Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date: 27 July 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची
नववी बैठक नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात सुरू आहे. या बैठकीत
आठ विषयांवर चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये पिण्याचं पाणी, आरोग्य, शिक्षणातील गुणवत्ता, जमीन आणि संपत्तीची डिजीटल नोंदणी, सायबर सुरक्षा, सरकारी कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात एआयचं आव्हान, केंद्रीय योजना आणि राज्य शासनांची भूमिका आदी विषयांचा
समावेश आहे. या बैठकीला राज्य तसंच केंद्र
शासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपराज्यपाल, विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून केंद्रीय मंत्री आणि निती आयोगाचे
उपाध्यक्ष उपस्थतीत आहेत. दरम्यान, काँग्रेससह इंडिया आघाडीच्या काही मुख्यमंत्र्यांनी बैठकीवर
बहिष्कार टाकला आहे.
****
माजी राष्ट्रपती तथा प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए. पी.
जे. अब्दुल कलाम यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त आज देशभश्रातून त्यांना श्रद्धांजली
वाहण्यात येत आहे. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी
त्यांच्या जीवनात कठिण परिश्रमाला महत्व दिलं. त्यांचं जीवन हे आजच्या युवापिढीसाठी
प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार युवा पिढीला कायम मार्गदर्शन करत राहतील अशा शब्दांत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आकाशवाणी वरच्या ‘मन की
बात’ या कार्यक्रमातून उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून
देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या सरकारच्या कार्यकाळातला ‘मन की बात’चा
हा दुसरा आणि एकूण एकशे बारावा भाग आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली आणि
आपत्तीग्रस्त लोकांना तातडीनं मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याची
आवश्यकता असणाऱ्या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठवण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास
सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक
प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावं, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे
खुले झाल्यानं पंचगंगा नदी ४६ पूर्णांक ११ फुटांवरून वाहत आहे. जिल्ह्यातले एकूण ८४
मार्ग बंद आहेत, ९४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत
तर तब्बल १४ राज्य मार्गांवर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी संथ गतीनं वाढत आहे. कोल्हापूर
शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरण्याला सुरुवात झाली असून शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभार गल्ली, जयंती नाला परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या भागात पाणी गुडघ्यापर्यंत पोहोचलं
आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, भोगावती नदीकाठच्या पूरग्रस्तांसह प्रयाग चिखली आणि आंबेवाडी
गावातील ५ हजार ८०० नागरिकांना एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरक्षित ठिकाणी
स्थलांतरित करण्यात आलं असून नागरिकांनी सतर्क रहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे.
****
बनावट पद्धतीनं दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे आणि देणारे
अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी
कार्य करणाऱ्या 'सार्थक एजुकेशन ट्रस्ट' या संस्थेचा १६ वा स्थापना दिवस राज्यपाल बैस यांच्या
प्रमुख उपस्थितीत जागतिक व्यापार केंद्र, मुंबई इंथ झाला, त्यावेळी काल ते बोलत होते. सामान्य तसंच सक्षम व्यक्ती चुकीच्या
पद्धतीनं दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सेवेत प्रवेश करणार नाही याबद्दल दिव्यांग व्यक्तींसाठी
कार्य करणाऱ्या संस्थांनी जागरूक रहावं असं आवाहनही त्यांनी केलं.
****
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार हे सध्या छत्रपती
संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज दुपारी दोन वाजता पक्षाच्या कार्यालयात
मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. ही घोषणा
दुर्राणी यांनी समाजमाध्यमावर दिली आहे.
****
नवी मुंबई भागात शहाबाजगाव इथे आज पहाटे एक बहुमजली इमारत कोसळली. या इमारतीत राहणाऱ्या सुमारे ५०
जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत एका व्यकतीचा मृत्यु झालं तर २ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं
असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
****
No comments:
Post a Comment