Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्याय प्रक्रियेला गती मिळेल- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
· विधानपरिषदेच्या चार पैकी तीन जागांचे निकाल जाहीर, महाविकास आघाडीला दोन जागा
· पेपरफुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
· विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर
आणि
· चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा दक्षिण अफ्रिकेवर दहा खेळाडू राखून विजय
****
देशभरात कालपासून लागू झालेल्या सुधारित फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं असून, न्यायप्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायपालिका तसंच पोलिस प्रशासनात संबंधितांना माहिती दिली जात असून, यासाठी देशपातळीवर प्रशिक्षक नेमण्यात आल्याचं, शहा यांनी सांगितलं.
****
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, तर एका जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. नाशिक शिक्षक मतदारसंघात काल रात्री उशीरा दुसऱ्या क्रमांकाची मतं मोजण्यास प्रारंभ झाला होता. याठिकाणचा अधिकृत निकाल अद्याप हाती आला नाही. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर, मुंबई शिक्षक मतदारसंघातून जगन्नाथ अभ्यंकर विजयी झाले. कोकण पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवर आहेत.
****
अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पुढील तीन महिन्यात निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात केली. याबाबत शिक्षक संघटनांशी बोलून त्यात यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव मात्र अद्याप प्रलंबित असून, त्यांच्याकडील परिपूर्ण माहिती आल्यावर हा निर्णय घेतला जाणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
पेपर फुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचं आश्वासन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. राज्यातल्या पेपर फुटीच्या संदर्भात काल विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना ते बोलत होते. गट क श्रेणीतल्या पदांची भरती एमपीएससी मार्फत होणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात आणखी ३१ हजारांहून अधिक पदांची भरती सुरू असून, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
****
दिल्लीतल्या साकेत न्यायालयानं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दोन दशकांहून अधिक जुन्या मानहानी प्रकरणी, पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीचे सध्याचे उपराज्यपाल असलेले विनय कुमार सक्सेना, हे २००१ मध्ये एका गैर सरकारी संस्थेचे अध्यक्ष असतांना, त्यांनी पाटकर यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साकेत न्यायालायात पाठवण्यात आलं होतं. या न्यायालयानं २५ मे रोजी पाटकर यांना मानहानी प्रकरणी दोषी ठरवलं होतं.
****
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
काँग्रेस पक्षानं प्रज्ञा सातव यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काल याबाबतचं पत्रक जारी केलं.
****
कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली.
मुंबईत वसंतराव नाईक कृषि संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानद्वारे वसंतराव नाईक पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. कृषी मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ कृषी पत्रकार श्रीकांत कुवळेकर यांना कृषी पत्रकारिता पुरस्कार, धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या राहोड इथल्या कन्हैय्यालाल बहुउद्देशीय संस्थेला यंदाचा सामाईक पुरस्कार, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाला उल्लेखनीय कृषी योगदान पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.
राज्यात अन्नधान्याची जेव्हा टंचाई होती, तेव्हा वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी अनेक महत्वाच्या योजना आणल्या, त्यातून मोठी हरित क्रांतीदेखील घडून आली, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वसंतराव नाईक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
आता आपण जवळपास ११ लाख हेक्टर सरकारी जमीन आणि १० लाख हेक्टर शेतकऱ्यांची जमीन अशा एकूण २१ लाख हेक्टर जमीनीवर बांबू लागवडीचं उद्दीष्ट ठेवल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात, १०० वा शास्त्रज्ञ आणि शेतकरी संवाद कार्यक्रम काल पार पडला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह मान्यवरांनी, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास महापालिकेसह विविध शासकीय, सामाजिक संस्थाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, विशेष चर्चासत्र पार पडलं.
लातूर जिल्ह्यात उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काल अनावरण करण्यात आलं. वसंतराव नाईक यांनी केलेलं काम आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याची भावना, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केली.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हिंगोली शहर तसंच जिल्ह्यात कृषी दिन विविध उपक्रम तसंच वृक्षारोपणानं साजरा करण्यात आला.
धाराशिव इथं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सारथी जिल्हा परिषद शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक विकास गोडसे यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. विविध पुरस्कातप्राप्त शेतकर्यांचा या यावेळी सत्कार करण्यात आला.
****
'नीट'पेपर फुटीसंदर्भात लातूर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय कडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकाने काल लातूर न्यायालयात याबाबत केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली. या प्रकरणी अटकेत असलेले जमील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींच्या हस्तांतरणाची प्रक्रियाही सीबीआयच्या पथकाने काल पूर्ण केली. त्यांचा ताबाही सीबीआयला सोपवण्यात आला. दरम्यान, या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असून, आज दुपारी त्यांना न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे.
****
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजवणीबाबत काल परभणी जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. शहरातल्या नवीन मोंढा पोलिस ठाण्यात पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आणि कायदे तज्ञ रमण दोडिया यांनी नागरीकांना कायद्यांची माहिती दिली.
****
आषाढी वारीसाठी पैठणहून पंढरपूरला निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा काल अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या मिडसावंगी इथं पार पडला. हजारो वारकरी यामध्ये सहभागी झाले होते.
मुक्ताईनगर इथून निघालेली श्री संत मुक्ताबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यात दाखल झाली. गेवराई इथं भाविकांनी भर पावसात पालखीचं स्वागत केलं.
नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातून पंढरपूरकडे निघालेल्या साधू महाराज पायी दिंडी वारीला काल लातूर जिल्ह्याच्या सीमेवर निरोप देण्यात आला. यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
महिला क्रिकेटमध्ये, चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा दहा खेळाडू राखून पराभव केला. सामन्याच्या काल अखेरच्या दिवशी पाहुण्या संघाचा दुसरा डाव ३७३ धावांवर आटोपला. भारताने विजयासाठी आवश्यक ३७ धावा दहाव्या षटकांत बिनबाद पूर्ण केल्या. सामन्यामध्ये दहा बळी घेणारी स्नेह राणा सर्वोत्तम खेळाडू ठरली. या दोन संघांमध्ये होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना येत्या शुक्रवारी चेन्नई इथं होणार आहे.
****
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, आणि थकीत पीक विमा तत्काळ द्यावा तसंच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
बीड इथं काल बँक ठेवीदारांनीही आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या अनेक पतसंस्थांना कुलूप लागलं असून, नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या बँकामध्ये अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळवण्यासाठी दामिनी ॲप वापरण्याचं आवाहन, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. हे अॅप जीपीएस लोकेशनच्या आधारे वीज पडण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी सूचना देतं. नागरिकांनी पावसाळ्यात जल पर्यटन करतांना सतर्क राहावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्याच्या आठही तालुक्यात चालू वर्षी आतापर्यंत सरासरी २२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरीपाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही दिवसांच्या खंडानंतर पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पिकांना जीवदान मिळालं असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.
****
No comments:
Post a Comment