Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
· दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य देणाऱ्या सुधारित फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेला गती मिळणार-केंद्रीय गृहमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त.
· पेपरफुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन.
· विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून पंकजा मुंडे तसंच सदाभाऊ खोत यांच्यासह पाच उमेदवार जाहीर.
आणि
· नीट पेपर फुटीसंदर्भात लातूर प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्ग.
****
देशभरात आजपासून लागू झालेल्या सुधारित फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं असून, न्यायप्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायपालिका तसंच पोलिस प्रशासनात संबंधितांना माहिती दिली जात असून, यासाठी देशपातळीवर प्रशिक्षक नेमण्यात आल्याचं, शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले…
साडे बावीस लाख पुलिसकर्मियों को ट्रेनिंग के लिए बाराह हजार मास्टर ट्रेनर्स बना दिए गए है. कई इस्टिट्युशन को अधिकृत किया गया है.और तेवीस हजार नौ सो बानवे मास्टर ट्रेनर अब तक ट्रेन हो चुके है.ज्युडीसरी मे ईक्कीस हजार सबऑर्डिनरी ज्युडीसरी का ट्रेनिंग हो चुका है. और इसके लिए भी मास्टर ट्रेनर्स की कई बॅच स्थानिक भाषाओं मे तय्यार हो गई है. बीस हजार पब्लीक प्रोसिक्युटर को ट्रेन किया गया है. ४२२४ पुलिसकर्मियों का ट्रेनिंग हुआ है और फॉरेन्सीक के ४००० कर्मचारीओ का ट्रेंनिग हुआ है.
****
संसदेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावर सत्ताधारी बाकांवरच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गांधी यांनी अग्निवीर, अयोध्या तसंच इतर मुद्यांवरून सरकारवर टीका केली. त्यांच्या भाषणातल्या काही मुद्यांसह हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा तसंच पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आक्षेप घेतला, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी यासंदर्भात बोलताना, राहुल गांधी यांनी सदनाची माफी मागावी, अशी मागणी केली. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात शेतकरी कायदे, नीट प्रक्रिया तसंच बेरोजगारीसह इतरही मुद्यांवर भाष्य केलं. या चर्चेत भाजपचे अनुरागसिंह ठाकूर, बासुरी स्वराज, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांचीही भाषणं झाली.
राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सहभागी होत, रेल्वे अपघात, जम्मू काश्मीरमधला दहशतवादी हल्ला, तसंच नीट प्रक्रियेबद्दल टीका केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आदी मान्यवरांनी या चर्चेत सहभाग घेतला.
दरम्यान, टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल दोन्ही सदनांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं
****
राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या विधानाचे पडसाद आज राज्य विधान परिषदेतही उमटले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज आधी पाच मिनिटांसाठी, नंतर दहा मिनिटांसाठी, आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.
त्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनासंदर्भात विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना बोलू दिलं नसल्याचा आरोप करत, विरोधकांनी सभात्याग केला.
****
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाळ दोन वर्षांवरून तीन वर्षे करण्यासाठीचं महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे विधेयक मांडलं.
****
अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पुढील तीन महिन्यात निर्णय घेतला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात केली. याबाबत शिक्षक संघटनांशी बोलून त्यात यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव मात्र अद्याप प्रलंबित आहे, त्यांच्याकडील परिपूर्ण माहिती आल्यावर हा निर्णय घेतला जाणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
पेपर फुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आज विधानसभेत राज्यातल्या पेपर फुटीच्या संदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना फडणवीस यांनी ही माहिती दिली, ते म्हणाले...
‘‘पेपर फुटीच्या संदर्भातल्या केंद्र सरकारनं कायदा केल्यानंतर, राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचं मनोदय, हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला. या संदर्भात आमची कारवाई चालली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की, याचं अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत.’’
गट क श्रेणीतल्या पदांची भरती एमपीएससी मार्फत होणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात आणखी ३१ हजारांहून अधिक पदांची भरती सुरू असून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं घेतलेल्या नीट - यूजी या फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. गेल्या २३ जूनला एक हजार ५६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
****
विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण एक लाख ४३ हजार २९७ मतपत्रिका तर मुंबई पदवीधर मतदार संघात ६७ हजार ६४४ मतपत्रिका योग्य आढळल्या. या मतपत्रिकांच्या वैधतेची तपासणी सुरु असून त्यानंतर विजयाचा कोटा निश्चित होणार आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण १२ हजार मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली असून विजयासाठी पाच हजार ८०० हा कोटा निश्चित झाला आहे.
****
विधान परिषद आगामी निवडणूकांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर होताच, परळीत भाजप पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसंच पेढे वाटून आनंद साजरा केला.
****
'नीट'पेपर फुटीसंदर्भात लातूर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय कडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकाने आज लातूर न्यायालयात याबाबत केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली. या प्रकरणी अटकेत असलेले जमील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींच्या हस्तांतरणाची प्रक्रियाही सीबीआयच्या पथकाने आज पूर्ण केली. त्यांचा ताबाही सीबीआयला सोपवण्यात आला. दरम्यान या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या दोन जुलैला पूर्ण होत असून, उद्या दुपारी या दोन्ही आरोपींना न्यायालयापुढं हजर केलं जाणार आहे.
****
कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली.
परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात १०० वा शास्त्रज्ञ आणि शेतकरी संवाद कार्यक्रम आज पार पडला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह मान्यवरांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. कृषी विभागातील विविध पुरस्कारांचं वितरण तसंच प्रगतीशील शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला, दरम्यान शहरातल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास महापालिकेसह विविध शासकीय, सामाजिक संस्थाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, विशेष चर्चासत्र पार पडलं.
हिंगोली शहर तसंच जिल्ह्यात कृषी दिन विविध उपक्रम तसंच वृक्षारोपणानं साजरा करण्यात आला.
****
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, आणि थकीत पीक विमा तत्काळ द्यावा तसंच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, आदी मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी केल्या.
बीड इथं आज बँक ठेवीदारांनीही आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या अनेक पतसंस्थांना कुलूप लागलं असून नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या बँकामध्ये अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्याच्या आठही तालुक्यात चालू वर्षी आतापर्यंत सरासरी २२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरीपाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही दिवसांच्या खंडानंतर पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पिकांना जीवदान मिळालं असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.
****
आषाढी वारीसाठी, नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातून पंढरपूरकडे निघालेल्या साधू महाराज पायी दिंडी वारीला आज लातूर जिल्ह्याच्या सीमेवर निरोप देण्यात आला. यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण अफ्रिकेच्या संघाचा दहा खेळाडू राखून पराभव केला. सामन्याच्या आज अखेरच्या दिवशी पाहुण्या संघाचा दुसरा डाव ३७३ धावांवर आटोपला. भारताने विजयासाठी आवश्यक ३७ धावा दहाव्या षटकांत बिनबाद पूर्ण केल्या. सामन्यामध्ये दहा बळी घेणारी स्नेह राणा सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
या दोन संघांमध्ये होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना येत्या शुक्रवारी चेन्नई इथं होणार आहे.
****
No comments:
Post a Comment