Friday, 26 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.07.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 July 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

२५ वा कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. या निमित्त राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्यदलाचे आभार व्यक्त करत हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात त्यांनी, कारगील युध्दात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं बलिदान देशाच्या प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल असं म्हटलं आहे.

****

कारगिलमध्ये २५ वर्षांपूर्वी आपण केवळ युद्धच जिंकलं नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अद्भुत दर्शन घडवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज कारगिल मधल्या द्रास इथं युद्ध स्मारकाला भेट देऊन, हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली, त्यानंतर ते बोलत होते. भारत शांततेसाठी प्रयत्न करत होता, मात्र पाकिस्ताननं आपला अविश्वासी चेहरा समोर आणला, असं ते म्हणाले. विकासापुढे येणारी आव्हानं मोडून काढली जातील, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत आपण त्यांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असं म्हटलं आहे. २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आज त्यांनी या युद्धात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा जवानांचं स्मरण केलं. त्यावेळी ते मुंबईत बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं.

****


केंद्र सरकारने अनेक पिकांच्या किमान हमीभावात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं आहे. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या लाभासाठी निर्णय घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या अनेक वर्षात गव्हासह इतर पिकांचं सरकारकडून खरेदीचं प्रमाण वाढलं असून, खतांवरच्या अनुदानातही भरघोस वाढ केल्याचं चौहान यांनी नमूद केलं.

****

राज्यसभेत शून्य काळात खासदार सुधा मूर्ती यांनी, हॉटेल व्यावसायिकांकडून अन्नपदार्थात वापरल्या जाणाऱ्या सिन्थेटिक रंग, सिन्थेटिक व्हिनेगर तसंच टेस्टिंग पावडरच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं.

यासंदर्भात नियंत्रणासाठी देशभरात शंभरावर अन्न परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं, अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांनी सांगितलं.

खासदार रजनी पाटील यांनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत होणाऱ्या विलंबाकडे सदनाचं लक्ष वेधलं. पासवान यांनी यावर उत्तर देतांना, तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया लांबत असल्याचं सांगत, सरकार या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करून सदर प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं.

****

सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर सहज सुलभरित्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सुविधांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात ६३ प्रकारच्या तर जिल्हा रुग्णालयात १३४ प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जात असून, विविध आजारांसाठीच्या औषधांचं मोफत वितरण केलं जात असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. जिल्हा रुग्णालयात डायलिसीसची सुविधा दिली जात असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं.

दरम्यान, शून्य प्रहराच्या प्रारंभी, कर्नाटकच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होऊन, गदारोळ सुरू झाल्यानं, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नांदेड शहर आणि ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत तीन लाख ७० हजार अर्ज दाखल झाले आहे. जिल्हा यंत्रणेने पात्र उमेदवारांची निवड पुढील काही दिवसात पूर्ण करावी, आणि चावडी वाचनाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

****

पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री ११ वाजता हा सोहळा सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ मैदानाच्या बाहेर होत असून, अंदाजे दहा हजारावर खेळाडू संचलनात सहभागी होणार आहेत. आयफेल टॉवर परिसरात संचलनाची सांगता होऊन ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली जाईल. या संचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमल आणि पी. व्ही. सिंधू करणार आहेत.

****

महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात उपांत्य सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतले आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे.

****

सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून होणारा विसर्ग १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं वाढवून ४० हजार घनफूट प्रतिसेकंद करण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठी असणारी मंदिर पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: