आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०४ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
टी-ट्वेंटी विश्वचषक विजेता भारतीय संघ आज मायदेशी परतला असून, हे खेळाडू आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यानंतर दुपारी या संघाचं मुंबईत आगमन होईल. मरीन ड्राइव्हवर त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार असून, वानखेडे मैदानावर विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकारनं विविध मंत्रिमंडळ समित्या स्थापन केल्या आहेत. आर्थिक व्यवहार विषयक समितीवर ११ सदस्य असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष असतील. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सदस्यांमधे समावेश आहे. दहा सदस्यीय संसदीय व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंग असतील, राजकीय व्यवहारविषयक समितीमधे पंतप्रधानांसह १४ सदस्य असतील.
****
भारताने ९६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या 5G लहरींचा नवीन लिलाव कालपासून सुरू केला. या लिलावात आठ बँड असून प्रमुख दूरसंचार कंपन्या 5G मोबाइल सेवांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या रेडिओ लहरी मिळवण्यासाठी लिलावात सहभागी होतील. ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात सरकारला विक्रमी दीड लाख कोटी रुपये मिळाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते काल करण्यात आला. ३१ ऑगस्ट पर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेली रसवंती गृहं बंद करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले आहेत. सर्व रसवंती गृह मालकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
विम्बल्डन टेनिसमध्ये काल पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत, भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एबडेन यांनी डच जोडीचा सात - पाच, सहा - चार असा पराभव केला. मात्र भारताचा सुमित नागल आणि त्याचा सर्बियन जोडीदार दुसान लाजोविक यांचा पहिल्या फेरीत पराभव झाला.
****
No comments:
Post a Comment