Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०
****
· २५ वा कारगिल विजय दिवस देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा
· गौरी गणपतीनिमित्त राज्यात १ कोटी ७० लाखावर नागरिकांना आनंदाचा शिधा
· छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून तीन दिवसीय तरंग शेतकरी मेळाव्याचं आयोजन
आणि
· बांग्लादेशचा दारूण पराभव करत भारतीय महिला संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दाखल
****
२५ वा कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्यदलाचे आभार व्यक्त करत हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात त्यांनी, कारगील युध्दात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं बलिदान देशाच्या प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल असं म्हटलं आहे.
****
कारगिलमध्ये २५ वर्षांपूर्वी आपण केवळ युद्धच जिंकलं नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अद्भुत दर्शन घडवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज कारगिल मधल्या द्रास इथं युद्ध स्मारकाला भेट देऊन, हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली, त्यानंतर ते बोलत होते. विकासापुढे येणारी आव्हानं मोडून काढली जातील, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत, त्यांचे शौर्य कायम स्मरणात ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असं म्हटलं आहे. या युद्धात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा सैनिकांचं त्यांनी स्मरण केलं. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीयांप्रती राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथंही या युध्दातल्या हुतात्मा सैनिकांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कारगील युद्धात सक्रिय असलेले सैनिक प्रल्हाद गोपीनाथ पठारे यांच्यासह तीन वीर मातांचा तसंच सहा वीर पत्नींचा, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रमुख मेजर एस फिरासत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पठारे यांनी युद्धातील आठवणीला उजाळा दिला.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचं सांगितलं.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून झाली.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलतांना, केंद्र सरकारने अनेक पिकांच्या किमान हमीभावात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं सांगितलं. त्यापूर्वी राज्यसभेत शून्य काळात खासदार सुधा मूर्ती यांनी, हॉटेल व्यावसायिकांकडून अन्नपदार्थात वापरल्या जाणाऱ्या सिन्थेटिक रंग, सिन्थेटिक व्हिनेगर तसंच टेस्टिंग पावडरच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं. तर खासदार रजनी पाटील यांनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधलं.
****
सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर सहज सुलभरित्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सुविधांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्न विचारला होता.
लोकसभेत त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा झाली, काही सदस्यांनी अशासकीय विधेयकं सादर केली, डॉ श्रीकांत शिंदे यांच्या, बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क कायद्यात सुधारणा सुचवणाऱ्या गैरसरकारी विधेयकाचा समावेश आहे. राज्यसभेत सध्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.
****
यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना "आनंदाचा शिधा" वितरीत करण्यात येणार आहे. प्रतिसंच १०० रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या या "आनंदाचा शिधा" संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असणार आहे. या शिध्याचं वाटप १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ई-पॉस प्रणालीद्वारे होणार आहे.
****
विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी विनंती याचिका शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. व्हिप न पाळणाऱ्या या आमदारांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती न्यायालयात केली असल्याचं, पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीसोबत वाटाघाटींसाठी राज्य तसंच मुंबई स्तरावर दोन विशेष समित्यांचं गठन केलं आहे. पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या खडकवासला धरणातून विसर्गासंदर्भात पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी समन्वय साधावा आणि यापुढे अशी दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, पुण्यातल्या पूरग्रस्त भागातील घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची, महापालिका तसंच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीनं युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचं तसंच शेतीच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखं चित्र आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. चित्रकार शैलेश आचरेकर यांनी सहा महिन्यांच्या प्रयत्नातून हे चित्र साकारलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांना ते भेट देण्यात आलं.
****
लातूरचे काँग्रेस खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी आज दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रमुख महामार्ग आणि रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. प्रामुख्यानं लातूर - कुर्डूवाडी- टेंभुर्णी या महामार्गाचं चौपदरीकरण तत्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी काळगे यांनी केली. हे सर्व विषय प्राधान्यक्रम लावून सोडवले जातील, असं आश्वासन गडकरी यांनी दिल्याचं खासदार काळगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून ‘तरंग, हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तीन दिवसीय मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. जालना रस्त्यावर पाटीदार भवन इथं २९ जुलैपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांच्या उत्तम प्रतीच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करतील. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विविध उत्पादनांची खरेदी करावी असं, आवाहन नाबार्ड मार्फत जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर यांनी केलं आहे. नाबार्ड मार्फत देशातील ५० शहरांत हा मेळावा होणार आहे.
****
भारतीय महिला संघाने आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेश संघाचा दणदणीत पराभव केला. बांग्लादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, निर्धारित २० षटकांत आठ बाद ८० धावा केल्या. भारतीय संघाच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीनं हे लक्ष्य अवघ्या ११ षटकांत साध्य केलं. चार षटकांपैकी एक षटक निर्धाव देत १० धावांच्या बदल्यात तीन बळी घेणारी रेणुका सिंग प्लेअर ऑफ द मॅच ठरली.
या स्पर्धेचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना सध्या श्रीलंका आणि पाकिस्तानच्या संघात सुरू आहे. यामध्ये जिंकणाऱ्या संघासोबत भारतीय संघाचा परवा रविवारी अंतिम सामना होणार आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री ११ वाजता हा सोहळा सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ मैदानाच्या बाहेर होत असून, अंदाजे दहा हजारावर खेळाडू संचलनात सहभागी होणार आहेत. आयफेल टॉवर परिसरात संचलनाची सांगता होऊन ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली जाईल. या संचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमल आणि पी. व्ही. सिंधू करणार आहेत.
****
नांदेड महापालिकेने पर्यावरण दिनापासून सुरू केलेल्या हरित नांदेड अभियानांतर्गत आतापर्यंत दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. महेशकमार डोईफोडे यांनी ही माहिती दिली. पुढच्या दोन महिन्यात शहरांमध्ये २५ हजार झाडं लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं
****
जालना शहरात दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment