Thursday, 25 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक 25.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date  25 July 2024

Time  01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक    २५ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात मुंबईसह पुणे, ठाणे, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरु असून, अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहकार्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पुणे शहरातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण - मुरबाड रस्ता, तसंच उल्हास नदी रायता पुलावरून वाहत असल्यानं हा पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळी जवळ पोहोचली आहे. ६५ मार्ग आणि ८१ बंधाऱ्यांवर पुराचं पाणी आल्यानं निम्म्या कोल्हापूर जिल्ह्यातली वाहतूक ठप्प जाली आहे. जिल्ह्यातलं राधानगरी धरण १०० टक्के भरलं असून, आज सकाळपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड, रोहा, पाली, नागोठणे इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोणावळ्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने खोपोली, खालापूर परिसर जलमय झाला आहे. ताम्हिणी घाटात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगानं सुरु असून, काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

 

दरम्यान, मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयात आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय ठेवून बचत आणि मदतकार्य करण्याचे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पावसाचा आढावा घेऊन, प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले. पुण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे.

****

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज वसई इथं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. दिब्रिटो यांची आनंदाचे अंतरंग, ओॲसिसच्या शोधात, तेजाची पावले, सृजना मोहोर, आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केलं होतं. आज सायंकाळी सहा वाजता वसईत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दिब्रिटो यांच्या निधनानं सामाजिक, साहित्यिक, पर्यावरण आणि अध्यात्मिक क्षेत्राला जोडणारा दुवा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर दिब्रिटो यांच्या निधनानं पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शोकभावना व्यक्त केल्या.

****

राज्यातल्या महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरातील शासकीय कार्यालयाच्या आवारात बचत गटांना जागा उपलब्ध करुन, त्यांच्या उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन द्यावं, असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महानगरांमध्ये महिला बचत गटांच्या उद्योगवाढीसाठी अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं तटकरे यांनी यावेळी नमूद केलं.

****

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रिडापटुंच्या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. तिरंदाजी मध्ये दीपिका कुमारी, अंकिता भगत, भजन कौर, बी धीरज, तरुण दीप रॉय आणि प्रवीण जाधव वैयक्तिक प्रकारात खेळणार आहेत. या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन उद्या होणार आहे.

****

सोलापूर विभागात दौंड इथं रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामांमुळे परवा सत्तावीस जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत सतरा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर एकवीस गाड्या मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत.

****

No comments: