाडुंना जागतिक व्यासपीठावर तिरंगा फडकवण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते, त्यामुळे प्रत्येक देशवासियानं आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. तसंच नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेतल्या पदक विजेत्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी हातमाग आणि इतर स्थानिक उत्पादनं लोकप्रिय करण्यासाठी देशभरातल्या महिलांच्या प्रयत्नांची माहिती दिली. यात त्यांनी महाराष्ट्राची पैठणी तसंच विदर्भातली हँड ब्लॉक प्रिंट या हातमाग उत्पादनांचाही उल्लेख केला. वाघ आणि मानवी संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी, तसंच वाघांच्या संरक्षणासाठी देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांची देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. याचं उदाहरण म्हणून त्यांनी राज्यातल्या ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाचाही उल्लेख केला.

आसाम राज्यातल्या चराई देव मोईदाम्स चा आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला असून, अहोम साम्राज्याची विशेष अध्यात्मिक परंपरा आणि या ठिकाणाबद्दलची वैशिष्ट्य पंतप्रधानांनी या कार्यक्रमात अधोरेखित केली. भविष्यातल्या पर्यटन योजनांमध्ये नागरिकांनी या स्थळाला भेट द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

****

 विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे आणि मिलिंद नार्वेकर या सदस्यांनी शपथ घेतली.

****

लातूर इथं उच्चस्तर आयटीआय- औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारत परिसरात सुरु होत असलेल्या महिलांसाठीच्या वसतीगृहाचं ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातून लातूर इथं आलेल्या शासकीय, निमशासकीय, सेवा क्षेत्रा कार्यरत असलेल्या महिलांना सुरक्षित निवासस्थान मिळावं, त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी लातूर जिल्हा नियोजन समितीच्या वतीने हे वसतीगृह उभारण्यात आलं आहे.

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून लातूर जिल्ह्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी सुसज्ज अग्निशमन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या दुचाकींचं लोकार्पण गिरीश महाजन आणि मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं.

****

लातूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी, माजी मंत्री अमित देशमुख यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाजन यांना निवेदन दिलं. लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन द्यावा, शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा पीकविमा उपलब्ध करुन द्यावा, यासह अन्य मागण्या देशमुख यांनी या निवेदनात केल्या आहेत.

****

 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या मनू भाकेरनं कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. नेमबाजीतून पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारतासाठी पहिलं पदक मिळवण्याचा मानही तिने मिळवला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनु भाकेर हिचं अभिनंदन केलं आहे. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या वैयक्तित स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरल्यामुळे हे यश विशेष असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. क्रीडामंत्री मनसुख मांडविय, गृहमंत्री अमित शहा यांनीही मनु भाकेरचं अभिनंदन केलं आहे.

मनू भाकेर हिने जिंकलेलं कांस्य पदक ही देशासाठी चांगली सुरुवात असून, या यशाने देशवासीयांच्या आशा अधिक उंचावल्या आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं त्यांनी मनू भाकेर हीचं अभिनंदन केलं.

दरम्यान, या स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये भारताच्या रमिता जिंदालनं आज अंतिम फेरी गाठली. तिनं ६३१ पूर्णांक ५ दशांश गुणांची कमाई करून पाचवं स्थान मिळवलं. नौकानयनपटू बलराज पन्वर यानं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान नक्की केलं.

बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू हिनं सलामीच्या लढतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर २१-९, २१-६ अशी सहज मात केली.

टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीच्या सामन्यात श्रीजा अकुला हिनं स्विडनच्या क्रिस्टीना कालबर्ग हीचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तर पुरुष एकेरीत भारताच्या शरथ कमलचा स्लोवानियाच्या खेळाडुकडून पराभव झाला.

मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात भारताच्या निखत झरीननं उप -उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. येत्या एक ऑगस्ट रोजी तिची आता चीनच्या वू यू हिच्याशी लढत होणार आहे.

****

महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या संघानं विजेतेपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं भारताचा पराभव केला. 

दरम्यान, पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा सामना आज संध्याकाळी सात वाजता पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.

****

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून होतकरु तरुणांना अर्थसहाय्य देऊन त्यांना उद्योजक घडवत असतांना, मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी महामंडळ आणि शासन कटीबद्ध असल्याचं, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड इथं आज लाभार्थ्यांच्या मेळाव्यातत बोलत होते. महामंडळाच्या अर्थसहाय्यातून एक लाख मराठा उद्योजक घडवल्याच्या संकल्पपूर्तीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

****

आषाढी वारी सोहळा आटोपल्यानंतर पंढरपूरहून शेगावकडे निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी आज बीड शहरात दाखल झाली. रिमझिम पावसात नागरिकांनी पालखीचं ज्ञानोबा - तुकारामच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाचा गजरात स्वागत केलं. शेकडो भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आज पालखीचा मुक्काम शहरातल्या कनकालेश्वर मंदिरात असून, उद्या पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.

****

नांदेड इथलं विष्णुपुरी धरण ९३ टक्के भरलं आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एक दरवाजा आज उघडण्यात आला असून, १५ हजार २९७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांना अलेल्या पुरामुळे गडचिरोली-चामोर्शी आणि आलापल्ली-भामरागड या मार्गांसह जिल्ह्यातल्या ४० मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

****

यवतमाळसह अनेक जिल्ह्यात एका नामांकित कंपनीच्या खाद्यतेलाचा होलोग्राम आणि लेबल वापरून बनावट तेलाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

****

No comments: