Friday, 26 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.07.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२६ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

२५ वा कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन, कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना आदरांजली अर्पण केली. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस खूप विशेष असून, देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस असल्याचं पंतप्रधानांनी, समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. यावेळी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिन्कून ला या बोगदा प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा चार किलोमीटर लांबीचा ट्विन ट्यूब बोगदा निमू-पदुम-दारचा रस्त्यावर सुमारे पंधरा हजार ८०० फूट उंचीवर बांधण्यात येत आहे. हा जगातला सर्वात उंच बोगदा असेल. या बोगद्यामुळे सशस्त्र दलांना जलद हालचाल करणं शक्य होणार असून, लडाखमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासही मदत होणार आहे.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कारगील विजय दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. हा दिवस शौर्यानं लढलेल्या शूर सैनिकांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धैर्याचं स्मरण करून देतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

भारतीय जनता पक्षानं बिहार आणि राजस्थानसाठी नवीन पक्षप्रमुखांची नियुक्ती केली आहे. दिलीप जयस्वाल हे बिहार भाजपचे, तर राजस्थानमध्ये राज्यसभा सदस्य मदन राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षानं सहा राज्यांसाठी प्रभारीही नियुक्त केले आहेत. त्यात आसामसाठी हरीश द्विवेदी, चंदिगडसाठी खासदार अतुल गर्ग, लक्षद्वीप आणि तामिळनाडूसाठी अरविंद मेनन, राजस्थानसाठी राधामोहन दास अग्रवाल आणि त्रिपुरासाठी डॉ. राजदीप रॉय यांचा समावेश आहे.

****

राष्ट्रीय चाचणी संस्थेनं नीट युजी- २०२४ परीक्षेचा सुधारित निकाल काल जाहीर केला. भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतल्या वादग्रस्त ठरलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय विचारात घेऊन हा सुधारित निकाल देण्यात आला आहे.

****

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २२५ ते २५० जागा लढवणार असल्याचं, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहिर केलं. त्यादृष्टीनं येत्या एक ऑगस्ट पासून राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी काल मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात दिली.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...