Thursday, 4 July 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      देशभरातल्या सर्व न्यायालयं आणि न्यायाधिकरणांमधे उत्तम पायभूत सुविधांची गरज सरन्यायाधीशांकडून व्यक्त

·      विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबन काळात दोन दिवस कपात

·      नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला हिंगोली तालुक्यात आजपासून प्रारंभ

आणि

·      टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाच्या स्वागतासाठी मुंबईत मरीनड्राईव्हवर लोटला अफाट जनसागर

****

देशभरातल्या सर्व न्यायालयं आणि न्यायाधिकरणांमधे उत्तम पायभूत सुविधांची गरज सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत रोखे अपीलीय न्यायाधिकरणाच्या नव्या कार्यालयाचं उद्धाटन केल्यानंतर दूरदर्शनशी बोलत होते. प्रत्यक्षातल्या तसंच आभासी माध्यमातून होणाऱ्या कामकाजासाठीही या सुविधांची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात भांडवली बाजाराचा बहुस्तरीय विस्तार झाला आहे. हे लक्षात घेता गुंतवणूकदारांचं हितरक्षण करण्यासाठी न्यायाधिकरणाच्या अतिरिक्त शाखा असणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

****

 

संसदेत नव्या खासदारांच्या शपथविधीच्या नियमात लोकसभाअध्यक्ष ओम बिर्ला यांनी बदल केला आहे. सुधारित नियमानुसार कोणत्याही सदस्याला शपथ घेताना शपथेच्या मजकुराव्यतिरिक्त इतर काहीही घोषणा किंवा शेरा देता येणार नाही. १८व्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात अनेक सदस्यांनी शपथेच्या मजकुराव्यतिरिक्त घोषणाबाजी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या आधी, निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर केली आहे. याअंतर्गत, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रं स्थापन करण्यात येणार आहेत. या अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना बूथ-स्तरीय स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात येईल. या अंतर्गत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण सोसायट्यांना मतदारांसाठी सोयीस्कर आणि जवळच्या ठिकाणी मतदान केंद्र स्थापन करण्यासाठी पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे.

****

सुधारित फौजदारी कायद्यांच्या अनुषंगानं पत्र सूचना कार्यालयानं आज मुंबईत एक विशेष कार्यक्रम घेतला. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे उपसंचालक डॉ. काकासाहेब डोळे यांनी या कार्यक्रमात सुधारित कायद्यांबाबत मार्गदर्शन केलं. सुधारित कायदे हे शिक्षेऐवजी न्यायकेंद्रित आहेत, तसंच यामुळे पीडित आणि तक्रारदारांना तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आपली तक्रार आणि जबाब नोंदवता येतील, असं डॉ. डोळे यावेळी सांगितलं.

****

राज्य पोलीस दलात ८१ पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली. आमदार रमेश पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. भारतीय तटरक्षक दल, नौदल अशा यंत्रणांमधून निवृत्त झालेल्यांची भरती कंत्राटी तत्त्वावर करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. हरिभाऊ बागडे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. गैरव्यवहार करणाऱ्या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना देण्याबाबत कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली. नारायण कुचे, प्रकाश सोळंके आणि बबनराव लोणीकर यांनीही याबाबत उप प्रश्न विचारले होते.

****

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली, ते विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. अर्ज केल्यानंतर दीड महिन्यात हे प्रमाणपत्र मिळेल, असं सावे यांनी सांगितलं. मृत झोपडीधारकाच्या वारसाने वारसा प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती यावेळी मंत्री सावे यांनी दिली.

****

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन ५ दिवसांवरून ३ दिवस करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर मांडला. सदनानं आवाजी मतदानानं तो मंजूर केला. त्यामुळे दानवे उद्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत.

****

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवणाऱ्या निर्णयाला, स्थगितीची मागणी करणारा अर्ज, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं, फेटाळून लावला आहे. या बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ५ वर्षे सक्तमजुरी आणि साडे बारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानं केदार यांची शिक्षा निलंबित करून त्यांना जामीन दिला आहे.

****

ऊस उत्पादकांप्रमाणे दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली आहे. राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्ली इथं शाह यांची भेट घेवून महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहितीही विखेपाटील यांनी शहा यांना दिली.

****

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला हिंगोली तालुक्यात आज प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आकांक्षित तालुक्यात करण्याच्या कामांची यादी वाचून दाखवत सर्व निकष मुदतीपूर्वीच पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. यासाठी हिंगोली तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत

ह्या कार्यक्रमामध्ये सहा पॅरामीटर्स नीती आयोगाकडून निश्चित केलेले आहेत, त्याच्यामधलं १०० टक्के काम आम्हाला पूर्ण करायचं आहे. ह्याच्यामध्ये महिलांच्या अनुषंगाने १०० टक्के प्रेगनन्ट लेडीजचं रजिस्ट्रेशन, महिलांच्या साठी असलेला १०० टक्के पोषण आहार, त्याच अनुषंगाने आपल्याकडच्या कृषी विभागाकडच्या असलेल्या कृषी आरोग्य कार्डचं डिस्ट्रीब्युशन आणि आपल्या महिला बचत गटांना १०० टक्के रिव्हॉल्व्हिंग फंड देणे या चार पॅरामीटर्समध्ये १०० टक्के काम करण्यासाठी आम्ही त्याचं नियोजन आणि आराखडा आज समितीमध्ये मंजूर केला. आणि खऱ्या अर्थाने आकांक्षित तालुका ऑगस्ट महिन्याच्या अखेरच आपण ह्याच्यातले जे काही पॅरामीटर्स आहेत, ते १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही केलेलं आहे.

यवतमाळ जिल्ह्यात झरी-जामणी इथंही आज संपूर्णता अभियानाचं उद्घाटन झाल. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित सर्वांनी आकांक्षित तालुक्याला सक्षम आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञा केली.

****

बीड जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी जिल्ह्यातील १८ बँकांच्या २०९ शाखांना जिल्हा अग्रणी बँकेकडून १ हजार ७०७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलं आहे. या अंतर्गत जून २०२४ अखेर या सर्व बँकांनी बीड जिल्ह्यात ९५ हजार ५४३ शेतकऱ्यांना ७५६ कोटी ४१ लाखांचं पीककर्ज वितरित केलं आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ४४ टक्के आहे.

****

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचं आज मुंबईत वानखेडे क्रीडा संकुलावर भव्य स्वागत होत आहे. दिल्लीहून मुंबईत दाखल झाल्यावर हा संघ विशेष बसमधून मिरवणुकीने क्रीडासंकुलावर पोहोचणार आहे. या संघाचं स्वागत करण्यासाठी क्रिकेटप्रेमींचा अफाट जनसागर मरीनड्राईव्हवर लोटला आहे.

दरम्यान, बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघानं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर या संघाला दिल्लीहून सायंकाळी मुंबईत आणलेल्या विमानाचं विमानतळावर पाण्याचे फवारे उडवून स्वागत करण्यात आलं. सध्या हा संघ वानखेडे मैदानाकडे रवाना होत आहे.

****

निफाड तालुक्यातील सर्वेश कुशारे याची उंच उडी प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हरयाणातील पंचकुलात झालेल्या चाचणीत सर्वेशने सव्वा दोन मीटर उंच उडी मारत प्रथम क्रमांकासह ऑलिम्पिक पात्रताही पटकावली. भारतीय लष्करी सेवेत असलेला सर्वेश हा अशी किमया करणारा महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

****

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत राज्य शासनानं संवादवारीहा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्या प्रकारे मिळत असल्याच्या प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिल्या आहेत.

****

छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाच्या विकासासंदर्भात खासदार संदिपान भुमरे यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतुक मंत्री राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन, विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा, असं भुमरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

No comments: