Wednesday, 31 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०

****

·      टोयोटा किर्लोस्करच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रकल्पामुळे वाहन निर्मिती उद्योगात क्रांती-सामंजस्य करारावर स्वाक्षरीवेळी मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

·      लोकसेवा आयोगाकडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द-यापुढे परीक्षा देण्यास अपात्र घोषीत

·      कामिका एकादशीनिमित्त विठुनामाच्या गजराने नरसी नगरी दुमदुमली

आणि

·      पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत मुष्टीयुद्ध, बॅडमिंटन तसंच नेमबाजीत भारतीय खेळाडूंची आगेकूच

****

टोयोटा किर्लोस्करच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा होण्यासह एकूणच राज्य आणि देशातल्या मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवला आहे. आज मुंबईत राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सची निर्मिती करण्याबाबतच्या या नियोजित प्रकल्पासाठी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून ८ हजार थेट आणि ८ हजार अप्रत्यक्ष, असे सुमारे १६ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

****

जपाननं महाराष्ट्राच्या उद्योग तसंच पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी, असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जपानी कंपन्यांसाठी पुणे जिल्ह्यातल्या सुपे इथे विशेष इंडस्ट्रीयल पार्क विकसित करण्यात येणार असून भविष्यात देखील राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं उभारल्या जाणार असलेल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून यासाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज जाहीर केला. या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता देण्यात आली. या निर्णयांमुळे शिर्डीची आता औद्योगिक नगरी म्हणूनही नवी ओळख होईल, असा विश्वास अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

****

राज्यात गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, अहमदनगर जिल्ह्यात लिंगदेव-अकोले, नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा आणि जांबुटके तसंच अमरावती जिल्ह्यातील वरुड इथं‘एमआयडीसी’ उभारण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात डुंबरवाडी इथं अन्न प्रक्रिया उद्योगक्षेत्र उभारण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

****

केंद्रीय लोकसेवा आयोग- यूपीएससी-नं पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली असून आता पूजा खेडकर प्रशिक्षणार्थी अधिकारी राहणार नाही. याशिवाय ती भविष्यातही यूपीएससीची कोणतीही परीक्षा देऊ शकणार नाही. दरम्यान, पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्लीच्या एका न्यायालयात सुनावणी झाली. आपली दिव्यांग प्रमाणपत्रं खरी असून आपल्याला सत्तेचाळीस टक्के दिव्यांगत्व असल्याचा दावा खेडकरनं आपल्या या याचिकेत केला आहे. न्यायालय याबाबतचा आपला निर्णय उद्या दुपारी देणार आहे.

****

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के.आर. नायडू यांनी आज लोकसभेत, भारतीय वायुयान विधेयक २०२४, सादर केलं. या विधेयकामुळे केंद्र सरकारला, कोणतंही विमान किंवा विमान प्रकाराची रचना, निर्मिती, देखभाल, ताबा, उपयोग, संचालन, विक्री, आयात किंवा निर्यात, यांचं नियमन करण्याचा अधिकार मिळेल. विमान संचालनाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नियम बनवण्याचे अधिकारही सरकारला या विधेयकामुळे प्राप्त होतील. कोणत्याही हवाई घटनेच्या किंवा दुर्घटनेच्या चौकशीसाठीचे नियम बनवण्याचे अधिकार केंद्र सरकारला देणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे.

****

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी रद्द करण्याचा विनंती केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे. नागपूरच्या आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेकडून मिळालेल्या निवेदनानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे.

****

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज संध्याकाळी साडेसहा वाजता राजभवनात होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज राजस्थानचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. जयपूर इथं राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.

****

खरीप २०२४ हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचा आज अखेरचा दिवस आहे.

आज सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात एक कोटी त्रेसष्ट लाख साठ हजार पेक्षा अधिक पीकविमा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आपला विमा तात्काळ भरून घ्यावा असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यातील सुमारे त्रेपन्न लाख त्र्याऐंशी हजार सोयाबीन उत्पादकांना दोन हजार सहाशे बारा कोटी तर सुमारे तीस लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपये लाभाचे वितरण थेट त्यांच्या संलग्न बँक खात्यांमध्ये करण्यात येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या नर्सी नामदेव इथे आज कामिका एकादशीनिमित्त परतवारीच्या वारकऱ्यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. नामदेव महाराजांच्या वस्त्र समाधीला आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते मानाचा आहेर अर्पण करण्यात आलं. विठुनामाचा गजर करत शेकडो पायी दिंड्यांमधून आलेल्या भाविकांमुळे नर्सी नामदेव नगरी प्रति पंढरपूर भासत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नवी मुंबईत उरण इथल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेख याला पनवेलच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

****

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपापल्या खेळात आगेकूच करत पुढच्या फेऱ्या गाठल्या आहेत. मुष्टीयोद्धा लव्हलीना बोर्गोहेन उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचली. तिनं आज नॉर्वेच्या सुन्नीवा हॉफ्स्टेडचा पराभव केला.

भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू हिनं एस्टोनियाच्या क्रिस्टीन कूबा हिच्यावर २१-५, २१-१० अशी सहज मात करत, पुढच्या फेरीत प्रवेश केला.

पुरुष एकेरीत लक्ष्य सेननंही इंडोनेशियाचा जोनातन क्रिस्टी याचा २१-१८, २१-१२ असा पराभव करत पुढची फेरी गाठली.

पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसळे यानंही पात्रता फेरीत सातवं स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर अकराव्या स्थानावर राहिल्याने स्पर्धेतलं त्याचं आव्हान संपुष्टात आलं.

****

५६ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदकं जिंकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा आज मुंबईत होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये जळगावच्या देवेश पंकज भैया आणि मुंबईच्या अविनाश बन्सल आणि कश्यप खंडेलवाल या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

****

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण तसंच शहरी भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख अडुसष्ट हजार चारशे त्रेचाळीस अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आल्याने महिलांना या योजनेसाठी अर्ज करणं सुलभ झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीतल्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी आयटक संलंग्नित महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे सचिव विधीज्ञ अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून १५ ऑगस्टपर्यंत शहरव्यापी महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात समाजातील विविध घटकांचाही सहभाग असणार आहे.

****

No comments: