Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 03 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
जनतेनं धर्माच्या राजकारणाला झिडकारलं असून आमच्या सरकारच्या विश्वसनीय कामगिरीला पसंती दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलं. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. संविधानाबाबत राष्ट्रव्यापी जनोत्सवाचं आयोजन करून जनतेला संविधानाच्या प्रत्येक ओळीची माहिती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आपल्या सरकारनं देशाला जगातल्या दहाव्या क्रमांकावरच्या अर्थव्यवस्थेवरून पाचव्या क्रमांकावर नेलं, आता तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी जनतेनं आम्हाला पुन्हा संधी दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान सातत्यानं गोंधळ करत शेवटी सभात्याग केला. विरोधकांनी सभात्याग करून सभागृहाचा अवमान केल्याची तीव्र प्रतिक्रिया राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दिली. देशाचं संविधान हे फक्त हातात ठेवण्यापुरतं नसून, जीवनात आत्मसात करण्याची गरज सभापतींनी व्यक्त केली. विरोधकांनी आत्मचिंतन करावं आणि आपल्या कर्तव्याचं पालन करावं, असा सल्लाही सभापतींनी दिला.
****
पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी आज विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीनं सरकारच्या विरोधात निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या काल झालेल्या निलंबनाच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात आली.
****
दुपारी १२ वाजता विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यात आला, मात्र आमदार अनिल शिंदे यांनी यावेळातच, सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या निर्णयावर फेरविचार व्हावा, अशी विनंती केली आणि यावर निर्णय येईपर्यंत जमिनीवर बसून कामकाज ऐकू, अशी भूमिका घेतली. मात्र, हे दबावतंत्र न वापरता, विरोधी पक्षांनी संयम बाळगावा, अशी सूचना उपसभापतींनी केली. सध्या विधान परिषदेत मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे.
****
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत तसंच राज्य शासनाच्या गणवेश योजनेअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. गणवेशाची गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ट असेल याची काळजी घेण्यात आल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
****
भारताच्या पहिल्या सौर अभियानाच्या आदित्य एल वन या या अंतरिक्षयानानं सूर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या एल वन या बिंदूभोवती आपली पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं ही माहिती दिली आहे. यासोबतच या यानाचं दुसऱ्या प्रभामंडळ कक्षेत स्थानांतर करण्याची तयारी पूर्ण झाल्याचंही इस्रोनं सांगितलं. आदित्य एल वन हे यान गेल्या वर्षीच्या दोन सप्टेंबरला प्रक्षेपित करण्यात आलं होतं.
****
उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यात सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या १२१ वर पोहोचली आहे. १८ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अलिगड इथं उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज या जखमींची भेट घेऊन चौकशी केली.
****
नीती आयोगाच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथे आज नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाची सुरुवात होणार आहे. नीती आयोगामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार आहे.
****
पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ काल रात्री झिम्बॉब्वे इथं दाखल झाला. शुभमन गिल याच्या नेतृत्वात आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनात सहा जुलै ते १४ जुलै दरम्यान भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे.
****
No comments:
Post a Comment