Saturday, 27 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 27 July 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      गौरी गणपतीनिमित्त राज्यसरकारकडून १ कोटी ७० लाखावर पात्र नागरिकांना आनंदाचा शिधा

·      मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला येत्या दोन ऑगस्ट रोजी सिल्लोड इथून प्रारंभ

·      पंचवीसावा कारगील विजय दिवस काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा

·      छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून तीन दिवसीय तरंग शेतकरी मेळाव्याचं आयोजन

·      महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारत श्रीलंका संघात उद्या अंतिम सामना

आणि

·      पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धांना दिमाखदार उद्‌घाटन सोहळ्यानं प्रारंभ

 

सविस्तर बातम्या

यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातल्या १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना "आनंदाचा शिधा" वितरीत करण्यात येणार आहे. प्रतिसंच १०० रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या  या "आनंदाचा शिधा" संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असणार आहे. या शिध्याचं वाटप १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत ई-पॉस प्रणालीद्वारे होणार आहे.

****

राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडं तसंच भाजीपाला लागवडीची योजना राबवण्यासाठी ४० लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील नांदेडसह १४ जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाना या योजनेचा लाभ होणार आहे.

****

विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी विनंती याचिका शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. व्हिप न पाळणाऱ्या या आमदारांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती न्यायालयात केली असल्याचं, पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

****

काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीसोबत वाटाघाटींसाठी राज्य तसंच मुंबई स्तरावर दोन विशेष समित्यांचं गठन केलं आहे. पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.

****

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला येत्या दोन ऑगस्ट रोजी सिल्लोड इथून प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सिल्लोड इथं यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत, जिल्ह्यात पात्र महिलांपर्यंत शासकीय यंत्रणेने योजनांचा लाभ पोहोचवून महिला सशक्तीकरणाचे ध्येय्य पूर्ण करावं, असे निर्देश दिले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीचं काम जिल्ह्यात उत्तमरित्या होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा येत्या मंगळवारचा उदगीर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनातून ही माहिती कळवण्यात आल्याचं, क्रीडा मंत्री संजय बनसोडे तथा लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितलं आहे.

****

कारगील विजय दिवस काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत कुलाबा इथल्या हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवदन केलं. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबातल्या ११ वीर नारींना यावेळी सन्मानित करण्यात आलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत, या युद्धात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा सैनिकांचं स्मरण केलं. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीयांप्रती राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथंही हुतात्मा सैनिकांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कारगील युद्धात सक्रिय असलेले सैनिक प्रल्हाद गोपीनाथ पठारे यांच्यासह तीन वीर मातांचा तसंच सहा वीर पत्नींचा, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रमुख मेजर एस फिरासत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पठारे यांनी युद्धातील आठवणीला उजाळा दिला.

****

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं. माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

लातूरचे काँग्रेस खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी काल दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रमुख महामार्ग आणि रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. प्रामुख्यानं लातूर - कुर्डूवाडी- टेंभुर्णी या महामार्गाचं चौपदरीकरण तत्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी काळगे यांनी केली. हे सर्व विषय प्राधान्यक्रम लावून सोडवले जातील, असं आश्वासन गडकरी यांनी दिल्याचं खासदार काळगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून ‘तरंग, हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तीन दिवसीय मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. जालना रस्त्यावर पाटीदार भवन इथं २९ जुलैपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांच्या उत्तम प्रतीच्या उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री करतील. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विविध उत्पादनांची खरेदी करावी असं, आवाहन नाबार्ड मार्फत जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर यांनी केलं आहे. नाबार्ड मार्फत देशातील ५० शहरांत हा मेळावा होणार आहे.

****

आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि श्रीलंका संघात होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघानं बांग्लादेशचा तर श्रीलंकेनं पाकिस्तानचा पराभव केला. बांग्लादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, भारताला दिलेलं ८१ धावांचं आव्हान, भारताच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीनं अवघ्या ११ षटकांत साध्य केलं. दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं दिलेलं १४० धावांचं लक्ष्य श्रीलंकेच्या संघानं एक चेंडू आणि तीन बळी राखून पार करत, अंतिम फेरीत धडक मारली.

****

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं काल रात्री दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झालं. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्युअल मॅक्रां यांनी या स्पर्धेच्या प्रारंभाची घोषणा केली. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच मैदानाच्या बाहेर सीन नदीच्या किनारी भर पावसात पार पडलेल्या संचलन सोहळ्यात सात हजारावर खेळाडू सहभागी झाले. भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमल आणि पी. व्ही. सिंधू यांनी केलं.

दरम्यान या स्पर्धेत आज हॉकी, बॅडमिंटन, टेनीस, टेबल टेनीस, नेमबाजी, मुष्टियुद्ध आणि नौकानयन आदी स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत

****

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. प्राचार्य मगदूम फारुकी यांनी उर्दुत अनुवादित केलेल्या पद्मविभूषण शरद पवार - दि ग्रेट निग्मा या पुस्तकाचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं.

दरम्यान ज्येष्ठ विचारवंत लेखक शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ४ पुस्तकांचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते आज होणार आहे.

****


ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

दरम्यान, ज्ञानराधा पतसंस्थेचा अध्यक्ष सुरेश कुटे याला बीड कारागृहातून जालना इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्याला ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान हिंगोली इथल्या अनुराधा पतसंस्थेत ६ कोटी २७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पतसंस्थेचा अध्यक्ष अशोक कांबळे याला आर्थिक गुन्हे शाखेनं काल अटक केली. कांबळे हा गेल्या ५ महिन्यांपासून फरार होता.

****

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ४ लाख ५९ हजार ४५ ग्राहकांकडे सुमारे २३३ कोटी ३० लाखांचं वीजबिल थकित आहे

****

आमदार अमित विलासराव देशमुख यांनी काल लातूर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेतला. पावसाच्या पार्श्वभूमीवर नाले साफसफाईतील हलगर्जीपणा टाळावा, रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी, आदी सूचना, देशमुख यांनी मनपा अधिकाऱ्यांना केल्या.

****

हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर काल जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.

****

नांदेड महापालिकेनं पर्यावरण दिनापासून सुरू केलेल्या हरित नांदेड अभियानांतर्गत आतापर्यंत दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी ही माहिती दिली. पुढच्या दोन महिन्यात शहरांमध्ये २५ हजार झाडं लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यात २२ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत हिपॅटायटिस पंधरवाडा पाळण्यात येत आहे. या निमित्त काल जिल्हा रुग्णालयात हिपॅटायटिस बी आणि सी ची तपासणी करण्यात आली.

****

 

No comments: