Monday, 29 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 July 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      प्रत्येक देश आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूनच पुढे जाऊ शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन

·      स्वात्र्यंदिनी घरोघरी तिरंगा फडकावण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

·      पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला कांस्य पदक, पदकविजेती मनु भाकर ठरली पहिली महिला नेमबाज

आणि

·      भारताची श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी, आशियाई कप स्पर्धेत महिला संघ उपविजेता  

 

सविस्तर बातम्या

प्रत्येक देश आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूनच प्रगती करु शकतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. भारतातही संस्कृतीला अधिक महत्व दिलं असल्याचं सांगून त्यांनी पब्लिक आर्ट ऑफ इंडिया - परि या योजनेचा उल्लेख केला. सार्वजनिक कलेला लोकप्रिय करण्यासाठी कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना असल्याचं त्यांनी सांगितलं.

येत्या १५ ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत संकेतस्थळावर तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. हर घर तिरंगा हे अभियान तिरंग्याचा गौरव करणारा उत्सवच झाला असल्याचं ते म्हणाले.

जब कॉलोनी या सोसायटी के एक एक घर पे तिरंगा लहराता है, तो देखते ही देखते दुसरे घरों पर भी तिरंगा दिखने लगता है। यानी हर घर तिरंगा अभियान तिरंगे की शान में एक युनिक फेस्टीवल बन चुका है।

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या भाषणासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही नागरिकांनी माय जी ओ व्ही किंवा नमो ॲप वर सूचना पाठवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.

जगभरात सध्या पॅरीस ऑलिम्पिकचा गाजावाजा आहे. ऑलिम्पिकमुळे आपल्या खेळाडूंना जागतिक व्यासपीठावर तिरंगा फडकवण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते, त्यामुळे प्रत्येक देशवासियानं आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

पंतप्रधानांनी खादी आणि हातमाग उत्पादनाला चालना देण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची पैठणी तसंच विदर्भातली हँड ब्लॉक प्रिंट या हातमाग उत्पादनांचा उल्लेख केला.

****

भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत झालेल्या दोन दिवसीय परिषदेचा काल समारोप झाला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे लोक कल्याणासाठी जोमानं प्रयत्न करतील तेव्हा विकसित राष्ट्राचं ध्येय आपण निश्चितपणे गाठू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. विकसित भारताच्या संकल्पनेत वारशाच्या विकासासोबतच वारशाच्या निर्मितीला महत्व असल्याचं त्यांनी नमूद केलं. या परिषदेला १३ मुख्यमंत्री आणि १५ उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

****

विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी काल विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, आणि मिलिंद नार्वेकर या सदस्यांनी शपथ घेतली.

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प, सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचं, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विकसित भारताचा संकल्प केला असून, १४० कोटी जनतेच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. या अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी ७५ हजार कोटी रुपये, तर मराठवाडा आणि विदर्भातल्या सिंचन प्रकल्पासाठी ६०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती कराड यांनी दिली. 

****

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या मनू भाकेरनं कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. नेमबाजीतून पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारतासाठी पहिलं पदक मिळवण्याचा मानही तीने मिळवला आहे.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनु भाकेर हिचं अभिनंदन केलं आहे. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या वैयक्तित स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरल्यामुळे हे यश विशेष असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

 

केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविय, गृहमंत्री अमित शहा यांनीही मनु भाकेरचं अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं त्यांनी मनू भाकेर हीचं अभिनंदन केलं.

दरम्यान, या स्पर्धेत काल महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये भारताच्या रमिता जिंदालनं काल अंतिम फेरी गाठली. तिनं ६३१ पूर्णांक ५ दशांश गुणांची कमाई करून पाचवं स्थान मिळवलं. भारतीय वेळेनुसार आज दुपारी एक वाजता अंतिम फेरी होणार आहे.

 

नौकानयनपटू बलराज पन्वर यानं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान नक्की केलं.

बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूनं सलामीच्या लढतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर २१-९, २१-६ अशी सहज मात केली. तर पुरुष एकेरीत एच स प्रणॉयनं देखील विजयी सुरुवात केली.

 

टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीच्या सामन्यात श्रीजा अकुला आणि मनिका बत्रा यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला. तर पुरुष एकेरीत भारताच्या शरथ कमलचा स्लोवानियाच्या खेळाडुकडून पराभव झाला.

 

मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात भारताच्या निखत झरीननं उप -उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. येत्या एक ऑगस्ट रोजी तिची आता चीनच्या वू यू हिच्याशी लढत होणार आहे.

****

पुरुष क्रिकेटमध्ये काल पल्लेकेले इथं झालेल्या दुसर्या टी - ट्वेंटी सांमन्यात भारताने श्रीलंकेचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे सात गडी राखून पराभव केला. श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात नऊ बाद १६१ धावा केल्या. रवि बिश्नोईनं तीन गडी बाद केले. पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे आठ षटकात ७८ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. भारतीय संघानं सहा षटकं आणि तीन चेंडुत ८१ धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना उद्या खेळला जाणार आहे.

****

महिला आशिया चषक टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. काल श्रीलंकेत दांबुला इथं झालेल्या अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेच्या संघानं भारताचा आठ खेळाडू राखून पराभव केला. भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात सहा बाद १६५ धावा केल्या. श्रीलंकेच्या महिलांनी हे आव्हान १९व्या षटकात आठ खेळाडू राखून पूर्ण केलं.

****

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून होतकरु तरुणांना अर्थसहाय्य देऊन त्यांना उद्योजक घडवत असतांना, मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी महामंडळ आणि शासन कटीबद्ध असल्याचं, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड इथं काल लाभार्थ्यांच्या मेळाव्यातत  बोलत होते. महामंडळाच्या अर्थसहाय्यातून एक लाख मराठा उद्योजक घडवल्याच्या संकल्पपूर्तीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाने सारथी सारख्या संस्थांमधून विविध योजना राबवल्या आहेत. त्यातून स्पर्धा परीक्षांसाठी, उच्च शिक्षणासाठी मराठा तरुणांना संधी मिळाली आहे. अजुनही ज्यांच्या पर्यंत या योजना पोहोचल्या नसतील त्यांच्या पर्यंत या योजना पोहोचवाव्या, असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात ९७ हजार महिलांच्या अर्जांना तालुका समितीनं मान्यता दिली आहे. जिल्ह्यातल्या चार लाखापेक्षा जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं जिल्हा प्रशासनाचं नियोजन आहे. आतापर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातल्या एक लाख ७९ हजार ९९५ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. 

****

आषाढी वारी सोहळा आटोपल्यानंतर पंढरपूरहून शेगावकडे निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी काल बीड शहरात दाखल झाली. रिमझिम पावसात नागरीकांनी पालखीचं ज्ञानोबा - तुकारामच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाचा गजरात स्वागत केलं. शेकडो भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आज पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सुकळीवीर शिवारात विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू झाला. सुकळीवीर इथले शेतकरी सुभाष खंदारे हे काल सकाळच्या सुमारास शेतातलं आंतरमशागतीचं काम संपल्यानंतर बैलजोडी परत करण्यासाठी जामगव्हांणकडे निघाले होते. सुकळीवीर ते जामगव्हाण मार्गावर वन्य प्राण्यांचा उच्छाद वाढल्यामुळे काही शेतकऱ्यांनी तारकुंपण करुन त्यात वीज प्रवाह सोडला आहे. त्याचा धक्का लागून ही दुर्घटना घडली.

****

नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाण तसंच बाजारातून गहाळ झालेले तब्बल ३२ लाख ८९ हजार रुपयांचे २०५ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. सायबर सेल,  स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांचे पथक तयार करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. जप्त केलेल्यापैकी काही मोबाईल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते मोबाईल धारकांना परत करण्यात आले.

****

नांदेड इथलं विष्णुपुरी धरण ९३ टक्के भरलं आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एक दरवाजा काल उघडण्यात आला.

****

No comments: