Wednesday, 31 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 31.07.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

३१ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात काल झालेल्या भूस्खलनातल्या मृतांची संख्या १४८ वर पोचली असून, केरळमध्ये आजपर्यंत राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. लष्कर, नौदल, हवाईदल यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तसंच इतर मदत संस्थांसह बाधित लोकांचे प्राण वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जात आहेत.

****

मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गंभीर असून, विरोधक याप्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमच्या सरकारनं न्यायालयात टिकेल असं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं असून, आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि यापुढेही ती तशीच राहील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी इथल्या शंकरराव चव्हाण सिंचन प्रकल्पातले १२ विद्युत पंप आणि उद्धरण नलिकेसाठी राज्य शासनाने १६० कोटी ६४ लाखांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सिंचनाच्या समस्येमुळे लोहा तालुक्यातली १५ हजार ९२७ हेक्टर आणि कंधार तालुक्यातली दोन हजार १०० हेक्‍टर जमीन सिंचनापासून वंचित राहत होती. याबाबत लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती.

****

लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली; राज्यातही परिवर्तन व्हावं ही जनतेची भावना आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोमानं मेहनत करा, असं आवाहन त्यांनी काल मुंबईत झालेल्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत केलं.

****

राज्यात महसूल दिनानिमित्त एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात या सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर केलं आहे.

****

कोल्हापुरात काल रात्रीपासून पाऊस पुन्हा सुरू झाल्यामुळे राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. धरणातून सध्या दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

No comments: