Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 04 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक जूलै ०४ २०२४ दुपारी १.०० वा.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक विजेता भारतीय संघ आज मायदेशी परतला असून, या संघाने आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर दुपारी या संघाचं मुंबईत आगमन होईल. मुंबईत मरीन ड्राइव्हवर त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार असून, वानखेडे मैदानावर विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, या संघातले रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे मुंबईकर खेळाडू उद्या महाराष्ट्र विधान भवनाला भेट देणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली.
****
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीतर्फे निदर्शनं करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ हातात घेऊन घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात, विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन करण्यात आलं.
****
राज्यात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी शासन अनुदानित सुमारे साडे अकरा हजार ग्रंथालयं असून नव्यानं सहा ते सात हजार ग्रंथालयं सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अरुण लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. यानुसार आता तीन हजार लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात तसंच ५०० लोकसंख्या असलेल्या आदिवासी बहुल गावात ग्रंथालय सुरू करणं अनिवार्य होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीचा अहवाल ३० दिवसांच्या आत मागवला जाईल आणि त्यानुसार या कर्मच्याऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील, असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिलं. आमदार प्रसाद लाड यांनी अर्धा तास चर्चेद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, कोविड भत्ते, ग्रॅच्युइटी, त्यांना कायम नियुक्त्या देणं, पदोन्नती, इत्यादी मुद्दे लाड यांनी आपल्या प्रश्नात उपस्थित केले होते. या सोबतच मागे थांबवण्यात आलेली कर्मचारी भरती पुन्हा सुरू करण्याचा विचार करण्याचे आदेश आयुक्तांना दिले जातील, असं सामंत यांनी यावेळी सांगितलं.
****
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचं काम वेगानं करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांसोबत नुकतीच बैठक झाली. खासगी कंपन्यांसोबतच काही सरकारी यंत्रणांनीही हे काम हाती घ्यावं, जेणेकरून या कामाला गती येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन इमारतींमधल्या घरांशी संबंधित विविध मुद्द्यांवर आमदार विजय गिरकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
****
प्रवाशांच्या समस्या तसंच तक्रारी वजा सूचना यांचं स्थानिक पातळीवर जलद गतीनं निराकरण होण्याच्या उद्देशानं राज्य परिवहन महामंडळ - एस टीच्या प्रत्येक आगारात दर सोमवारी आणि शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे जिल्हा प्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेतील. आणि त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी ही माहिती दिली.
****
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत नव्यानं ५२ ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या, परंतु त्यांना एलजीडी कोड मिळाला नसल्यानं १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करता येत नसल्याचं, इथल्या सरपंचांनी सांगितलं आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या ५२ गावातील सरपंचांनी येत्या ८ जुलै रोजी मुंबईत आझाद मैदान इथं आंदोलनाचा इशारा दिला आहे.
****
लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं येत्या रविवारी ‘लातूर हरितोत्सव २०२४’चं आयोजन करण्यात आलं आहे. शहराच्या गंजगोलाई परिसरात होणाऱ्या या उपक्रमात रोपवाटिकांच्या कक्षांसोबतच महिला बचतगटांचे तृणधान्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे कक्षही सहभागी होणार आहेत.
****
जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरच्या संत सखाराम महाराजांच्या पंढरपूर आषाढी दिंडीनं आज वाळूजकडे प्रस्थान केलं. छत्रपती संभाजी नगर नजिक दौलताबाद इथं काल ही दिंडी मुक्कामी आली होती. याठिकाणी आज सकापासूनच भाविकांनी दिंडीत दर्शनाचा लाभ घेतला.
****
No comments:
Post a Comment